विड्रावल! (ढिंग टांग!)

विड्रावल! (ढिंग टांग!)

बेटा : ढॅणट ढॅण....मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (गोंधळून जात) माय गॉड? हा कुठला अवतार? कुठे कुस्ती खेळून आलास की काय?
बेटा : (नकारार्थी मान हलवत) एटीएममध्ये गेलो होतो!
मम्मामॅडम : (कपाळाला हात मारत) ओह! एटीएमच्या नादाला कशाला जायचं? पॉकेटमनी संपला की माझ्याकडेच येतोस की अजूनही! किंवा अहमद अंकलना सांगायचं...
बेटा : (करारी मुद्रेने) नोप... मी एक स्वावलंबी माणूस आहे!
मम्मामॅडम : (काळजीपोटी) एटीएमसमोरची गर्दी पाहून मन विटून जातं! पैशासाठी मेलं किती मर मर मरायचं लोकांनी? पण ह्या कमळवाल्यांना हृदय म्हणून नाही!! इथं माणसं रांगेत उभी राहून उभ्याउभ्या प्राण सोडताहेत! आणि ह्यांची चालली आहे नोटाबंदी! डिसगस्टिंग!! तू गेलास कशाला तिथं आणखी गर्दी करायला?
बेटा : (गंभीर चेहऱ्यानं) नोटाबंदीमुळे गोरगरीब जनतेला काय भोगावं लागतं, हे मला डोळ्यांनी पाहायचं होतं, मम्मा! गोरगरीब उघडेवाघडे राहतात, म्हणून बापूंनी पंचा वापरायला सुरवात केली होती! मलाही नोटेत बापू दिसले!!
मम्मामॅडम : (हताशेनं) नोटेत सगळ्यांनाच बापू दिसतात, बेटा!


बेटा : (स्वत:शीच)...रांगेत उभा होतो. बराच वेळ उभं राहिल्यावर माझा नंबर आला! पण नंबर आल्यावर खिडकीतून त्या माणसानं मला दुधाची चक्‍क पिशवी दिली!
मम्मामॅडम : (पुन्हा कपाळावर हात!) मिल्क सेंटरवर पोचलास? देवा!!
बेटा : (मॅटर ऑफ फॅक्‍टली...) मी त्याला सरळ सांगितलं की "देखो भय्या, हमें दूध नहीं चाहिये...हमकू छुट्टा पैसा चाहिए!' त्याने मला एटीएममध्ये जायला सांगितलं!
मम्मामॅडम : (नाक मुरडत) तिथं तर प्रचंडच मोठी रांग असणार! आख्खा देश रांगेत उभा आहे सध्या!


बेटा : (ऑनेस्टली...) ऍक्‍चुअली नाही... पाच-दहा लोकच उभे होते रांगेत. मग मीही नंबर धरला. बराच वेळ रांग पुढे सरकेच ना! मग पुढचा माणूस म्हणाला की हे एटीएम गेले काही महिने बंदच आहे.
मम्मामॅडम : (आश्‍चर्याने थक्‍क होत) मग? उभे कशाला होते तिथे? उगीच?
बेटा : (थंडपणाने) त्या बंद एटीएमच्या जागी लॉटरी सेंटर झालं होतं! ते उघडायची वाट बघत होते ते लोक! मग मीही तिकडून एक लॉटरीचं तिकिट घेतलं आणि बाहेर पडलो! रस्त्यात एक जण भेटला, त्यानं सांगितलं की पुढच्या एटीएममध्ये तुम्हाला हमखास कॅश मिळेल! आत्ताच नव्याकोऱ्या नोटांची गाडी येऊन गेली तिकडे!


मम्मामॅडम : (स्तंभित होत्सात्या) मग? तिकडे गेलास की काय!
बेटा : (खांदे उडवत) अफकोर्स! मी माझा हट्ट कधी सोडत नसतो!..तिथे भयंकर रांग होती. पण मम्मा यू नो, मला लोक जाम ओळखतात, म्हणून लोक स्वत:हून म्हणाले, की "सर, पहिले आप!' तिथं गेलो तर काय...
मम्मामॅडम : (काहीशा कुत्सितपणाने) तिथंही कॅश नसणारच! हो ना?
बेटा : (कबुली देत) नाही! कॅश होती. पण सतत "प्लीज, इन्सर्ट कार्ड' असं ते मशिन सारखं सांगायला लागलं. मी म्हटलं "कसलं कार्ड?' तर तिथला गुरखा म्हणाला, की "साहब, मसीन में कार्ड नहीं डालोगे, तो पैसे कैसे पाओगे?' बिना कार्ड पैसे हवे असतील तर बॅंकेत जावा, असा सल्ला त्यानं दिला. मग मी बॅंकेत गेलो!


मम्मामॅडम : (सात्त्विक संतापानं) सामान्य माणसाला किती छळायचं म्हणते मी! कपडे बघ तुझे कसे झालेत ते! माणूस बॅंकेतून आलाय की सरहद्दीवरून हेच कळत नाहीए! ते जाऊ दे. आता स्वच्छ गरम पाण्याने आंघोळ कर आणि झोपून जा! बॅंकेत जाऊन दमला असशील! (खालच्या पट्टीत) बरं, त्या बदललेल्या नोटा आणल्यास ना व्यवस्थित?
बेटा : (निरागसपणाने) नाही...आय मीन, मिळाल्याच नाहीत! पण मला एक सांग मम्मा, अकाउंट नंबर म्हंजे काय गं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com