बंबावरचा बंडखोर! (ढिंग टांग)

dhing-tang
dhing-tang

स्थळ : केशवराव जगताप अग्निशमन वस्तुसंग्रहालय, एरंडवणे...पुणे!
वेळ : आग विझवण्याची.
प्रसंग : अर्थात आग लागल्याचा...काय हे?
पात्रे : अग्निशमन दलाचे दोन सुप्रसिद्ध जवान! आमचे व महाराष्ट्राचे सीएफओ श्रीमान चुलतराजसाहेब आणि दुसरे आम्ही!

आगीशी खेळू नये, ही सूचना आम्ही लहानपणापासून पाळत आलो आहोत. आगीशी खेळल्याने रात्री गादी ओली होते, असे भय आम्हाला घालण्यात आले होते. तथापि, असे असूनही नशिबाचा घोडा नावाच्या चतुष्पादाच्या तसल्याच प्रकारच्या आचरट कर्तृत्वामुळे आम्ही चक्‍क आगीनरक्षक ह्या पदावर रुजू झालो. आता नशिबाच्या घोड्याने नेमके काय केले, हे तुम्ही विचारू नये आणि आम्ही सांगू नये!!

(आमच्या) सीएफओसाहेबांचा आगी विझवण्यात हातखंडा आहे, हे उभा महाराष्ट्र जाणतो. बरेच दिवस आग विझवावयास मिळाली नाही तर हा झुंजार गृहस्थ जिवाच्या कराराने आधी भर रस्त्यात टायर पेटवून मग ती आग स्वत:च विझवितो. पुण्यातील केशवराव जगताप अग्निशमन वस्तुसंग्रहालयचे उद्‌घाटन ह्याच दाहक हातांनी आईतवारी पार पडले, हा काव्यगत न्यायच म्हटला पाहिजे. सदर उद्‌घाटनाचेवेळी आम्ही तेथे उपस्थित होतो. हा त्याचा ज्वलंत वृत्तांत :

...फायर ब्रिगेडच्या पोकळ बांबूवरून घसरत येऊन (आमच्या हं!) साहेबांनी संग्रहालयाचे उद्‌घाटन करावे, असे आधी ठरले होते. किंबहुना ह्या संग्रहालयास एण्ट्रीच बांबूने द्यावी, असा प्लान होता. त्यानुसार एका मनसैनिकास पोकळ बांबू आणण्याची जबाबदारीही देण्यात आली होती. तथापि, ऐनवेळी तो पोकळ बांबू आणू न शकल्याने त्यावर पोकळ बांबूचाच दुर्धर प्रसंग ओढविला. जाऊ दे. (आमच्या हं!...हंऽऽ...) सीएफओसाहेबांनी नीट मोटारीने येऊनच अखेर उद्‌घाटन केले. प्रथमदर्शनी एक भलामोठा आगीनबंब ठेविला होता. ‘शिंग फुंकीत गेएला पाण्याचा विंग्रजी बंब’ हे प्राचीन पाणीदार नाट्यगीत ज्यावरून स्फुरले, तो हा ऐतिहासिक बंब!! आमच्या अंगावर काटा आला!! 

बाय द वे, आगीनरक्षकाने हमेशा हेल्मेट घातले पाहिजे. त्या नियमानुसार आम्ही साहेबांच्या हाती एक हेल्मेट दिले.

‘‘हे काय आहे?,’’ हातात घमेले घेऊन उभ्या असलेल्या साहेबांनी विचारले, तेव्हा नेमके आम्ही पायपाचे भेंडोळे सोडवण्यात दंग होतो. अंमळ दुर्लक्ष झाले, पण मुदलात आम्ही हाडाचे आगीनरक्षक असल्याने अंगी कमालीचे सावधपण असत्ये. तात्काळ भानावर आलो.

‘‘हा पानशेतच्या पुरात वापरलेला आगीन बंब!!,’’ आम्ही.

‘‘पुराच्या पाण्यात आगीचा बंब कशासाठी?,’’ साहेब. त्यांचे डोके फार तेजतर्रार आहे. पुढे म्हणाले, ‘‘ पुराच्या पाण्यावर कुणी फवारे मारते? कॅहित्तरीच!!’’

‘‘तीच तर गंमत आहे इथली...हॅहॅ!,’’ उत्तर न सांपडल्याने आम्ही पुणे पद्धतीने वेळ मारून नेली. तीच तर गंमत आहे म्हटले की ह्यात गंमत कुठली हे शोधण्याच्या नादात पृच्छक कात्रजच्या घाटाकडे स्वत:हून सरकतो. असो.

पानशेतच्या पुरात वापरलेला डेनिस आगीन बंब मोठ्या झोकात ठेवला होता. त्यावर चढून पाहावे असे साहेबांच्या मनात आले. आम्ही म्हटले, बेशक!

‘‘ आगीवर पाणी मारतात, तसे पुराचे पाणी शोषून घेण्याचे तंत्र असणार ह्या बंबात...काय म्हंटो मी?,’’ साहेबांनी पानशेतच्या पुरातील ते पुरातन यंत्र तपासायला घेतले. पुढे म्हणाले, ‘‘ मीडियावाले म्हंटात मी आग ओकतो!! आग ओकणारा माणूस आज तुम्ही बंबावर बसवलात!!...काय!!’’

आम्ही डोक्‍यावरील घमेले हलविले. 

‘‘साहेब, आधी सील करा मस्तकाला! शिर सलामत तो आगी पच्यास!!,’’ अदबीने आम्ही सूचना केली. फायर सेफ्टीच्या सूचना आम्हाला तोंडपाठ आहेत. कुरकूर करत साहेबांनी ते घमेले कम शिप्तर कम हेल्मेट मस्तकावर ठेवले.
‘‘आता काय करायचे?,’’ साहेबांनी विचारले.

‘‘येत्या निवडणुकांसाठी दारूगोळा जमा करायचा आहे!,’’ आम्ही अदबीने उत्तरलो. आणि-

डोळ्यांनी आग ओकत (आमचे) साहेब कडाडले, ‘‘बंबात घाला तुमच्या निवडणुका!’’
....आम्ही आग लागल्यासारखे धावलो!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com