हॅपी न्यू इयर! (ढिंग टांग)

dhing tang british nandy
dhing tang british nandy

स्थळ : १०, जनपथ, न्यू डेहली.
वेळ : पेहली तारीख की पेहली सुबहा.

आमच्या मम्मामॅडम चिंतेत आहेत. सारख्या घड्याळ आणि फोन आलटून पालटून पाहत आहेत. खिडकीतून बाहेर डोकावत आहेत. कुणाला बरं शोधताहेत? ओळखलंत नं? लब्बाड कुठले!! त्यांचा लाडका बेटा लापता झालाय. न्यू इयरच्या पार्टीनंतर घरी यायचं किनई... पण तो कुठेतरी गायबच झालाय. दारावर उभे असलेले अहमद अंकल सारखे कुणाकुणाला फोन करतायत, पण बेट्याचा पत्त्यामुद्या काई लागत न्हाई..! तेवढ्यात फोन वाजतो. 

बेटा : (फोनमध्ये) हाय देअर, मम्मा! नव्या वर्षाच्या शुभेच्छा!!
मम्मामॅडम : हाय...हॅपी न्यू इयार टु यू टू..! आधी कुठे आहेस ते सांग!! सकाळपासून तुला शोधून शोधून थकले!

बेटा : (कपाळाला आठ्या घालत) का? व्हाय? क्‍यों? (एक पॉज घेत) देखो भय्या...यही फर्क है उन लोगों में और हममें...हम गरीब किसान और मजदूरों के लिए विपश्‍यना करतें है! छुट्टी पर जाते हैं!! मागल्या वेळेला मी आस्पेनच्या थंड हवेत जाऊन गरीब, मजदूर आणि किसानांचा खूप विचार करून आलो... त्याचा किती फायदा झाला?
मम्मामॅडम : (थंडपणाने) तुला भूक लागलीय का?
बेटा : (बुचकळ्यात पडत) नाही...का?
मम्मामॅडम : (थंडपणा कंटिन्यूड...) मग इतकं फूटेज का खातोयस? कुठे आहेस तेवढं सांग!
बेटा : (गूढ आवाज काढत) मी...मी अज्ञातस्थळी आहे!
मम्मामॅडम : (पटकन पलंगाखाली वाकून बघत) कुठे आहे हे तुझं अज्ञातस्थळ?
बेटा : (गूढ आवाज कंटिन्यू...) लंडनमध्ये!
मम्मामॅडम : (तीनताड उडत) ओह माय गॉड! खरंच की काय? लंडनला कधी गेलास?
बेटा : (खुलासा करत) गेल्या वर्षी विमानात बसलो... लंडनला उतरलो, तेव्हा क्‍यालेंडर बदललं होतं! एक वर्ष प्रवास करण्याचा माझा संकल्प तडीला गेला, मम्मा!!
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) देवा!! अरे, इथं इतकं काय काय घडतंय, तू सुट्टीवर कसा काय जातोस?
बेटा : (गंभीरपणाने) गरीब, किसान आणि मजदूरांसाठी एवढं करावंच लागतं मम्मा!!
मम्मामॅडम : (पोटात बर्फाची लादी बसल्यागत) पुन्हा छप्पन दिवसांची सुट्टी घेतलीस की काय?
बेटा : (कबुली देत) नोप! ह्यावेळी आठवड्याभरात परतेन!!
मम्मामॅडम : (कळकळीनं) पण काही अडलं होतं का? इथं केवढे उत्पात घडतायत!
बेटा : (सीरिअसली) दॅट्‌स द पॉइण्ट! इतके उत्पात घडतायत तिकडे म्हणूनच निघालो तिथून! मी असतो, तर काय झालं असतं, विचार कर!!
मम्मामॅडम : (समजावणीच्या सुरात) यूपीत किती भयंकर उलथापालथ होतेय... काल रात्री तर त्या तुझ्या दाढीवाल्या अंकलनी देश ढवळून काढलान!!
बेटा : (प्रश्‍नार्थक) दाढीवाले अंकल? आपले आनंद शर्मा म्हणतेयस का?
मम्मामॅडम : (नाक मुरडत) यू नो हिम!! मी नाव घेत नाही त्या मौत का सौदागराचं!!
बेटा : (उजेड पडून) ओह!! नमो अंकल!! ते मला हल्ली जाम घाबरतात!! त्यांना म्हणावं, हल्ली मीसुद्धा दाढी वाढवायला घेतली आहे!! हाहा!! काय म्हणाले ते?
मम्मामॅडम : (कडवट चेहऱ्यानं) राष्ट्राला उद्देशून भाषण करण्यापलीकडे त्यांना काही येतं का? नववर्षाच्या पूर्वसंध्येला ते बोलणार आणि पुन्हा मोठा बॉम्ब टाकणार असं लोक म्हणत होते!! मी तर बाई, पहिले सगळ्या नोटा पुन्हा बदलून घेतल्या!! पण काहीही झालं नाही!! नुसता फुसका बार!!
बेटा : (गालातल्या गालात हसत) भूकंप करायलासुद्धा हिंमत लागते, मम्मा!! माझ्यासारखी!!
मम्मामॅडम : (भानावर येत) पुरे झाले तुझे भूकंप!! नववर्षाला तू इथं नाहीस... चुकल्या चुकल्यासारखं वाटतं! तू लौकरात लौकर परत ये हं!
बेटा : (विचार करत) भूकंप नको असतील, तर एकच मार्ग आहे... मी तिथं परत येण्याऐवजी, तूच इथं का येत नाहीस?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com