उमेदवारांस आवाहन! *ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

सांप्रतकाळी मुंबई-पुण्याकडे निवडणुकांचे वारे वाहात असून, शेंडी तुटो वा पारंबी अशा आविर्भावात उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. सर्वच मतदारांनी फक्‍त आपल्यालाच मते द्यावीत, अशी इच्छा असणे समजू शकते. पण ह्या अपेक्षेलाही काही मर्यादा आहेत, हेही समजून असावे. इच्छुक उमेदवारांनी प्रचारादरम्यान कुठली पथ्ये पाळावीत, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असले तरी मतदारांनी नेमके काय केले पाहिजे, हे पुरेशा स्पष्टपणे सांगितलेले नाही. ह्याचे प्रमुख कारण आपण काय करायचे आहे, हे मतदारांना नीट ठाऊक असते, हे आहे. म्हणून आम्ही उमेदवारांसाठी एक छुपी आचारसंहिता तयार करीत आहोत. त्यातील काही कलमे येथे देत असून, उर्वरित कलमे आपापल्या मगदुराप्रमाणे अन्य मतदारांनी समाविष्ट करावीत, ही विनंती. :
उमेदवारांस सूचना :
1. दुपारी एक ते चार कृपया दाराची घंटी वाजवू नये. दाराची कडीदेखील वाजवू नये.
2. कुत्र्यापासून सावधान!
3. मतदार हे नोकरदार असतात किंवा कामधंद्याची माणसे असतात. आपल्यासारखी रिकामटेकडी असती, तर त्यांनीही निवडणुका लढविल्या असत्या, ह्याचे भान उमेदवारांनी ठेवावे. सकाळी साडेसात ते नऊ ही कामावर पळण्याची वेळ असते. त्या काळात तिठ्यावर किंवा नाक्‍यावर हात जोडून उभे राहू नये. सात पावले मागे जाऊन मग पुढे जावे लागते.
4. सायंकाळच्या वेळीही माणूस दमून भागून घराकडे येत असताना त्यास हटकून मत देण्याची विनंती करू नये.
5. एकदा निवडणूक झाली की चार-पाच वर्षे तुम्ही फिरकत नाही, हे आम्हाला माहीत आहे. उगीच सलगी दाखवू नये. ""काय म्हणतायत अण्णा?'' ""आईंची तब्बेत हटलेली दिसते'', किंवा ""वैनी, बरं आहे ना?'' असली नाती जोडण्याचे उपदव्याप करू नयेत. अपमान होईल.
6. सोसायट्यांची ओसी करून देतो. कार्पोरेशनचे काम माझ्यावर सोडा, इलेक्‍शननंतर लागलीच करून टाकू असल्या भूलथापा गेली कैक वर्षे मुंबई किंवा पुणेकर ऐकत आले आहेत. तेव्हा नवीन भूलथापा तयार ठेवा.
7. पाण्याचा प्रश्‍न कुणाच्याही काकाच्याने सुटणारा नाही. तुम्ही कोरडी आश्‍वासने देऊ नका.
8. ट्राफिकला शिव्या देऊन जिवाला बरे वाटेल, पण ही समस्याही तुमच्याच्याने सुटणारी नाही, हे आम्हाला पक्‍के ठाऊक झाले आहे.
9. वचननामा, करारनामा, जाहीरनामा हे विनोदी वाङ्‌मय आहे, हे आता मतदारांना पुरेपूर कळलेले आहे.
10. रस्त्यात भेटल्यावर उगीच पाया पडल्यासारखे खोटे खोटे वाकणे बंद करावे. त्याने कंबर दुखण्यापलीकडे काहीही साध्य होत नाही. मते तर बिलकुल मिळत नाहीत.
11. आपण केलेल्या सामाजिक कामाची यादी सपशेल खोटी आहे, हे सगळ्यांना माहीत असते. उगीच काहीतरी कागदखराबी करून घराघरांत पत्रके वाटू नयेत.
12. हल्ली रस्त्यारस्त्यांवर विविध पक्षांची कार्यालये कुत्र्याच्या छत्र्यांसारखी उगवली आहेत. तिथे गाड्या पार्क केल्याने शक्‍तिप्रदर्शन होत नाही.
13. ही वॉर्डाची इलेक्‍शने आहेत. आपण खासदारकीला उभे आहो, असल्या थाटात हिंडू नये.
14. "बघता काय रागानं, ढोकळा खाल्लाय वाघानं' असल्या घोषणा हशा पिकवतात.
15. व्हॉट्‌सऍप किंवा एसएमएसवर भंपक संदेश पाठवून आमचा वेळ वाया घालवू नये.
Web Title: dhing tang by british nandy