निमंत्रण! (ढिंग टांग)

निमंत्रण! (ढिंग टांग)

परम आदरनीय मा. ना. फडणवीससाहेब, होम मिनिष्टर, महाराष्ट्र राज्ये यांसी कानष्टेबल नामे बबन बिन छगन फुलपगार, बक्‍कल नंबर 1212 उमर 42, कदकाठी 5 फू. 6 इं ह्याचा शिरसास्टांग नमस्कार व साल्युट. साहेब, मी नाशिक रोड येथे राहनारा एक साधासुधा शिंपल पोलिस हवालदार असूण व कर्तव्यदक्ष मानूस आसून आपल्याप्रमानेच मीसूद्धा एक बी सुट्टी घेटलेली नाही. कंटिन्यू ड्यूटी करत असतो. आपन सर्व पोलिसवाले चोवीस तास आँन डूटी असतो. नाही का? सूटी नाही, सनसमारंभ नाही की काहीही नाही. घरची पोरेबाळे बापाचा चेहरा विसरली हाहेत. परवाच्या दिशी डूटी संपवून रिक्षाने घरी गेलो. खिच्यात सुट्टे पैशे नव्हते. पोराला आवाज दिऊन पैशे आन असे सांगिटले, तर त्याने आईला सांगिटले का भाएर कोनीतरी बेकार मानूस पैशे मागीत हाहे!! त्याने मला वळकलेच नाही. अशी परस्थिती आहे. मानूस हा सोशल प्रानी हाहे. समाजात मिसळावे, चार सुखादुखाच्या गोस्टी कराव्यात असे मानसाला वाटत असते. म्हनून गेल्या हप्त्यात एका लग्नाचे निमंत्रन आले म्हनून खुश झालो होतो. पन साहेब त्या म्यारेज पार्टीचे निमंत्रन स्वीकारल्याबद्दल डिपारमेंटने मला डिपारमेंटल इनकायरी लावली हाहे. आता काय करावे?

संपूर्न केस आपल्याला डिटेलवार सांगावी म्हनून सदर लेटर लिहत आहे. त्याचे असे झाले का एथील महात्मा नगर एरियामधील ठक्‍कर डोममधी भारी भारी म्यारेज होत असतात. कधीतरी आपनही थिते जावून पोटभर जेवावे असे मणात होते. निमंत्रनात नोंद केल्याप्रमाने मी दबकतच मांडवात गेलो. (जान्यापूर्वी गुलाबच्या सलूनमध्ये क्रीम दाढी केली व डब्बल शेंट मारला. काळजी नसावी!) गेल्या गेल्या म्हटले आधी जेवून घ्यावे. नवरा-नवरीला नंतर भेटावे. अकरा रुपयाचे पाकिट आहेर म्हनून सरकवावे...पन जेवनाच्या साइडला बघतो तर काय!! माझ्यासमोर दोन-तीन आमदारे व एक मिनिष्टरसाहेब हातात रिकामी प्लेट धरुन हुबे होते. मी पन एक प्लेट उचिलली. पान्याची बाटली बगलेत मारली व लाइनीत हुबा राहिलो. मिनिष्टरसाहेबांनी माझ्याकडे बघूण ""काय?'' असे भिवई उडवूण विच्यारले. मी बोललो का काही नाही. त्यावर त्यांनी ""ह्यां किधर?'' असे विच्यारले. आता लग्नाच्या मांडवात मानूस कशाला जाईल? लग्नालाच ना? मला वाटले की मिनिष्टरसाहेब आता आपल्याला फैलावर घेनार. मी पतली गली पकडून मागल्या बाजूला गेलो. साहेब, मिनिष्टरसाहेबांचे णाव मी सांगनार णाही, पन मानूस जिवाला जेवला, येवडेच सांगतो! मिनिष्टरसाहेबांचा चेहरा बघूण मी घाबरलो व एक तळलेला पापड उचलून सटकलो.'

दुसऱ्या दिवशी पेपरात वाचले का सदर लग्न हे कराचीवाल्या दाऊदभाईच्या भाचीचे व्होते व त्या लग्नाला कमळवाल्या पार्टीच्या पुढाऱ्यांची ग्यांग आली व्होती. ही टिप आधी भेटली असती तर मी गेलोच नसतो. आमचे काही डिपारमेंटचे लोकसूद्धा तिकडे जेवून गेले असे कळाले. दाऊदभाईच्या घरच्या लग्नाला गेल्याकारनाने डिपारमेंटल इंन्कायरी लागली हाहे. का गेला? तुझा काय संबंध? काय जेवला? किती जेवला? असे सवाल केले जात हाहेत. अशा सिच्युएशनमधे मी काय करावे?
आईच्यान सांगतो, मी फक्‍त एक पापड उचलला. बाकी माझा काहीही संबंध नाही. तरी माझी इंकायरी रद्द करन्यास वरिष्ठांना सांगाल का? आपला नम्र व आज्ञाधारक. पो. कॉ. बबन फुलपगार. बक्‍कल नं. 1212

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com