दौरा! (ढिंग टांग)

दौरा! (ढिंग टांग)

'केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार' हे कोणांसही मान्य व्हावे. परंतु, काही काही महानुभावांस चातुर्य जमा करण्याऐवजी ते वाटण्याच्या कामीं जगभर हिंडावे लागते. कां की 'शहाणें करोन सोडावे, सकल जन' हेच त्यांचे ब्रीद असते. अर्थात हेदेखील कोणासही मान्य व्हावे!! अशी लोकविलक्षण व्यक्‍तिमत्त्वे आपल्यांत आहेत, हे आपले परम भाग्य होय. त्यापैकी एक प्रधान व्यक्‍तिमत्त्व राजधानीत लोककल्याण मार्गावर राहाते, हे कोणास बरे ठाऊक नाही? किंबहुना '7, लोककल्याण' हा आड्रेसच मुळी लोककल्याणाची गंगोत्री आहे, अशी आमची श्रद्धा आहे. आमचे त्यांस शतप्रतिशत वंदन असो!!

...वास्तविक आम्हीही काही कमी नाहीओ! आम्हीही (इन्शाल्ला) शहाणपणा वाटत यहांतहां फिरतच असतो. जनलोकांत मिसळावे. त्यांच्या जीवनविषयक जाणिवा अधिक प्रगल्भ कराव्यात, थोडेफार आतिथ्य स्वीकारून परत यावे, असा आमचा नेहमीचा परिपाठ. आमच्या ह्या निरलस कार्यामुळे आमचे जहांतहां स्वागतच होते. फोडणीचा भात, शिळ्या पोळ्यांचा (गुळयुक्‍त) लाडू, आदल्या दिशीचे उरलेसुरले असे पक्‍वान्न आम्हाला भेटते. अन्न हे पूर्णब्रह्य आहे, हेदेखील कोणालाही पटावे!! हो की नाही? परंतु, हल्ली हल्ली आम्ही घरोघरी जाऊन बासरी, ताशा, बाजा अशी वाद्ये वाजवून दाखवण्याचा सपाटा लावल्यामुळे काही घरांचे दरवाजे (आम्हांस बघून) धडाधड बंद होऊ लागल्याचे पाहून आम्ही बुचकळ्यात पडलो आहो. पण तेही एक असोच.

एवढ्यात खबर आली की आमचे एकमेव आदर्श आणि अखिल ब्रह्मांडाचे नायक जे की श्रीश्री नमोजी हे उदईक माध्यान्हसमयी परदेशगमन करणार असून, तेथील चार देशांना प्रबोधन करून येणार आहेती. आम्ही तांतडीने त्यांच्या भेटीसाठी '7, लोककल्याण मार्ग' ह्या सुप्रसिद्ध आणि पवित्र अशा आश्रमात पोचलो. पाहातो तो काय! खुद्द श्रीश्री नमोजी ब्याग भरत होते!!
'शतप्रतिशत प्रणाम!'' आम्ही.
'क्‍यारे आव्यो!!'' श्रीश्री.
'अमणाज...प्रयाणाची तयारी जोरात सुरू आहे वाटतं!'' त्यांची चरणधूळ मस्तकी धारण करून आम्ही अतिनम्रतेने म्हणालो. श्रीश्री नमोजी वेगाने ब्याग भरत होते. एकीकडे 'त्रण कुर्ता, छ ज्याकिट, सांत फाफडानी पेकेट, पांच चायनी बोक्‍स...' असा हिशेब चालला होता. दाढीचा ब्रश त्यांच्या सामानाच्या यादीत नाही, ह्याची आम्ही मनोमन नोंद घेतली.
'जर्मनी, पछी स्पेन, रशिया अने फ्रान्स...एने माटे शुं लै जावुं? एटली बद्धी इनव्हेस्टमेंट आणायच्या, तो काय तरी देयाला पण पायजे ने!,'' नमोजींनी रास्त सवाल केला. एका हाताने घ्यायचे, दुसऱ्या हाताने काय द्यायचे?
'द्या विवेकानंदांचंच पुस्तक! ते बरं पडतं!!,'' आम्ही सुचवले. पुस्तक ही वस्तू ब्यागेत चांगली मावते, हे आम्ही हेरून ठेवले आहे.
'चोक्‍कस!! ए-वन अेडव्हाइस छे!,'' त्यांनी आम्हाला शाबासकी दिली. आम्हाला समाधान झाले!!
'आम्हाला सांगितले असतेत, तर आम्हीही जॉइन झालो असतो!,'' आम्ही खडा टाकून पाहिला. त्यांनी दुर्लक्ष केले.
' इंडियामधला माझा समदा काम पुरा झ्याला! गेल्या साठ-सित्तर वरसमधी झ्याला नाय, एटला काम त्रण वरसमां कंप्लीट झ्याला!! सांभळ्यो?,'' श्रीश्री नमोजींनी तीन बोटे नाचवत खुशीत आम्हाला सांगितले. कमाल आहे बुवा ह्या गृहस्थाची!! तीन साठ वर्षांची कामे फक्‍त तीन वर्षांत!! हा काय स्पीड म्हणायचा की काय!!
' तुस्सी ग्रेट हो,'' आम्ही पुन्हा एकदा लोटांगण घालत सद्‌गदित सुरात म्हणालो, 'जग तुमची वाट पाहात आहे. भारतातील समस्या सोडवण्यात नाही म्हटले तरी तुमचा बराच वेळ वाया गेला. जा, युरोपला मदतीचा हात द्या!! तेथे तुमची कोणीतरी वाट बघत आहे!!''
'चोक्‍कस...हवे तो जावानुं पडसे!! आता इंडियात हा एकच काम बाकी हाय!!'' नमोजी म्हणाले.
'कुठले?,'' च्याटंच्याट पडलेले आम्ही. मनात म्हटले, हे इव्हीएमचे खुसपट काढतात की काय? पण नाही. चिंताग्रस्त सुरात ब्यागेशी खटपट क़रत ते म्हणाले- 'आ बेगउप्पर बेसी जाव तो!! बंदज नथी थतो!!''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com