संपता संपेना..! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 5 जून 2017

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर ज्येष्ठ शुक्‍ल दशमी श्रीशके 1939.
आजचा वार : संडेवार.
आजचा सुविचार : दिवस सुगीचे सुरू जाहले।
ओला चारा बैल माजले।
शेतकरी मन प्रफुल्ल झाले।
ढुम पट पट ढुम...
लेझिम चाले जोरात!

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर ज्येष्ठ शुक्‍ल दशमी श्रीशके 1939.
आजचा वार : संडेवार.
आजचा सुविचार : दिवस सुगीचे सुरू जाहले।
ओला चारा बैल माजले।
शेतकरी मन प्रफुल्ल झाले।
ढुम पट पट ढुम...
लेझिम चाले जोरात!

नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) सुगरणीचे दूध कधी ऊतू जात नाही, असे म्हणतात. किती खरे आहे!! खरे तर हे सोपे काम नाही. टीव्हीवर मालिका चालू असताना गृहिणीचे लक्ष पडद्यावरच्या भानगडीत गुंतलेले पाहून शिंचे दूध टग्यासारखे वर येत्ये, नि ऊतू जात्ये. कोपभर दूध वाया जातेच, पण सैपाकाचा ओटा साफ करण्याचे डब्बल काम पडत्ये. टॅंकरमधले काय, ग्यासवरचे काय, दुधाची ही टेंडन्सीच आहे.-वर येणे!! माझे निरीक्षण असे आहे, की ग्यासवर ठेवलेल्या दुधावर एकाग्रचित्ताने लक्ष ठेवावे लागते. भांड्याच्या तळाशी खुडबुड व्हायला लागली की आपण हुश्‍शार व्हावे. एक हात ग्यासच्या खिट्टीवर आणि आणि नजर दुधावर!!..ह्यानंतर कुठल्याही क्षणी झेपा टाकत दूध वर येते. त्या नेमक्‍या क्षणाला ग्यास बंद करणे ज्याला जमले तो खरा मुख्यमंत्री!! सांगावयाला अभिमान वाटतो की मी दूध नेमक्‍या वेळेला बंद केले. किंवा ताजे उदाहरण द्यायचे तर कुणीतरी भर रस्त्यात दुधाच्या टॅंकरची चावी खोलल्यावर मी चपळाईने खाली चरवी लावून एक थेंबही दूध रस्त्यात सांडू दिला नाही. रात्रभर चार तास बैठक करून मी शेतकऱ्यांना पटव पटव पटवले आणि ऊतू जाणारे दूध आटवले!! आटवलेल्या दुधाचा खवा करून त्याचेच पेढे शेतकऱ्यांना खिलवले...शेवटी हे शेतकऱ्यांचे राज्य आहे. हो की नाही?
महाराष्ट्रासाठी मी इतके (जाग्रण) केले तरी काही नतद्रष्ट लोक म्हणताहेत की संप अजून चालू आहे!! भले!! ह्याला काय अर्थ आहे? हा रडीचा डाव आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. पत्ते वाटायचे आणि वाटून दुसऱ्याचेच हात होताहेत म्हटल्यावर (हातातले) पत्ते फेकायचे हे काही खिलाडूपणाचे लक्षण नव्हे!! तरी बरे, संप संपवल्याची घोषणा मी भल्या रामप्रहरी केली. म्हटले दुपारपर्यंत लोकांना कळेल की संप (एकदाचा) संपला आहे. पण हे मारुतीच्या शेपटासारखे झाले आहे. संपता संपत नाही!! परवा सकाळी संप संपवला, नंतर तीन-चार तासांनी आमच्या चंदुदादा कोल्हापुरकरांनी फोनवर विचारले, ""संप नक्‍की संपला ना?'' मी म्हटले, ""हो, अर्थात...हा काय आत्ताच संपवला!! त्यांनी ""बरं बरं, थॅंक्‍यू!'" असे म्हणून घाईघाईने फोन ठेवला. पाठोपाठ नाशिकहून गिरीशभाऊंचा फोन आला. ""नाशिकला गेलो तर चालण्यासारखं आहे ना?' असे ते विचारत होते. मी म्हटले, ""बेलाशक जा, संप संपलाय केव्हाच!'' इतके फोन, इतके फोन!! शेवटी उत्तरे देऊन देऊन कंटाळून गेलो. दुपारनंतर गिरीशभाऊंचा घाबऱ्या घुबऱ्या परत फोन : ""साहेब, संप संपला ना नक्‍की?'' मी वैतागलोच, म्हटले, ""परत परत तेच काय विचारताय? मी माझ्या हाताने संपवला की!''
""नाही... मी पालकमंत्री असूनही टेबलाखाली लपून फोन करतोय! बाहेर काही शेतकरी उभे आहेत!! आणि त्यांच्या हातात दांडकी आहेत!!'' त्यांनी कुजबुजत्या आवाजात सांगितले. मी हादरलोच. "कुणालाही आत सोडू नका,' असे पीएला बजावले. दुपारी काही पत्रकार (पेंगुळलेल्या अवस्थेत) माझ्याकडे आले. एक टीव्हीवाला काकुळतीला येऊन म्हणाला, ""फायनल सांगा साहेब, संप संपला की चालू आहे? उलट्यासुलट्या ब्रेकिंग न्यूज दिल्याने आमची गोची झाली आहे.'' मी म्हटले ""संप संपला! संपला! संपला!!''
त्यांनी विचारले,""कशावरून संप संपला?''
विजयी मुद्रेने म्हणालो,""आज घरी दूध आले. मी स्वत: तापवून त्याचा चहा करून प्यायलो. कळलं? निघा आता!!''