बालदिन स्पेशल! (ढिंग टांग)

Dhing Tang
Dhing Tang

बाई : (वर्गात सर्वांना चूप करत) मुलांनो, देवासारखे गप्प बसा पाहू!..हं. आज काय आहे मुलांनो? 
मुले : (एकसुरात) बालदिन! 
बाई : (समाधानाने) शाब्बास! आज किनई तुम्हाला भेटायला एक मोठ्ठे पाहुणे येणार आहेत बरं का!! त्यांचं स्वागत करायचं हं!! ते स्वत: खूप छान गायकही आहेत!! 
चिंटू : (नाक पुसत) मोदीजी येणारेत? ही चिंगी म्हंटे की तेच खरे चाचा आहेत! 
चिंगी : (नाक वर करून)...होयच मुळी!! मी टीव्हीवर पाह्यलंय!! 
बाई : (संयमानं) नाही हं! ते सध्या फॉरीनला गेलेत!! पण आपले पाहुणेसुद्धा खूप मोठे कलाकार आहेत!! 
मंग्या : (ठामपणाने) म्हंजे आमीर खान असणार!! 
बाई : (संयमाची पराकाष्ठा) हे बघा, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण आहेत हं!! 
चिंटू : (निरागसपणाने) खरे खरे की खोटे खोटे? ग्यादरिंगला हा रंग्या मुख्यमंत्री झाला होता ना, तेव्हा त्यानं उगीच रुबाब केला होता!! 
बाई : (पोक्‍तपणाने) ते आले की त्यांना पटापट प्रश्‍न विचारा हं! ह्या शाळेतली मुलं हुश्‍शार आहेत, असं वाटलं पाह्यजे त्यांना! कळलं? (तेवढ्यात तुतारी वाजते. मुख्यमंत्री येतात. बाई खूण करतात...) 
मुले : (एका सुरात) एकसाथ नमस्ते!! 
मुख्यमंत्री : (हसतमुखाने) नमस्ते नमस्ते! मुलांनो, तुम्हाला बालदिनाच्या शुभेच्छा बरं का!! बालदिनानिमित्त तुम्हाला आमच्यातर्फे एकेक गुलाबाचं फूल आणि गोल गरगरीत पेढा मिळेल!! 
चिंटू : (कमालीच्या निरागसतेने) पण त्यासाठी आधार कार्ड लागेल का? 
मुख्यमंत्री : (काळजाचे पाणी होत) नाही रे मुलांनो! थोडा वेळ लागेल इतकंच! मुलांच्या याद्या पूर्ण झाल्या की लग्गेच वाटू हं फुलं आणि पेढे! 
चिंगी : (गोड आवाजात) म्हंजे तुमच्या कर्जमाफीसारखंच ना? (पोरं हलकल्लोळ करतात. बाई सगळ्यांना चूप करतात) 
चिंटू : (नम्रतेने) तुम्हाला खूप आवडतो ना पेढा? आम्हाला नाय आवडत! 
मुख्यमंत्री : (खोल आवाजात) खूप आवडतो, पण मी खात नाही!! जी गोष्ट आवडते, ती सतत खावी, असं नसतं मुलांनो!! तुम्ही काय खाता? 
मुले : (एका सुरात) नूडल्स!! 
मुख्यमंत्री : (विषय बदलत) तुमचे पुढचे प्रश्‍न विचारा बरं! 
रंग्या : (हाताची घडी घालून चौकशीच्या सुरात) तुम्ही गाणी म्हणता म्हणे? 
मुख्यमंत्री : (ओशाळून) आधी म्हणायचो, हल्ली आवाज नीट लागत नाही म्हणून... 
रंग्या : (फर्माइश करत) "शांताबाई'चं गाणं म्हणून दाखवा!! (इथे मुख्यमंत्री सटपटतात. "वाचवा' अशा नजरेने बाईंकडे काकुळतीने पाहतात.) 
बाई : (घाईघाईने) आपल्या पाहुण्यांना वेळ नाहीए फारसा मुलांनो! वेळात वेळ काढून ते आले आहेत! त्यांना जरा चांगले प्रश्‍न विचारा बरं! कोण विचारेल...हं, चिंटू तूच विचार!! 
चिंटू : (पोक्‍तपणाने) मंत्रिमंडळ विस्तार कधी करणार? 
मुख्यमंत्री : (अनवधानाने) हिवाळी अधिवेशनाच्या आसपास करू!! (चिंटूचे नाक ओढत) तुला का रे चौकश्‍या लब्बाडा? 
चिंगी : (मधूनच ओरडत) बाई, हा रंग्या आवशीक खाव म्हणतो! त्याला ओरडा!! 
बाई : (डोळे वटारून) मास्टर श्रीरंग, बीहेव युवरसेल्फ बरं!! मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय निघाला की तू असंच बोलतोस नेहमी! दॅट्‌स रॉंग!! कोकणातला असलास म्हणून काय झालं? 
मुख्यमंत्री : (उमदेपणाने) जाऊ द्या हो बाई, आज तरी नका ओरडू मुलांना!! 
चिंटू : (उग्र सुरात) प्लीज बी स्पेसिफिक, सर! मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या आधी की नंतर? 
मुख्यमंत्री : (गोरेमोरे होत) लहान मुलांनी आपल्या वयाला शोभेलसे प्रश्‍न विचारावेत बाळा!! 
रंग्या : (डेडली पॉज घेत) ठीक आहे, नागपुरात संत्र्याचा सीझन कधी असतो? 
मुख्यमंत्री : (खजील सुरात) हिवाळी अधिवेशनानंतरच! 
चिंटू : (विरोधी पक्षनेत्यासारखे) काय हिवाळी अधिवेशनानंतर? मंत्रिमंडळ विस्तार की संत्र्याचा सीझन? 
मुख्यमंत्री : (चतुराईने) दोन्हीही!! जय महाराष्ट्र! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com