चैत्र पालवी!  (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 28 मार्च 2017

अंधाराच्या सांदिफटीतून
फरसबंदीच्या भावुकतेतून
बकालतेच्या ठाक चिऱ्यातून
कधी उमटते लकेर हिरवी

नवे चराचर, नवीन चाहूल
नव्या पथावर नवीन पाऊल
दूर खुणविते जुनेच राऊळ,
...तिथे उगवते चैत्र पालवी!

वर्दळीतल्या हमरस्त्यावर
नि:श्‍वसितांची किडुकेमिडुके
चाकरमानी कॉलरीतल्या
घामाला अन झुळूक धडके

इमारतींच्या रांगांमधूनी
भूक रांगते जिथे दुतर्फा
आणि शर्बती गाड्यावरती
लिंबू मागते खुशाल बर्फा

गोंगाटाच्या पाणवठ्यावर
तहानलेली अविरत फडफड
पोटार्थाच्या खैरातीला
रोजच उडते असली झुंबड

अंधाराच्या सांदिफटीतून
फरसबंदीच्या भावुकतेतून
बकालतेच्या ठाक चिऱ्यातून
कधी उमटते लकेर हिरवी

नवे चराचर, नवीन चाहूल
नव्या पथावर नवीन पाऊल
दूर खुणविते जुनेच राऊळ,
...तिथे उगवते चैत्र पालवी!

वर्दळीतल्या हमरस्त्यावर
नि:श्‍वसितांची किडुकेमिडुके
चाकरमानी कॉलरीतल्या
घामाला अन झुळूक धडके

इमारतींच्या रांगांमधूनी
भूक रांगते जिथे दुतर्फा
आणि शर्बती गाड्यावरती
लिंबू मागते खुशाल बर्फा

गोंगाटाच्या पाणवठ्यावर
तहानलेली अविरत फडफड
पोटार्थाच्या खैरातीला
रोजच उडते असली झुंबड

अशा बकालीत अस्तित्वाचा
अवचित फुटतो असला अंकुर
काळेफत्तर काळीज फोडून
पुन्हा घडवतो अन मन्वंतर

झुळूक झांजरी ऐन दुपारी
बघता बघता होते तापट
चरचरणाऱ्या चराचराचे
बघता बघता उडते कस्पट

उन्हात बसल्या चराचराची
तापत जाते जुनीच काहिल
जणू फुफाट्यामधील अग्नी
अव्यक्‍ताने पेटत राहील

माणुसकीची बेटे कोठे
दूर कुठेशी लांब राहिली
पांथस्थाच्या पायपिटीने
मुक्‍कामाची वाट पाहिली

जिथे पडतसे धारातीर्थी
रोज भुकेचे जुने कलेवर
जिथे बदलतो सांधा, आणिक
काळोखाची हटते चादर

आणि अचानक भिंतीमधुनी
धून उमटते एक अनावर
जिगिषेपोटी एक रोपटे
अवतरते मग वसुंधरेवर

येथे कोठे स्फोट जाहला?
अदृष्टाच्या फुटल्या काचा?
दिक्‍कालाचे कवच फोडता
आवाज कुठला झाला साचा?

जणू सकाळी चुरगळलेल्या
शय्येमध्ये असा आळोखा
कुणी घेतसे बसल्याजागी
सताड उघडा एक झरोका
किंवा कोठे अरण्यरानी
मोराचे अन्‌ फिरते मस्तक
उगाच तेथे फुलवित पंखा
देई बेमौसमही दस्तक

किंचित लालस, थर्थर नवथर
बहर बावरी उन्ह-लपेटी
चुकार चावट वाऱ्याच्याही
उमलते सुरेल ओठीं

युगेयुगे अन्‌ असेच घडते
युगायुगाचे एकच गाणे
ऋतुचक्राच्या आरीवरचे
असेच कोरीव ताणेबाणे

अस्तित्वाच्या प्रस्फोटाचा
कधीच नसतो जन्मसोहळा
जन्ममृत्यूच्या गुंत्यामध्ये
अस्तित्त्वाचा पाय मोकळा

म्हणून म्हटले-

अंधाराच्या सांदिफटीतून
फरसबंदीच्या भावुकतेतून
बकालतेच्या ठाक चिऱ्यातून
कधी उमटते लकेर हिरवी

नवे चराचर, नवीन चाहूल
नव्या पथावर नवीन पाऊल
दूर खुणविते जुनेच राऊळ,
...तिथे उगवते चैत्र पालवी!

Web Title: Dhing tang on chitra palvi