...अजिंक्‍य मी! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

अगदी खरे सांगायचे तर काल संध्याकाळपासून आपल्याला प्लेविनची लॉटरी लागल्यासारखेच वाटू लागले आहे. कालपर्यंत आमचे मित्रही आम्हाला नावे ठेवत होते. पण आता? बात सोडा. सकाळी उठून आरशात पाहिले, तेव्हा स्वत:लाही चटकन ओळखू शकलो नाही. म्हटले, हा कोण अजिंक्‍यवीर समोर टेचात उभा आहे?

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938 कार्तिक कृ. चतुर्दशी, सोमवती अमावस्या. (दुपारी 3:20 नंतर)
आजचा वार : मंडेवार!
आजचा सुविचार :
हाती नाही नोट। नशिबात खोट।
त्याने कधी व्होट। मागू नये।।

नमो नम: नमो नम: नमो नम: (लक्षवेळा लिहिणे!) खरेच ह्या मंत्रामध्ये किती टेरिफिक शक्‍ती आहे! पूर्वीच्या काळी ऋषीमुनी मंत्रशक्‍तीने सागरास उधाण आणीत किंवा आगीचा डोंब उसळवीत म्हणे. हे खरे असावे!! नमो नम: च्या मंत्रजागराने अखिल प्राणीमात्रावर मोहिनी पडत्ये. पिसाळलेले जनावर ठिकाणावर येत्ये. अर्धमेला प्राणी चैतन्याने उसळून उठतो. उधाणलेला समुद्र शांत होतो आणि शांतपणे डुलणारे पाणी लाटांच्या रूपाने उसळ्या मारू लागत्ये. माझ्या बाबतीत हाच चमत्कार घडला. नागपूरच्या हवेत आरामात चालले होते. अचानक हा सिद्धमंत्र गवसला आणि नशीबच बदलले...कालच्या निवडणूक निकालांनंतर तर जुन्या नोटा आपोआप बदलल्या जाऊन नव्याकोऱ्या नोटांची बंडले त्याजागी प्रकटावी, असे झाले आहे...

होय, अगदी खरे सांगायचे तर काल संध्याकाळपासून आपल्याला प्लेविनची लॉटरी लागल्यासारखेच वाटू लागले आहे. कालपर्यंत आमचे मित्रही आम्हाला नावे ठेवत होते. पण आता? बात सोडा. सकाळी उठून आरशात पाहिले, तेव्हा स्वत:लाही चटकन ओळखू शकलो नाही. म्हटले, हा कोण अजिंक्‍यवीर समोर टेचात उभा आहे?

...तयार होऊन बाहेर आलो, तर आवडीचे गरमागरम बटाटेपोहे तयार होते. सोबत मिरगुंडेदेखील तळलेली!! म्हटले व्वा!! कधी नव्हेत, ते चालकानेही ""साहेब, मंत्रालयाकडे घेऊ ना?' असे अदबीने विचारले. एरवी लेकाचा मित्रपक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखा वागतो. आय मीन जुलमाचा राम राम घालतो. "नाईलाज आहे, म्हणून ड्रायविंगचे चाक हाती धरतो आहे, अन्यथा, मी मागे आणि तुम्ही पुढे' हीच योजना बरोबर होती, असे पठ्ठ्या वारंवार जाणवून देतो. पण आज चित्र वेगळे होते. मंत्रालयात लिफ्टमननेदेखील त्याचे स्टूल मला ऑफर केले. एरवी नाकावर दार बंद करणारा हा इसम! जाऊ द्या झाले!!

मंत्रालयात येणारे-जाणारे कमालीच्या आदराने बघत आणि बोलत होते. एरवी पाचदा बोलावल्यानंतर एकदा येणारे पीएदेखील एकदा बोलावल्यावर पाचवेळा येऊन गेले!! चहावाल्याला तर मी शेवटी सांगितले, की बाबा रे आल्यापासून दोन तासांत तू नऊवेळा चहा विचारलास मी निमूटपणाने प्यालो. आता ऍसिडिटी होईल!! तेव्हा पुरे!! तेव्हा कुठे तो यायचा थांबला.
कहर झाला तो काल रात्री! तेव्हा मी पुण्यात होतो. आमचे परममित्र श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचा चक्‍क फोन आला.
म्हणाले, ""काय करताय?'"

""भोसरीत चाललोय!'' मी.
""क...क...कुठे?,'' उधोजी.
""भो-स-री-त!,'' मी.
""ओह...काही नाही. सहज फोन केला. म्हटलं बऱ्याच दिवसांत जेवायला आला नाहीत, बांदऱ्यात!,'' उधोजी म्हणाले. मी हादरूनच गेलो. ताबडतोब चौकशी करून इलेक्‍शनच्या निकालांची माहिती घेतली. "आपली हाफ सेंचुरी कंप्लीट झाली आहे,' अशी माहिती पीएनी दिली. जीव भांड्यात पडला.

आमची कमळ पार्टी कधी नव्हे ते महाराष्ट्रात एक नंबरची पार्टी झाली त्याचा इतका परिणाम? ह्या विजयाचे श्रेय लोक मला देत आहेत, हे मी ओळखले आहे. पण मी मात्र प्रत्येक ठिकाणी "नमो नम:' म्हणून हात झटकले आहेत!
उधोजीसाहेब पुन्हा जेवायला बोलावताहेत, हे चांगले लक्षण आहे की वाईट? हे ज्याला कळले, त्याला महाराष्ट्राचे राजकारण कळले!!...ह्यावेळी मी उधोजीसाहेबांना भोजनाचे निमंत्रण दिले आहे!! नमो नम: !!

-ब्रिटिश नंदी
 

Web Title: dhing tang editorial article