...'राज'गडाला जेव्हा राग येतो! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

इतिहासास पक्‍के ठावकें आहे. नेमकी तिथी : आश्‍विन कृष्ण एकादशी श्रीशके 1939. शिवाजी पार्कावरील कृष्णकुंजगडावरील वातावरण तप्त जाहलेले. बालेकिल्ल्यात नवनिर्माणाच्या अष्टप्रधान मंडळाची बरीच खलबते चाललेली. खलबते कसली, खलबत्ताच तो!! राजियांच्या संतापाचा स्फोट जाहलेला.

"क्‍काय? पळाले? ऐसे कैसे पळाले?,'' राजियांच्या आरोळीने जणू गड गडगडला.
"ही कोणती भानामती? भिंत फोडोन गेले की जमिनीत गडप जाहाले? आकाशीं उडाले की..की..,'' राजियांच्या मुखातून (संतापाने) शब्द फुटेना. परवा परवा पावेतो हे आपल्यासोबत वडापाव खात होते. म्हंजे आम्ही इथे बसून वडापाव खात होतो आणि ते बाजूला बसत होते. आणि आज गायब? हे काय गौडबंगाल?
"जगदंब जगदंब! हे आम्ही काय ऐकतो आहो? काय ऐकतो आहो अं? ऐकतो काय आहो?...,'' नुकत्याच होवोन गेलेल्या अमिताभ बच्चन ह्यांच्या बर्थडेचा प्रभाव अजून थोडा कायम असावा. एकाच वाक्‍याच्या तीन-तीन डिलीवऱ्या साधोन राजियांनी हवा तो इफेक्‍ट आणला. उपस्थित अष्टप्रधान मंडळ माना खाली घालोन उभे होते. सर्वांनी आपापले हात शरणागतीसारखे गुंफियलेले.

"बोला, बोला, बाळाजी! तोंड पाडून उभे का, अं? बोला, नितीनाजी तुम्ही बोला! अविनाशाजी, तुमचे तोंड आज कोणी बांधियेले? आपले अर्धा डझन सरदार दिवसाढवळ्या शत्रूच्या गोटात जावोन खजूर खातात, तुम्हास चाहूलदेखील लागो नये? की तुमचे हात अर्धा डझन केळी खावयास गेले होते?..,'' खदिरांगारासारख्या तळपणाऱ्या नेत्रांनिशी राजियांनी आग ओकली. आपल्या अंगावर अंगरख्याऐवजी फायरप्रूफ ड्रेस असता तर वांचलो असतो, असे बाळाजीपंतांस वाटले. नितीनाजींनी खिशातील रुमाल काढोन घाम पुसला. (रुमाल पर घडी करोन नीट खिश्‍यात ठेविला...माणूस शिस्तीचा!) अविनाशाजींनी मोबाईल फोनमध्ये तोंड घातले.
""बोला, बोला, बाळाजीपंत! ऐश्‍या समयीं काय करावे? एकाच वेळी अर्धा डझन फितुरांशी कैसा सुलूक करावा? चार धडें चौमार्गी टाकावी? की हत्तीच्या पायी द्यावे? टकमक टोंकावरोन ढकलोन द्यावे की...की...काय करावे सांगा ना!!,'' काही न सुचून राजियांनी सवाल टाकला. बाळाजीपंतांनी घशातून खाकरल्यासारखा आवाज काढून "हॅं हूं' असे होकारार्थी म्हटले. ह्या सर्व शिक्षा एकाचवेळी देण्यात याव्यात, येवढाच त्याचा अर्थ होता. परंतु, चार ऑप्शनमधील एकच ऑप्शन निवडणे भाग होते...
""पण शिक्षा देणार कोणांस? येथे उरले आहे कोण?'' राजे स्वत:च म्हणाले. अरेच्चा, हेही खरेच होते की! शिक्षा द्यावयास गुन्हेगारच शिल्लक नाही... उपयोग काय? बाळाजींनी पुन्हा "हॅं हूं' केले. "हेही बरीक खरेच' एवढाच त्याचा अर्थ होता.
राजांनी दालनात जोराजोरात येरझारा घातल्या. सहा वेळा कपाळावर मूठ हापटून "जगदंब, जगदंब' असे हताशोद्‌गार काढले. ""काय करावे? काय करावे? काय करावे? अं'' ऐसे स्वत:शीच पुटपुटले. अचानक त्यांनी डोळे मिटले. गळ्यातील माळ मुठीत पकडली. त्यांच्या मुखावर तेज फांकले. डोळे उघडोन त्यांनी तांतडीने फर्जंद पप्याजीस हांक मारली. तो लगबगीने आला. राजियांनी त्यास नजदीक बोलावून कानात कामगिरी सांगितली. "जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत! महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी तुला येवढे कर्तव्य बजावावेच लागेल!'' ऐसे म्हणोन राजियांनी त्यास बाहेर पिटाळले. मुजरा करोन फर्जंद रवाना जाहला.
...नवनिर्माणाच्या अष्टप्रधान मंडळाने बराच काळ वाट पाहिली. मग चुळबुळ सुरू जाहली. राजे काही बोलत कां नाहीत? खलबत संपले काय? मीटिंग आटोपली काय?.. अखेर सारे बळ येकवटून उपरणे सावरत बाळाजीपंत म्हणाले, ""राजे, खलबत संपले असेल तर आम्ही मुलखगिरीस निघावे म्हणतो! घरी थोडे अर्जंट कामही आहे!! निघतो आता...परवानगी असावी!!''
राजे फक्‍त गूढ हसले. त्यांनी मान डोलाविली. सारे अष्टप्रधान मंडळ बाहेर जाण्यासाठी उठले. दाराकडे पोचेपर्यंत त्यांच्या कानी जळजळीत शब्द शिरले...
"पळता काय! आम्ही गडाचे दरवाजे कधीच बाहेरून बंद केले आहेत. हाहा!! जय महाराष्ट्र!!''