अफवा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 24 मार्च 2017

प्रिय मित्र उधोजी,

प्रिय मित्र उधोजी,
फारा दिवसांनी पत्र लिहीत आहे. सध्याचे दिवस बरे नाहीत, हे मलाही कळते. म्हणूनच फोन केला नाही. गोपनीयरीत्या हे पत्र पाठवतो आहे. ते गोपनीयरीत्याच वाचावे. वाचून झाल्यावर गोपनीय जागीच टाकून साखळी ओढावी!! असो. पत्र लिहिण्यास कारण, की महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप होण्याची शक्‍यता असून, त्याचा केंद्रबिंदू सिंधुदुर्गात असेल, अशी चिन्हे आहेत. तथापि, रिश्‍टर स्केलवर ह्या भूकंपाची तीव्रता अफाट असली, तरी त्याने फार पडझड किंवा मनुष्यहानि होणार नाही, असा (आपला) माझा अंदाज आहे. त्याचे असे आहे, की सिंधुदुर्गाचे सुप्रसिद्ध सरदार दर्यासारंग नारोबादादा सध्या गनिमाचा गोट सोडण्याच्या इराद्यात असून, पुन्हा एकवार स्वगृही परतण्याची त्यांची खटपट सुरू आहे, असे ऐकतो. खरे खोटे कोण जाणे. आपल्याच मावळमुलखात यथेच्छ बागडल्यानंतर नारोबादादांनी फंदफितुरी करून गनिमाचा गोट पकडला. रदबदली करुन आपल्या मुलग्यास पाच हजारी मनसब द्यावयास लाविली, हा झाला इतिहास; पण त्यांच्या त्याच मुलग्याने सध्या बंडाचे हत्त्यार बेलाशक उचलले असून, त्याने गनिमाचा गोट हादरला असल्याचे कळते. परवा रात्री नारोबादादांच्या सिंधुदुर्गाच्या कोठीतील दिवा रात्रभर जळत होता व नांदेडच्या गनिमाच्या तसबिरीसमोर दादांनी थयथयाट केल्याचे माझ्या बहिर्जीने प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. असो. 

 सारांश, रात्र वैऱ्याची आहे, सावध रहा!! रात्री-अपरात्री चटकन कोणासही दरवाजा उघडू नका! घात होईल!! दारावर टकटक झाली, की तुम्ही बेसावधपणाने दारे उघडता, हे मी गेल्या पंचवीस वर्षांत पाहिले आहे. तशी टकटक झाल्यास आणि पाठोपाठ ‘मेल्या, दरवाजो उगड’ असे दबक्‍या आवाजात कोणी म्हणाले तर नि:संशय समजा- दादा तुमच्याघरी आले!! पुढचे पाहून घेणे. मित्राने वेळेत सावध केले नाही, असे नंतर म्हणू नका. बाकी भेटीअंती बोलूच. पण भेट कधी? 

आपला. नाना.
ता. क. : नारोबादादा गोट बदलणार, ही बातमी कोणी पसरवली?- मी नव्हे!!

* * * 
माजी मित्र नाना, 
नारोबादादा आणि आम्ही काय ते बघून घेऊ. तुम्हाला मध्ये लुडबूड करण्याचे कारण नाही. कर्जमाफी न देणाऱ्या माणसाचे आम्ही काही ऐकणार नाही. नारोबादादा आणि आमचे जुने घरोब्याचे संबंध आहेत. मधल्या काळात काही कारणाने त्यांची खप्पामर्जी होऊन ते गनिमाचे गोटात जाऊन मिळाले हे खरे; पण अंगापिंडाने ते अंतर्बाह्य मावळेच आहेत, हे उभा महाराष्ट्र जाणतो. नारोबादादा गनिमाचा गोट सोडून कोठे जातील, ह्याची आम्हास खबर नाही. ना आम्ही त्याची चिंता करितो. दादा आणि त्यांचा कुटुंबकबिला आमचेकडे येण्यास निघाला आहे, ही वावडी कोणी पसरवली, हेही आम्हास ठाऊक नाही. ना आम्ही त्याचीही चिंता करितो! तथापि, हे बिकट उद्योग तुमचेच असतील, असा दाट संशय आमच्या मनात आहे. महाराष्ट्रात कुठलाही भूकंप झाला तरी त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील, हे बरे जाणून असा. बाकी आम्हाला कसली फिकिर नाही.        

उधोजी.
ता. क. : आम्ही मध्यरात्री दार बंद करून झोपू, एवढा शब्द देतो! असो. 

* * *
वाचकहो, वरील गोपनीय पत्रे आमच्या हाती लागल्यावर दोन्ही पत्रांच्या झेरॉक्‍स कॉप्या काढून आम्ही दर्यासारंग नारोबादादांना गाठले आणि थेट विचारले, ‘‘ दादा, खरंच स्वगृही जाताय? तुम्ही निघालात, अशी मार्केटमध्ये अफवा आहे!’’....त्यावर डोळे गरागरा फिरवत त्यांनी उद्‌गार काढले ते असे-‘’आवशीक खाव, शिरा पडो तुज्या तोंडार...मी गनिमाचो गोट सोडून जातंय ही फुसकुली मीच सोडलंय!! कळला?’’