ढोकळा वि. वडापाव! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 10 जानेवारी 2017

तसे स्वभावाने आम्ही फारच मोकळेढोकळे आहो! जरा मोकळा वेळ मिळाला की आम्हाला हमखास ढोकळा आठवतो. जीभ चाळवत्ये. मेंदू बधिर होतो. कोथिंबीर शिवरलेला, खोबऱ्याचे हिमकण मिरवणारा तो मोहरीयुक्‍त पिवळारंजन ढोकळ्याचा थाळा डोळ्यांसमोर ठाण मांडतो. अहाहा!!

तसे स्वभावाने आम्ही फारच मोकळेढोकळे आहो! जरा मोकळा वेळ मिळाला की आम्हाला हमखास ढोकळा आठवतो. जीभ चाळवत्ये. मेंदू बधिर होतो. कोथिंबीर शिवरलेला, खोबऱ्याचे हिमकण मिरवणारा तो मोहरीयुक्‍त पिवळारंजन ढोकळ्याचा थाळा डोळ्यांसमोर ठाण मांडतो. अहाहा!!

ढोकळा हा पदार्थ अतिवातकारक, अतिपित्तकारक आणि अतिउष्मांकधारी आहे, हे आम्हाला माहीत आहे. तरीही तो मऊ, लुसलुशीत ढोकळा जिव्हेला पुकारू लागला की आमचा संयम पार सुटतो. ढोकळ्याची अशीच जबरदस्त सय आल्याने आम्ही अखेर घराबाहेर पडलो. अंऽऽ...कोठल्या दुकानी जावे बरे?
...काहीएक धोरणात्मक विचार करोन आम्ही थेट मुंबैच्या दादर येथे गेलो. दादर हे शुद्ध मऱ्हाटी वळणाचे उपनगर असले, तरी तेथे गुर्जरी व्यंजने एकदम चोक्‍कस मिळतात, हे आम्हास माहीत होते. तेथील फरसाण दुकानी ढोकळ्याची चवकशी केली असता, आम्हांस सांगण्यात आले की शिवाजी पार्कस्थित "कृष्णकुंज फरसाण मार्ट' येथे एक नंबर ढोकळा उपलब्ध आहे. तथापि, ऑर्डर अगोदर द्यावी लागते. किंचितही वेळ न दवडता आम्ही बुलेटच्या वेगाने "कृष्णकुंज' येथे पोचलो.

"एक किलो ढोकळा आपो!,'' आम्ही अस्खलित गुर्जरीत आर्डर नोंदविली. दुकानदाराशी अशी सलगी केली की तो वजन करताना हात सढळ वापरतो, अशी आमची समजूत आहे. असो.

"कॅय?,'' दुकानदार अस्खलित मराठीत वस्सकन अंगावर ओरडला.
"दोन वडापाव!,''आम्ही घाबरून आर्डरच बदलली.
"ढोकळा काय मागता? हे काय फरसाणाचं दुकान वाटलं?,'' दुकानदार भडकला होता.
" क्षमा करा... पण आम्हाला हाच पत्ता दिला होता!,'' आम्ही खुलासा केला.
"ढोकळा खायचा असेल तर अहमदाबादला जा! सकाळी बुलेट ट्रेनने निघा... आणि अहमदाबादेत ढोकळा खायला उतरा! काय?,'' दुकानदाराने जरबेने म्हटले. कोणीही काहीही जरबेने म्हटले की आम्ही लागलीच "हो' म्हणून मोकळेढोकळे होतो. उगीच कशाला विषाची परीक्षा पाहा?
"तुमच्यासारख्या ढोकळावाल्यांसाठीच ती ट्रेन सुरू करतायत! एरवी आमच्या मुंबईला तुमच्या बुलेट ट्रेनची अजिबात गरज नाही!! गाढव लेकाचे!!,'' दुकानदार वडापावातल्या चटणीपेक्षाही भलताच तिखट निघाला.

बुलेट ट्रेन ही केवळ ढोकळा-चाहत्यांचीच चूष आहे, हे मात्र आम्हाला ठाऊक नव्हते. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर एकंदर बारा स्थानके असून, त्यापैकी आठ स्थानके गुजरातेत आहेत व अवघी चार फलाटे महाराष्ट्रात आहेत. ज्या अर्थी स्थानकांचे असे व्यस्त प्रमाण आहे, त्या अर्थी गुजरातेतील लोक मुंबईत येऊन वडापाव खाणार नसून, मुंबईतले लोक भराभरा गुजरातेतील गंतव्यस्थानांवर उतरून ढोकळा हाणणार आहेत, हे कृष्णकुंजकर्त्यांचे गणित आम्हाला शतप्रतिशत पटले!!
"ह्या बुलेट ट्रेनसाठी एवढे हजारो कोटी रुपये आणणार कुठून? नुसत्या बाता मारतात लेकाचे!! इथे कुणाच्या खिश्‍यात दातांवर मारायला दमडा उरला नाही... चोर लेकाचे!!,'' दुकानदाराने बसल्या बसल्या थाळ्यातली हिरवी मिरची चावली असणार, अशी आता आम्हाला शंका येऊ लागली.
"त्या समुद्रातल्या शिवस्मारकाचंही तसंच... पैशे कुठून आणणार, ते सांगा म्हणावं आधी!!,'' मनाने गुजरातेत गेलेला तो दुकानदार संतापून परत (मनानेच) मुंबईत आला होता.

एकंदरित ह्या उपक्रमांसाठी पैसे कुठून आणणार, ह्या सवालाने त्यास बेजार केले होते, हे आमच्या लक्षात आले. पैशाचे वांधे झाले की असे होते, हे आम्ही अनुभवाने सांगू शकतो. तेवढ्यात त्याने पटापट दोन पाव उचलून ते उभे चिरले. त्यात हिरवी, तांबडी चटणी लावून प्रत्येकी एक गर्मागर्म वडा कोंबला. म्हणाला, "घ्या! मऱ्हाटी वडापाव खरा... ढोकळ्याला कोण विचारतो?''
आम्हीही ढोकळ्याचा नाद सोडून मराठी अस्मितेचे प्रतीक ठरलेला वडापाव निष्ठेने स्वीकारण्यास हात पुढे केला. तेवढ्यात हात मागे घेऊन डोळे बारीक करत दुकानदाराने संशयाने विचारले -
"वडापावचे पैसे आणणार कोठून?''
असो.

Web Title: dhokla vs wadapav : dhing tang by british nandy