बंधन स्वातंत्र्याचे...(पहाटपावलं)

दीप्ती गंगावणे
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

सुप्रसिद्ध फ्रेंच अस्तित्ववादी तत्त्वज्ञ ज्यॉं पॉल सार्त्र यांच्या विचारांच्या अनुषंगाने सांगायचे तर माणसावर स्वतंत्र असण्याचे बंधन आहे. जोपर्यंत आपण जगतो आहोत, जोवर आपली बुद्धी शाबूत आहे, आपल्याला विचार करण्याची क्षमता आहे, तोपर्यंत माणसावर निवड करत राहण्याची सक्ती आहे

आकाशात मुक्तपणे विहार करणारी पाखरे, पाण्यात सुळकन इकडून-तिकडे जाणारे मासे किंवा झाडाच्या सावलीत निवांतपणे रवंथ करत बसलेली गाई-गुरे बघून कधी कधी त्यांच्या साध्या-सरळ जीवनक्रमाचा हेवा वाटतो. असे वाटते, की आपले आयुष्य असे गुंतागुंतीने भरलेले, प्रश्‍नांनी गांजलेले, ताण-तणावांनी व्यापलेले असण्याऐवजी या प्राण्या-पक्ष्यांसारखे सहज सोपे का नसते? खरे म्हणजे प्राण्या-पक्ष्यांचे जीवनही वाटते, तेवढे सोपे नसतेच. पण माणसाच्या जीवनाच्या तुलनेत ते सोपे वाटते. गंमत अशी, ज्या माणूसपणाचा आपल्याला विलक्षण अभिमान असतो, त्या माणूसपणाच्या वैशिष्ट्यांमुळेच आपले जीवन अवघड होत असते. त्यामधील एक फार महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माणसाची निवडक्षमता !

प्राण्यांच्या तुलनेत अधिक उत्क्रांत असलेल्या या निवडक्षमतेमुळे आपल्याला इच्छा-स्वातंत्र्याचा अनुभव येतो. भौतिक पातळीवरच्या यांत्रिक क्रिया-प्रतिक्रिया आणि जैविक पातळीवरच्या मूलभूत प्रेरणांनी नियंत्रित केलेल्या क्रिया या पलीकडे जाऊन आपण जाणीवपूर्वक, इच्छेपूर्वक, विचारपूर्वक कृती करू शकतो. प्रत्येक कृती करतेवेळी तत्त्वतः आपल्यापुढे अनेक पर्याय खुले असतात. एखादी कृती करावी, की न करावी; करायची नसेल तर त्याऐवजी कुठली कृती करावी, करायची असेल तर कशी करावी यासंबंधीचे अनेक पर्याय ! हे पर्याय कुठले आहेत, याचे ज्ञान वेगवेगळ्या कृती केल्या तर त्यांचे परिणाम काय होतील याचे ज्ञान आपल्याला बुद्धी देते. या पर्यायांमधून निवड करण्याचे काम मूल्यांच्या आधारे करावे लागते. मूल्येही अनेक असतात, तशीच अनेक प्रकारचीही असतात. म्हणजेच त्या मूल्यांमधूनही पुन्हा आपल्याला पटणाऱ्या मूल्यांची निवड करावीच लागते. क्षणोक्षणी कराव्या लागणाऱ्या या निवडींपासून आपली सुटकाच नसते. जणू निवडीचे स्वातंत्र्य हे मनुष्यत्वाचे जे मूलभूत लक्षण, तेच आपले एक बंधन होते. सुप्रसिद्ध फ्रेंच अस्तित्ववादी तत्त्वज्ञ ज्यॉं पॉल सार्त्र यांच्या विचारांच्या अनुषंगाने सांगायचे तर माणसावर स्वतंत्र असण्याचे बंधन आहे. जोपर्यंत आपण जगतो आहोत, जोवर आपली बुद्धी शाबूत आहे, आपल्याला विचार करण्याची क्षमता आहे, तोपर्यंत माणसावर निवड करत राहण्याची सक्ती आहे. ज्या क्षमतांमुळे आपल्याला सर्व सजीवांच्या तुलनेत जास्त स्वातंत्र्य मिळाले आहे, त्या क्षमतांना अनुसरून जीवन जगण्याची जबाबदारी त्याच स्वातंत्र्याने आपल्याला दिली आहे. एवढेच नव्हे, ते स्वातंत्र्य नाकारण्याची सवलत आपल्याला नाही. कारण निवड न करणे, स्वातंत्र्याचा खराखुरा उपयोग न करणे ही देखील एक निवडच आहे, स्वतंत्रपणे केलेली निवड! सार्त्र यांच्या म्हणण्यानुसार माणसाला स्वातंत्र्य नसते, तर माणूसच स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याचा अभाव म्हणजे मनुष्यत्वाचा अभाव! त्याला वरदान म्हणावे की शाप हे स्वातंत्र्य आपल्याला आहेच.

Web Title: dipti gangavane writes about freedom