उत्क्रांती आणि संस्कृती

evolution
evolution

सजीवांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत माणूस नावाचा दोन पायांचा, पण बिनपंखाचा प्राणी तयार होताना त्याच्या शरीररचनेत काही महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण बदल झाले. माणसाच्या पाठीचा कणा ताठ झाला आणि चतुष्पाद प्राण्यांपेक्षा माणसाच्या दृष्टीच्या टप्प्यात खूप जास्त जग येऊ लागले. त्याचप्रमाणे माणसाच्या हातांचा अंगठा, त्याच्या पंजाला चिकटून असला, तरी इतर चार बोटांपासून थोडा दूर झाला. या आणि अशासारख्या वरकरणी लाहन शारीरिक बदलांमुळेच माणसाचे सांस्कृतिक विश्‍व आकाराला आले. नैसर्गिक जगातच, स्वतःच्या बळावर एक आणखी विश्‍व अक्षरशः हातांनी घडवण्याची क्षमता उत्क्रांतीने माणसाला दिली.

आपण नेहमीच असे म्हणतो, की आपले आजचे जीवन तंत्रज्ञानाने व्यापून टाकलेले आहे. अनेक प्रकारच्या छोट्या-मोठ्या यंत्रांचे आपल्या रोजच्या जगण्यातले स्थान फार महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानाचा एक भक्कम आधार अर्थातच जगाचे, त्यातील घटकांचे आणि त्या घटकांमधील परस्पर संबंधाचे ज्ञान हा आहे. पण तंत्रज्ञानाच्या जन्मासाठी फक्त सैद्धांतिक ज्ञान पुरेसे नसते. त्या ज्ञानातून वेगवेगळ्या कृती प्रत्यक्ष हाताने करण्याचे "तंत्र' शोधावे लागते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमधूनच यंत्राची निर्मिती होते आणि शरीराने करण्याचे श्रम यंत्रे करू लागतात. प्राचीन काळी मानवाला विस्तवाच्या उपयोगाचे ज्ञान अनुभवातून मिळाले. विस्तवावर अन्न शिजते, विस्तवाने ऊब मिळते, आग पेटवल्याने जंगली प्राणी दूर राहतात हे कळले. पण अग्नी निर्माण करण्यासाठी गारगोट्या एकमेकांवर जोराने घासाव्या लागतात, हे "तंत्र' अवगत व्हायला वेळ लागला. या तंत्राचा सुधारित उपयोग लायटरसारख्या यंत्रामध्ये आजही होतो. पण विचार करा, गारगोट्या असोत, काडीपेटी असो, की लायटर. तो हातात धरताच येत नसता तर? आपल्या अंगठ्याच्या विशिष्ट रचनेमुळेच वस्तू हातात धरणे शक्‍य होते. प्राण्यांचा पंजा आणि माणसांचा हात यामधल्या या छोट्या फरकामुळे माणसाच्या जगण्याचे सगळे आयामच बदलून गेले. निसर्गात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा सर्वच सजीवांना आपल्या जगण्यासाठी उपयोग करून घ्यावा लागतो. पण उपलब्ध गोष्टींमध्ये आपल्या गरजांनुसार बदल घडवणे, त्या आपल्याला उपयोगी ठरतील अशा करणे, हे माणसांना जेवढे आणि जशा प्रकारे जमते, तसे कुठल्याच इतर सजीवांना जमत नाही. याचे महत्त्वाचे कारण माणसाच्या शरीराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. ही रचना नैसर्गिकरीत्याच अशी नसती, तर निसर्गातल्या गोष्टींवर आपल्या हाताने संस्करण करून "संस्कृती' निर्मिणे माणसाला शक्‍य झाले नसते.

अंगठा कापून द्यायला लागलेल्या एकलव्याला फक्त धनुर्विद्याच नव्हे; तर बरेच काही गमवावे लागले असणार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com