शिष्टसंमत ट्रम्पावतार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसमधील पहिल्या भाषणात मवाळ सूर लावला. पण त्यांच्यातील हा बदल अभिव्यक्तीच्या पद्धतीतील आहे;धाेरणात्मक नव्हे.

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर आणि सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी पारंपरिक राजकीय चर्चाविश्‍वाला एकापाठोपाठ एक धक्के द्यायला सुरवात केली. त्यांचा एकूण आवेश आणि बोलणे हे पूर्णतः वेगळे होते. ‘पोलिटिकली इनकरेक्‍ट’ असेही त्याचे वर्णन केले गेले. त्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात त्यांनी केलेले पहिलेवाहिले भाषण तुलनेने बरेच सौम्य म्हणावे लागेल. या भाषणाविषयी मोठी उत्सुकता होती, ती ज्या पार्श्‍वभूमीवर ते झाले त्यामुळे. ‘अमेरिकन फर्स्ट’ ही घोषणा देतच ट्रम्प सत्तेवर आले. सात मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी जाहीर करण्यापासून मेक्‍सिको सीमेवर भिंत बांधण्यापर्यंत अनेक निर्णय एका फटक्‍यात जाहीर करून ते मोकळे झाले. टीका करणाऱ्या, धोरणांविषयी प्रश्‍न उपस्थित करणाऱ्या पत्रकारांना व्हाइट हाउसमधील अधिकृत पत्रकार परिषदेत येण्यास मज्जाव करून त्यांनी टोकच गाठले. भारतीय तंत्रज्ञाची वंशद्वेषातून हत्या झाल्यानंतर त्याबद्दल तत्काळ जाहीर निषेध करण्याचेही त्यांनी टाळले होते. स्थलांतरितांविषयी अधिकाधिक कठोर धोरण स्वीकारण्याच्या घोषणा ते करीत गेले. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसमधील भाषणात ट्रम्प काय बोलणार याविषयी उत्सुकता होती. ट्रम्प यांची जी काही प्रतिमा मनात ठसली होती, तिच्या अनुरोधानेच या भाषणाकडे पाहिले गेले. त्यामुळेच काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात बोलताना ट्रम्प यांनी मवाळ सूर लावल्याने काहींना दिलासा वाटला. आधीच्या फटकळ, उद्दाम आणि भडक भाषेच्या तुलनेत भावनिक आवाहन करणारी, भूमिका समजावून देण्याचा प्रयत्न करणारी ही मांडणी होती. या बदलाचे स्वागत करतानाच एक मात्र अगदी पक्केपणाने लक्षात घ्यायला हवे, की हा बदल भाषाशैलीतील आहे, धोरणांतील नव्हे. त्यामुळेच ट्रम्प बदलले, असा निष्कर्ष काढणे तर फारच घाईचे आणि भोळेपणाचेही ठरेल. जगाने, विशेषतः भारतानेही त्यातील भाषेपेक्षा त्यामागची धोरणात्मक चौकट नीट लक्षात घेणे आवश्‍यक आहे. उदार मूल्यांच्या बाबतीत ट्रम्प कसे हिणकस आहेत, याचा पाढा सतत वाचण्यापेक्षा ही चौकट लक्षात घेतली तर आपल्याला आपला व्यूह ठरविताना उपयुक्त ठरेल. अमेरिकी राष्ट्राचे हित याला आपण सर्वोच्च प्राधान्य देणार आहोत आणि सर्वच विषयांमधील निर्णयांत त्याचे प्रतिबिंब पडलेले असेल, हेच ट्रम्प यांनी अधोरेखित केले आहे. 

भारताच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय म्हणजे एच वन-बी व्हिसाचा. अनेक भारतीय कंपन्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी तंत्रज्ञांना अमेरिकेत पाठवतात. पाच वर्षांपर्यंत त्यासाठी अमेरिकेत राहण्याची मुभा त्यांना मिळते. तुलनेने त्यांचे वेतनमान कमी असल्याने एकीकडे अमेरिकेला कर कमी मिळतो आणि दुसरीकडे जे काम अमेरिकेतील व्यक्तीला मिळू शकले असते, ती संधी गमावली जाते. अशांची किमान वेतन पातळी वाढवून ट्रम्प यांनी हे दुहेरी नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसमधील भाषणात स्थलांतरितांना ‘मेरिट बेस्ड एंट्री’ (गुणवत्ताधारित प्रवेश) देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. एच वन-बी व्हिसा देण्यामागील मूळ जी भूमिका होती, ती तिच्या मूळ उद्देशाबरहुकूम आम्ही अमलात आणू, असेच यातून त्यांनी सुचविले आहे. उच्च बद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचे कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना अमेरिकेत येता यावे आणि त्यातून देशाला लाभ व्हावा, हा हेतू त्यामागे होता. ‘हायटेक प्रोफेशनल्स’ची ही व्याख्या सोईनुसार बऱ्यापैकी रुंदावली, सैल झाली आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा भारतीय कंपन्यांनी उठविला.स्थलांतरितांचा ओघ आपण सरसरकट बंद करणार नसून, गुणवत्तेच्या बाबतीत काटेकोर राहू, हा ट्रम्प यांच्या निवेदनाचा अर्थ आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकेचे नुकसान होऊ न देण्याची भूमिका काय किंवा देशाच्या आर्थिक लाभाशी तडजोड करणाऱ्या करारांना मूठमाती देण्याचा निर्धार काय, हे सगळे ट्रम्प यांनी ज्या प्रकारच्या राष्ट्रवादाची चौकट स्वीकारली आहे, त्याच्याशी सुसंगत आहे.

भारतीय तंत्रज्ञाच्या हत्येविषयी तत्काळ निषेध व्यक्त न करणाऱ्या ट्रम्प यांनी या भाषणात मात्र अशा प्रकारच्या वंशद्वेषाला आणि हिंसाचारालाही अमेरिकेत थारा नसल्याचेच सांगितले, ही एक लक्षणीय बाब आहे. परंतु, कोणताही कट्टर राष्ट्रवादी ज्याप्रमाणे  इतिहास आपल्या खास दृष्टिकोनातून मांडतो, तसेच ट्रम्प यांनी केले. त्यांनी असा आव आणला आहे, की इतिहासात अमेरिकेने जगाची फार काळजी वाहिली. आता ‘लष्करच्या भाकऱ्या’ आपण भाजणार नाही, असा त्यांचा सूर आहे. भविष्यातील धोरणाविषयीच्या स्पष्टपणाबद्दल फारतर त्यांचे आभार मानता येतील; परंतु इतिहासाच्या बाबतीत सत्य-असत्याचे बेमालूम मिश्रण त्यांच्या प्रतिपादनात आहे. ‘अमेरिकेने जगात ठिकठिकाणी केलेले सगळे हस्तक्षेप हे जगाची काळजी वाहणारे होते’, या म्हणण्यातील खोटेपणा लक्षात येण्यासाठी अलीकडच्या काळातील जागतिक इतिहासाची तोंडओळख असली तरी पुरे. तशा हस्तक्षेपांमुळे घडलेल्या अनर्थांची पुनरावृत्ती होणार नाही, अशी आशा बाळगायला मात्र हरकत नाही.

Web Title: donald trump