देह जागच्या जागी, मन दूरदूर झरे... 

World Bicycle Day
World Bicycle Day

जीवन हे सायकलिंग करण्यासारखंच आहे. या दोन्हींचा तोल सांभाळायचा असेल, तर तुम्हाला सतत हालचाल करावी लागते, असं अल्बर्ट आइन्स्टाइननी म्हटलं होतं. सायकलचा वेग कमी झाला की पॅडल मारावं लागतंच! नाही तर तोल सांभाळण्याची कसरत करावी लागते. कोणतेही इंजिन हे निर्जीव असतं, असं आपल्याला वाटतं.

सायकल एक 'इंजिनविरहित' वाहन आहे, अशी आपली समजूत आहे. प्रत्यक्षात सायकलस्वार म्हणजे एक सजीव इंजिन आहे. त्याची पॉवर एक अश्वशक्तीपेक्षाही जास्त आहे, असं गणितानं सिद्ध झालंय. 'है चार के बराबर, ये दो टांगावाला' असं एका गीतात म्हटलंय ते अक्षरश: सत्य आहे! सायकलस्वार पॅडल मारतो, तेव्हा तो चाकाला कोनीय संवेग (अँग्युलर मूमेंटम, वस्तुमान X वेग) प्राप्त करून देतो. परिणामी, दोन्ही चाकांना पुढे जाण्याची गती प्राप्त होते.

गेल्या अडीचशे वर्षांतील लोकप्रिय 'शोध' सायकलचा असल्याचे जनमत चाचणीत उघड झालंय. सायकलचं जीवनातील महत्त्व लक्षात घेऊन 19 - 20 एप्रिल रोजी 'जागतिक बायसिकल डे' साजरा केला जातो. 

सायकलसाठी खनिज तेलासारखं इंधन वापरावं लागत नसल्यानं धूर आणि आवाजाचं प्रदूषण होत नाही. पार्किंगसाठी कमी जागा लागते. एका मोटार पार्किंगच्या जागी सहा ते बारा सायकली उभ्या करता येतात. त्यासाठी सहसा शुल्क पडत नाही. (त्यातून साखळी कुलूप असेल तर निर्धास्त!) सायकलला आरटीओ रजिस्ट्रेशन, ड्रायव्हिंग परवाना, नंबरप्लेट, विमा, हेल्मेट लागत नाही. मध्यम गतीने सायकल चालवली तर पायी चालण्याइतक्‍याच, म्हणजे ताशी 350 ते 450 एवढ्या कॅलरी वापरल्या जातात. सायकलची बांधणी बहुतांशी पोकळ नळ्यांनी केलेली असल्याने तिचे वजन कमीत कमी असते. सायकलस्वाराइतकी कमी ऊर्जा वापरून जास्तीत जास्त अंतर पार करण्याची कला कोणत्याही उडणाऱ्या, पळणाऱ्या आणि पोहणाऱ्या प्राण्याला जमलेली नाही. चालत जाणाऱ्या व्यक्तीपेक्षा सायकल तिप्पट वेगाने पळते आणि त्यासाठी पादचाऱ्याइतक्‍याच कॅलरी खर्ची पडतात. शिवाय तब्येत ठणठणीत राहण्यास मदत होते. 

इंजिनाची कार्यक्षमता मोजण्यासाठी साधारणत: एक किलोग्रॅम वजन एक किलोमीटर अंतरावर वाहून नेण्यासाठी किती ऊर्जा लागली, याची आकडेमोड केली जाते. वर्ल्ड वॉच इन्स्टिट्यूटने विविध वाहनांना एका उतारूला एक किलोमीटर अंतरावर घेऊन जायचे असेल तर किती ऊर्जा खर्च होईल, याचं संशोधन केलंय. त्यानुसार सायकलस्वार एक किलोमीटर प्रवासासाठी 20 कॅलरी खर्च करतो, तर मोटारीतील प्रवाशाला तेवढ्याच अंतरासाठी इंधन जाळून 115 कॅलरी खर्च कराव्या लागतात. एक वाटीभर तांदळाचा भात खाल, तर सोळा कि.मी. सायकल चालवाल! या हिशेबानुसार जंबो जेटपेक्षाही सायकल(स्वार) हे यंत्र जास्त कार्यक्षम आहे! मात्र मोठा ट्रक आणि आगगाडी ही सायकलपेक्षाही प्रति उतारू कमी कॅलरी खर्च करते! सायकल भौतिकीशास्त्राच्या ज्या तत्त्वांवर पळते, ते आपल्याला अचंबित करेल. 

चालताना आपण आपल्या एका पायाचे स्नायू आणि शरीराचा अर्धा भाग उचलतो. त्यासाठी आपल्याला दुसरा पाय जमिनीवर दाबावा लागतो. पावलोपावली असेच घडून पादत्राणांचेही घर्षण होत जाते. या हालचालींमध्ये बरीच ऊर्जा वापरली जाते. सायकलस्वार त्याच्या आसनावर 'खाली-वर' न होता एका जागी स्थिर बसून असतो. त्याचे शरीरही स्थिर असते. सायकलस्वाराने अर्धे पॅडल पायानं फिरवलं, की उरलेलं अर्धे पॅडल विनासायास आपोआप वर येतं. हवा भरलेल्या टायरमुळे जमिनीशी सायकलचे घर्षण खूप कमी होते. चाकातील बॉल-बेअरिंगमधील फिरत्या गोळ्यांमुळे गतिरोधाला प्रतिबंध होतो. या फायद्यांमुळे पायी चालण्यापेक्षा सायकलला अंतर पार करण्यासाठी कमी ऊर्जा पुरते.

तथापि, सायकल फार वेगात चालवली की सायकलस्वाराच्या शरीरामुळे वाऱ्याचा अवरोध वाढतो. योग्य वेग राखला, तर अवरोध आटोक्‍यात राहतो. सायकल फक्त दोन चाकी असूनही ती चालविताना पडत नाही. कारण वर्तुळाकार कक्षेत फिरताना जमिनीला स्पर्शून जाणाऱ्या वाहनाच्या चाकावर अपकेंद्र बल (सेंट्रिपेटल फोर्स) कार्य करते. सायकलवर स्वारासह गुरुत्वाकर्षणाचा आणि 'सेंट्रिफ्युगल' बलाचा प्रभाव असतोच. सायकलच्या पुढील चाकाला जोडलेला चिमटा (फोर्क) बाकदार असतो. त्यामुळे रस्त्यावरील खाच-खड्ड्यांमधून जाताना पुढील चाकाला जो दणका बसतो, तो वक्र-चिमट्यामुळे सायकलच्या हॅंडलपर्यंत येताना बराचसा शोषला जातो. दुचाकी चालविणाऱ्याचे वजनही हादऱ्याची तीव्रता कमी करते. साहजिकच चालविणाऱ्याला त्रास होत नाही. 

सायकलच्या पुढच्या चाकाला 32, तर मागच्या चाकाला 40 स्पोक्‍स असतात. चालविताना प्रत्येक स्पोकला क्षणोक्षणी वेगवेगळं वजन पेलवावं लागतं. ते प्रति-स्पोक एक ते दोन किलोग्रॅममध्ये बदलतं. चाकाचा संपूर्ण भाग पत्र्याने बंद केला तर तो स्पोक इतका टिकाऊ राहणार नाही. शिवाय सायकलचे वजन आणि वाऱ्याचा अवरोध वाढेल. स्पोक्‍समुळे सायकलचे वजन आटोक्‍यात राहते. आता ऍल्युमिनिअम, टायटॅनियम आणि कार्बन फायबरच्या वापरामुळे सायकल हलकी, पण अधिक मजबूत झाली आहे. 
सायकलवरून नियमित फेरफटका मारला की शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतं, असा निष्कर्ष मानसशास्त्रज्ञांनी काढलाय. कॅलरीही 350- 400 प्रतिताशी -'जळतात'!

म्हणूनच सायकलवर मजेत मनन-चिंतन करत फेरफटका मारत असलेला आसामी दिसला की मला उगाचच बहिणाबाईंच्या ओळी आठवतात - 'देह जागच्या जागी, मन दूरदूर झरे. देह दिनचर्या घडी, मन वेल्हाळ पसरे!' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com