या हृदयीचे त्या हृदयी...

dr anil lachke writes article in editorial page
dr anil lachke writes article in editorial page

माणसाचं आयुर्मान सत्तर वर्षांचं मानलं, तर त्या अवधीत कोणतीही चावी न देता ३५ अब्ज वेळा ठोके देण्याची किमया आपलं हृदय करत असतं. या हृदयाचं कार्य नीट चालावं म्हणून रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण दक्ष असायला हवं.

मा झं वय पूर्ण पन्नास वर्षांचं झालं, तेव्हा एका मित्रानं व्हिक्‍टर ह्यूगोच्या एका वाक्‍याची आठवण करून दिली - ‘पन्नाशी म्हणजे तरुणपणातील वार्धक्‍य किंवा वार्धक्‍यामधील तरुणपण’! पत्नीला ‘वार्धक्‍य’ एवढाच शब्द ऐकू आला. ती म्हणाली, ‘आजच रक्तदाब, रक्तशर्करा आणि कोलेस्टेरॉल तपासून घ्या.’ ‘या टेस्टचा आणि माझा काहीही संबंध नाही,’ असं मी जोरात म्हणालो. (पण मनातल्या मनात!). पण तरीही पॅथॉलॉजिस्टकडे जाऊन ‘रक्तदान’ करून आलो. संध्याकाळी रिपोर्ट मिळाला. सर्व काही नॉर्मल होतं, फक्त कोलेस्टेरॉल ‘बॉर्डर’वर आहे, असं कळालं. बायकोला दोनच शब्द कळले -‘कोलेस्टेरॉल आणि बॉर्डर.’ तिनं ऑर्डर काढली - ‘यापुढं अंडी, आइस्क्रीम, चॉकलेट, लोणी, चीज, भजी, शिरा... बं--द!’ हे वाक्‍यच माझ्या छातीत धडधड करणारं होतं! खाण्या-पिण्यावरील पथ्य म्हणजे जणू व्यक्तिस्वातंत्र्यावरील गदा. पण ‘आहे मनोहारी, तरीही उदास’ व्हायचं काहीच कारण नाही.

कोलेस्टेरॉलसारख्या मेदवर्गीय पदार्थाला आपण किती भ्यायचं? तथापि, हृदयाचं कार्य नीट चालावं म्हणून रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात पाहिजे, हे बरोबर आहे.
मी काही वैद्यकशास्त्रातील डॉक्‍टर नाही. बायोकेमिस्ट्री विषयातील पीएच. डी. आहे. पण कोलेस्टेरॉलबद्दल जे काही संशोधन झालंय आणि नवीन संशोधन होतंय, त्याची माहिती येथे देतोय. थोडक्‍यात म्हणजे ‘या हृदयाचे त्या हृदयी’ पोचवायचं काम करायचं! आपल्या शरीरातील शंभर मिलिलिटर रक्तात सामान्यतः १५० ते २०० मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल असतं. (पूर्वी २४० मि. ग्रॅ.पर्यंत ‘नॉर्मल’ मानलं जायचं! पण ‘काळजी घ्या’ असं डॉक्‍टर म्हणायचे.) कोलेस्टेरॉल पाण्यात विरघळत नाही. मात्र लायपोप्रोटिन घटकाचे आवरण मिळाले की ते रक्तात विरघळतं. लायपोप्रोटिनचे तीन प्रकार आहेत- हाय डेन्सिटी (एचडीएल), लो डेन्सिटी (एलडीएल) आणि व्हेरी लो डेन्सिटी. ‘एचडीएल’ला ‘गुड कोलेस्टेरॉल’ आणि ‘एलडीएल’ला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणतात. रक्तातील हे मेदवर्गीय (लिपिड) घटकांचे प्रमाण काढण्याच्या चाचणीला ‘लिपिड प्रोफाइल’ म्हणतात. यकृत कोलेस्टेरॉलची निर्मिती करते. यकृताकडून बाहेर (शरीरातील पेशींकडे) जाणाऱ्या ‘एलडीएल’ घटकाला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणतात. खरं तर यामुळे शरीरातील पेशींचे आवरण तयार होण्यासाठी कोलेस्टेरॉलचा पुरवठा होतो. विविध पेशींकडून यकृताकडे परत येणाऱ्या ‘एचडीएल’ला ‘गुड कोलेस्टेरॉल’ म्हणतात. ‘एलडीएल’मुळे रक्तवाहिन्यांच्या आतील कडांवर कोलेस्टेरॉलची पुटं चढत जातात. वाढत्या वयात रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा कमी होत जातो. परिणामी रक्ताभिसरणाला अडथळा होतो. या थरांवरून साऱ्या शरीरभर रक्ताचा रतीब घालणारं बिचारं हृदय पंपिंग करून थकत असणार. याला ‘अथेरोस्केरॉसिस’ असं भारदस्त नाव आहे. शंभर मिलिलिटर रक्तात १३० मि.ग्रॅ.पेक्षा कमी ‘एलडीएल’ (बॅड) कोलेस्टेरॉल असावं आणि ३० मि.ग्रॅ. पेक्षा जास्त ‘एचडीएल’ (गुड) कोलेस्टेरॉल असावं, असं डॉक्‍टर सांगतात.

वाढत्या वयात आपण (वाढत्या) कोलेस्टेरॉलला घाबरतो. खरं तर आपल्या मेंदूमध्ये शरीरातील २५ टक्के कोलेस्टेरॉल असतं आणि ते मज्जापेशींचे संरक्षण/कार्य करण्यासाठी झटत असतं. मात्र रक्तामधील कोलेस्टेरॉल मेंदूला मिळत नाही. मेंदूला स्वतःची गरज भागवण्यासाठी स्वतंत्रपणे कोलेस्टेरॉल बनवावं लागतं. नवजात बालकाच्या शंभर मिलिलिटर रक्तात फक्त ३५ मि.ग्रॅ. कोलेस्टेरॉल असतं. पण पुढील दहा दिवसांत ते १३० मि. ग्रॅ. पर्यंत वाढतं, कारण अबालवृद्धांपासून सर्व प्राणिमात्रांना ते अत्यावश्‍यक असतं. पुरुषांसाठी टेस्टेस्टेरॉन, महिलांसाठी एस्ट्रोजेन ही हार्मोन्स आणि व्हिटॅमिन डी कोलेस्टेरॉलमुळे तयार होतं. तिन्ही रेणूंच्या संरचनेमध्ये साम्य आहे. पित्तरस तयार होताना कोलेस्टेरॉल आवश्‍यक असतं. या रसामुळे आतड्याकडून व्हिटॅमिन ए, डी, ई आणि केचे शोषण व्हायला मदत होते. कोलेस्टेरॉल इतके महत्त्वपूर्ण आहे, पण त्याचे रक्तातील प्रमाण नियंत्रणात राहायला पाहिजे. नाहीतर हृदयविकार बळावण्याची, पक्षाघात होण्याची शक्‍यता वाढते. यासाठी पॅथॉलॉजीच्या प्रयोगशाळेत संपूर्ण कोलेस्टेरॉल व अन्य मेदांचे प्रमाण किती आहे, याचा शोध घ्यावा लागतो. रिपोर्टचे परीक्षण करताना डॉक्‍टर बऱ्याच बाबींचा विचार करतात. व्यक्तीच्या रक्तातील एकूण कोलेस्टेरॉल आणि ‘एचडीएल’ कोलेस्टेरॉलचे गुणोत्तर (रेशो) किती आहे? ते तीन ते पाचच्या दरम्यान पाहिजे. लो डेन्सिटीचे हाय डेन्सिटीबरोबर असणारे गुणोत्तर १.५ आणि तीन या दरम्यान असावे. थोडक्‍यात म्हणजे लो डेन्सिटी कोलेस्टेरॉलचे आणि ट्राय-ग्लिसेराइल्डसचे प्रमाण कमी करणे, तसेच हाय डेन्सिटीचे कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणे, यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे. त्या दृष्टीनं फळफळावळ, भाज्या, जवसाची चटणी, फायबरयुक्त खाद्यान्न उपयुक्त आहे. करडई-शेंगदाणा-ऑलिव्ह-सोयाबीन-सूर्यफूल तेलातील घटक चांगले आहेत. शरीरातील एक सामान्य घटक म्हणजे होमोसिस्टिन. हे अमिनो आम्ल शरीरातील अनेक उपयुक्त प्रक्रिया पार पाडते. एरवी निरुपद्रवी असणारा हा घटक रक्तात वाढला तर तो उपद्रवी ठरतो. कारण तो काही रक्तपेशींना एकवटतो आणि रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाला इजा करू शकतो. त्या ठिकाणी कोलेस्टेरॉल साचायला सुरवात होते. रक्तात होमोसिस्टिन १०-१२ मायक्रोमोल्स प्रतिलिटर असते. सुदैवाने आहारात पुरेसे जीवनसत्त्व बी-६, बी-१२ आणि फॉलिक ॲसिड असेल, तर होमोसिस्टिन सामान्य पातळीवर यायला मदत होते. साहजिकच रक्तातील होमोसिस्टिन मोजण्याची चाचणी आवश्‍यक असेल तरच केली जाते.  

हृदयविकाराचे संशोधन करताना गेल्या काही वर्षांत ॲपोप्रोटिन-ए आणि बी (ॲपो-ए आणि ॲपो-बी) यासंबंधी विशेष विचार केला जातोय. ॲपो-ए प्रथिन हे ‘हाय डेन्सिटी लायपोप्रोटिन’ ऊर्फ गुड कोलेस्टेरॉलची (एचडीएलची) ‘वाहतूक’ करते. ॲपो-बी हे व्हेरी लो डेन्सिटी, लो डेन्सिटी आणि आयडी (इंटरमिजिएट डेन्सिटी लायपोप्रोटिन) या ‘अनिष्ट’ मानल्या गेलेल्या घटकांची ‘वाहतूक’ करते. हृदयविकाराची चिकित्सा करताना ॲपो-बी आणि ॲपो-ए यांचे गुणोत्तर काढले जाते. ॲपो-बीचे प्रमाण अतिरिक्त असेल तर ती धोक्‍याची घंटा असते. (मग गोळी सुरू करायला हरकत नाही!) हृदयविकाराची कारणे शोधून काढण्यासाठी गेली सत्तर वर्षे फ्रयांमिंघाम हार्ट स्टडी रिपोर्टचा अभ्यास होत आहे. त्यांनीदेखील ॲपो-ए आणि बी यांच्या गुणोत्तराचे महत्त्व जाणलेलं आहे. धूम्रपान, मद्यपान, ताणतणाव, शरीराचे अतिरिक्त वजन, खाण्या-पिण्याच्या अनिष्ट सवयी यामुळेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. अर्थात रक्तातील कोलेस्टेरॉल आणि अन्य अनावश्‍यक घटक कमी करणारी औषधे आहेत. रीतसर नियमित व्यायामाचाही अनुकूल परिणाम होतो. ‘लिपिड प्रोफाइल’मुळे आपल्याला तब्येत चांगली ठेवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळते. ‘हर हाल में जिसने साथ दिया, वो एक हमारा दिलही तो है’ असं एका गीतात म्हटलंय. माणसाचं आयुर्मान सत्तर वर्षांचं मानलं तर त्या अवधीत कोणतीही चावी न देता ३५ अब्ज वेळा ठोके देण्याची किमया आपलं हृदय करत असतं. त्याला साथ देण्यासाठी आपणही योग्य ते योगदान करायला पाहिजे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com