सर्दीवर औषध आहे का?

dr anil lachke
dr anil lachke

वरकरणी साध्याच, पण तरीही बेचैन करणाऱ्या सर्दीवर प्रभावी ठरू शकेल असं रसायन संशोधकांनी शोधून काढलंय. हा प्रयोग यशस्वी झाला तर साध्या इनहेलरनं या ‘आगंतुक पाहुण्या’ला दोन दिवसांत हटवता येऊ शकेल, असा संशोधकांना विश्‍वास वाटतो.

कुणा शायरने म्हटलंय- ‘इस भरी गर्मी में कुछ सुकून आ जाये; तू आ जाए, या फिर मान्सून आ जाए!’ मॉन्सून वेळेवर आला तर चांगलंच आहे; पण कधी कधी ऋतू बदलल्यामुळं बऱ्याच जणांना सर्दी होते. पन्नास-पाऊणशे वर्षांपूर्वी  एखादी व्यक्ती कुठे शिंकली, तर आजूबाजूची मंडळी अपशकून झाला, असं मानायची. आता जर कुठे शिंक ऐकू आली तर कुणी तसं सहसा मानत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही, की अंधश्रद्धा दूर झाली. याचा अर्थ एवढाच, की आता अनेक वेळा अनेक ठिकाणी शिंका ऐकू येतात. कारण प्रत्येक व्यक्तीला वर्षातून दोन-तीन वेळा आणि शालेय मुला-मुलींना चार ते सहा वेळा सर्दी होतेच. ‘सर्दीच्या शिंकेला अपशकून नसतो’, असं पूर्वीचे लोकही मानत असत. आता सर्दी ही इतकी ‘कॉमन’ झाली आहे की इंग्रजीतही सर्दीला ‘कॉमन कोल्ड’ म्हणून ओळखलं जातंय. जिथं गर्दी आहे, तिथं सर्दी ही असणारच! कारण सर्दीची व्यथा बहुतांशी संसर्गजन्य आहे.

सर्दीनं बेजार झालेली व्यक्ती शिंकली की तुषार दोन मीटरपर्यंत उडतात. कारण शिंक ताशी दीडशे किलोमीटर वेगाने बाहेर पडते. त्यात सर्दीचे कोट्यवधी विषाणू असतात. हे विषाणू हातावर आणि कपड्यावर पसरतात. किमान तीन-चार तास ते प्रभावी असतात. त्यामुळे शिंकणाऱ्यानं तोंडासमोर रुमाल धरणे गरजेचे असते. रुग्णाच्या आजूबाजूच्या लोकांनी हात आणि तोंड साबणानं स्वच्छ धुवायला पाहिजेत. गर्दीच्या जागी सर्दीच्या विषाणूंचा प्रादुर्भाव एखाद्या निरोगी व्यक्तीला होऊ शकतो. त्याच्या बोटाला चिकटलेले विषाणू नाक, डोळे, तोंड यांच्यामार्फत शरीरात प्रवेश करतात. मग त्याला दोन दिवसांत सर्दी होऊ शकते. माझ्या माहितीतील एका शालेय शिक्षकांना वर्षातून बऱ्याच वेळा सर्दी होते. कारण वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांपैकी कुणी तरी त्यांना न कळत विषाणू ‘बहाल’ करत असतो. सार्वजनिक लिफ्टचे बटण, नोटा-नाणी, दरवाजाच्या कड्या, संगणकाचा की-बोर्ड, देवळातील घंटा, बस-लोकल ट्रेनमधील दांड्या अशा ठिकाणी सर्दीचे विषाणू असू शकतात. तेथून संसर्ग होणं शक्‍य असतं.


सर्दीमुळे नाकातील अंतर्गत भाग हुळहुळून दुखतो. कफ आणि पाणी वाहणे, घसा खवखवणे, डोळे गुलाबी होऊन डबडबणे, डोकं आणि चेहरा दुखणे, कणकण वाटून कामात लक्ष न लागणं- अशा वरकरणी साध्याच; पण तरीही बेचैन करणाऱ्या त्रासामुळे सर्दीग्रस्त व्यक्ती हवालदिल होते. दोन नाकपुड्यांपैकी एक गच्च झाली की रुग्ण अस्वस्थ होतो. मग नाक मोकळं करण्याचेदेखील ड्रॉप्स मिळतात. (खरं तर आपलं नाक एकावेळी एकाच नाकपुडीने, आळीपाळीने श्वसन करीत असते, पण ते लक्षात येत नाही).  आपल्याला सर्दी होते तेव्हा ‘रामबाण इलाज’ सुचवणारे अनेक लोक आढळतात. ‘आलं टाकून गवती चहा प्या, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा, छातीला आणि नाकाला बाम चोळा, नाकात गाईच्या तुपाचे थेंब सोडा, जलनेती करा, नाकात पाण्याची वाफ घ्या’ वगैरे वगैरे! ऑक्‍युप्रेशरचे जाणकार ‘नाकपुड्यांच्या बाजूंना आणि मानेजवळील विशिष्ट ठिकाणी बोटाने दाब द्या,’ असं सांगतात. दक्षिण भारतातील लोक सर्दी झाल्यास घसा शेकत गरम ‘रसम्‌’चे सेवन करतात. काही सोपस्कार सर्दीग्रस्ताला थोडा-फार आराम देतात. त्याला अँटिॲलर्जीक आणि कफहारक गोळ्या, सौम्य वेदनाशामक औषधे दिली जातात. दोन वेळा ‘नोबेल’चे मानकरी झालेल्या प्रा. लायनस पॉलिंग यांनी सर्दीसाठी ‘व्हिटॅमिन सी’चा मोठा डोस देण्यास सुचवले होते. त्यामुळे सर्दीवर लवकर नियंत्रण मिळवता येते. पण तरीही ‘मान न मान, मैं तेरा मेहमान’ म्हणत सर्दी निदान आठवडाभर तरी मुक्काम करते. त्यामुळेच ‘औषध घेतलं तर सर्दी आठवडाभरात बरी होते आणि औषध घेतलं नाही, तर आठ दिवसांत बरी होते,’ असं  गंमतीनं म्हटलं जातं. सध्याची उपचारपद्धती फक्त ‘लक्षणां’वर लक्ष केंद्रित करत आहे. सर्दी-खोकला आणि पडसे यामुळे जगभर विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांचे अब्जावधी कामाचे तास वाया जातात. तसेच उपचारांवर खर्च होतो तो वेगळाच. हे लक्षात घेऊन संशोधकांनी सर्दीवर एखादी प्रभावी लस किंवा औषध तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले.


सर्दीचे मुख्यत: ऱ्हायनो (म्हणजे नाक), करोना आणि रेस्पायरेटरी सिन्सियल या नावांचे तीन विषाणू (व्हायरस) आहेत. त्यातील ऱ्हायनो विषाणू प्रसाराच्या दृष्टीनं जास्त प्रभावी आहे. या विषाणूंचे काही उपप्रकार (स्ट्रेन्स) आहेत. त्यामुळे विविध व्हायरसचे दोनशे प्रकार उद्‌भवतात (आणि माशी इथंच तर शिंकलीये!). यामुळे सर्दीच्या विषाणूला रोखण्यासाठी एकच लस किंवा औषध तयार करणं आव्हानात्मक आहे. साहजिकच जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे प्रा. विन्स्टन प्राईस यांनी साठ वर्षांपूर्वी तयार केलेली लस निष्प्रभ ठरली होती.


सर्दी हटवण्यासाठी लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये दीर्घकाळ संशोधन चालू आहे. नुकताच त्यांना त्यात ‘ब्रेकथ्रू’ मिळाला आहे. नवी पद्धत थेट रुग्णांच्या श्वसनसंस्थेतील विषाणूंचा बंदोबस्त करते. सर्दीच्या सर्व प्रकारच्या विषाणूंना त्यांचे बाह्य-आवरण घडवण्यासाठी एका महत्त्वपूर्ण प्रथिनाची गरज असते. त्याचं नाव आहे : ‘एन-मायरिस्टाइल ट्रान्फरेज (एनएमटी). याला जखडून ठेवणारे एक रसायन प्रा. एड टेट यांच्या टीमनं शोधून काढलंय. सर्दीला सुरवात झाली, की ते लगेचच घेतलं तर जास्त परिणामकारक आहे. सर्दीच्या विषाणूला ते ‘ग्रहण’ करता येत नाही. साहजिकच बाह्य-आवरणाअभावी विषाणूंची संख्या झपाट्यानं कमी होऊ लागते. उरलेल्या विषाणूंना व्यक्तीची प्रतिकारशक्ती नेस्तनाबूत करते. या औषधाचे जैवरसायन शास्त्रीय आणि वैद्यकीय परीक्षण चालू आहे. या औषधाचे व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन होणार असल्याने तूर्त त्याचे नाव ‘आयएमपी- १०८८’ ठेवले आहे. हे तत्त्व वापरून दमा आणि हिवतापाचं औषधही तयार करता येईल. हा प्रयोग यशस्वी झाला तर साध्या हुंगण्याच्या नळीनं (इनहेलर) सर्दीसारख्या आगंतुक ‘मेहमाना’ला दोन दिवसांत हटवता येईल, असा विश्वास संशोधकांना वाटत आहे. शिंक कधी कधी शिंक देणाऱ्याला हुलकावणी देते. आता शिंकेलाच हुलकावणी देणारे औषध तयार झालंय. बघूया, कोण कोणाला हुलकावणी देतो ते!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com