नवा जन्म

नवा जन्म

कोतुळला जाताना उजव्या हाताला एक फाटा लागतो. वर चढून गेलं की ढगेवाडी हे गाव लागतं. नावाप्रमाणंच ते पावसाळ्यात ढगात असतं. ढगेवाडी म्हणजे लहानसा पाडा आहे. आदिवासी भागात काम करण्याच्या निमित्तानं आम्ही खूप वेळा इथं रात्री मुक्काम केला आहे. गावकऱ्यांनी श्रमदान करून दोन तलाव बांधले आहेत. या वर्षी तिथं टोमॅटोचं इतकं पीक आलं होतं, की कोतुळ आणि अकोले बाजारात विकूनही ते खूप उरले होते. या टोमॅटोचं काय करायचं असा प्रश्‍न होता. टोमॅटो सॉसचा कारखाना काढता येईल काय याची चर्चा करण्यासाठी आम्ही तिथं रात्रीच्या वेळेस मंदिरात जमलो होतो. पाड्यावरचे बहुतेक सगळे आले होते. तेवढ्यात एकजण तिथं धावत आला. तो अर्जुन होता. घाबऱ्या आवाजात तो सरपंचांना म्हणाला, ‘‘सरपंचसाहेब, अकोल्याला जावं लागतं. डाक्‍टरला इथं घेऊन या, नायतर माझ्या बायडीचं कायी खरं नाय.’’

ते ऐकल्यावर मी उठलो व त्याला विचारलं, ‘काय झालं? मी डॉक्‍टर आहे.’ तसा तो म्हणाला, ‘चला डाक्‍टरसायेब. माझ्या बायडीला बघा. कसंतरी करतेय ती.’

देवळामागं थोडासा चढाव चढून गेल्यावर चार-पाच झोपड्या होत्या. त्यातल्या एका झोपडीत शिरलो. झोपडीत चाळीस वॉटचा दिवा मिणमिणत होता. त्या क्षीण प्रकाशात जे काही बघितलं ते सुन्न करणारं होतं. जमिनीवर अर्जुनची बायको हातपाय पसरून पडली होती. तिचे डोळे पांढरे दिसत होते; आणि तोंड उघडं होतं. तिनं काही मिनिटांपूर्वी बाळाला जन्म दिला होता. ते बाळ नाळेसकट जमिनीवर पडलं होतं. मी तिच्या शेजारी बसलो. तिचा हात हातात घेतला आणि नाडी बघितली. ती लागत नव्हती. पेनटॉर्चच्या प्रकाशात तिचे डोळे बघितले. प्रकाश पडताच तिच्या बुबुळांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. बुबुळं स्थिर होती. छातीला कान लावून बघितला. हृदयाचे ठोके ऐकू येत नव्हते. बाळाला जन्म देतादेताच ती गेली होती.

मग बाळाला बघितलं. ते जिवंत होतं. त्याला आईपासून दूर करणं आवश्‍यक होतं. मी अर्जुनला म्हटलं, ‘मला ब्लेड आणि दोरा पाहिजे.’ त्यानं घरात शोधलं. ब्लेड व दोराही सापडला. मी त्या दोऱ्याची एक गाठ आईच्या जवळ असलेल्या वाराच्या भागाला बांधली. दुसरी गाठ बाळाच्या बेंबीच्या दोन बोटं अंतरावर बांधली आणि ब्लेडनं दोन गाठीच्या मधोमध वार कापली. बाळ आईपासनं वेगळं झालं. बाळाला आईच्याच पदरानं पुसत असताना ते रडू लागलं. त्याला अर्जुनच्या हातात देत म्हटलं, ‘अकोल्याला जाऊन याला धनुर्वाताचं इंजेक्‍शन दे. जगलं वाचलं तर त्याचं नशीब.’

नशीब असं, की ते जगलं. अर्जुननं त्याला इंजेक्‍शन देण्यासाठी डॉक्‍टरकडे नेलं की नाही माहित नाही...पण तरीही ते जगलं. त्यानंतर आम्ही ढगेवाडीमध्ये मेडिकल कॅम्प्स घेतले. आणि प्रत्येक पाड्यामध्ये एका बाईला किंवा तरुणाला आरोग्यरक्षकाचं शिक्षण द्यायचं असं ठरवलं. अशा अनुभवांतून बरंच काही शिकायला मिळतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com