पुरुषार्थ विचार (परिमळ)

डॉ. नवनाथ रासकर
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

काही जुने विचार शाश्‍वततेचे वरदान घेऊन येत असतात. अशा विचारांनाच मूल्य म्हटले जाते. मूल्य म्हणजे मानवी जीवनाचे प्राप्तव्य किंवा ध्येय होय. माणसाने त्याच्या आयुष्यात काय आणि कसे मिळवावे, हे सांगते ते मूल्य होय. भारतीय परंपरेतील पुरुषार्थ विचार हा असाच एक शाश्‍वत मूल्यविचार आहे. ते अमूक एक मूल्य नसून, मानवी जीवनाला व्यापणारी एक मूल्यसरणी आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशी ही चार मूल्ये किंवा पुरुषार्थ होत. ‘पुरुषार्थ’ संकल्पनेतील पुरुष हा शब्द लिंगवाची नसून, मनुष्यवाची आहे. आपल्या शरीरातील चैतन्याचा अंश म्हणजे पुरुष होय. जीव किंवा आत्मा या अर्थानेही हा शब्द वापरला गेला आहे.

काही जुने विचार शाश्‍वततेचे वरदान घेऊन येत असतात. अशा विचारांनाच मूल्य म्हटले जाते. मूल्य म्हणजे मानवी जीवनाचे प्राप्तव्य किंवा ध्येय होय. माणसाने त्याच्या आयुष्यात काय आणि कसे मिळवावे, हे सांगते ते मूल्य होय. भारतीय परंपरेतील पुरुषार्थ विचार हा असाच एक शाश्‍वत मूल्यविचार आहे. ते अमूक एक मूल्य नसून, मानवी जीवनाला व्यापणारी एक मूल्यसरणी आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशी ही चार मूल्ये किंवा पुरुषार्थ होत. ‘पुरुषार्थ’ संकल्पनेतील पुरुष हा शब्द लिंगवाची नसून, मनुष्यवाची आहे. आपल्या शरीरातील चैतन्याचा अंश म्हणजे पुरुष होय. जीव किंवा आत्मा या अर्थानेही हा शब्द वापरला गेला आहे. आज आपण मनुष्य या अर्थाने त्याकडे पाहू शकतो. यावरून पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. आज पुरुषार्थ हा शब्द केवळ बोलण्यात आणि संकुचित अर्थाने वापरला जातो. उदा. तुझ्यात पुरुषार्थ नाही म्हणजे दम नाही, या अर्थाने व्यवहारात त्याच्याकडे पाहिले जाते.

पुरुष म्हणजे मनुष्य, तर अर्थ म्हणजे प्राप्तव्य, जे मिळवावे ते म्हणजेच मूल्य होय. पुरुषार्थ म्हणजे मानवी मूल्य. ‘पुरुषैः अर्थ्यते इति पुरुषार्थाः ।’ पुरुष ज्याची इच्छा बाळगतात ते पुरुषार्थ होय. आपल्या सर्व इच्छांची व्यवस्था चारी पुरुषांर्थामध्ये ऋषींनी लावलेली दिसते. हे पुरुषार्थ आपल्या जीवनात एकाचवेळी कार्यरत असतात. उभ्या- आडव्या धाग्यांनी बनलेल्या जाळीसारखे ते असतात. हाच आपला जीवनपट होय. हे चार पुरुषार्थ पुढीलप्रमाणे- धर्म हा पहिला व पायाभूत असा पुरुषार्थ होय. येथे त्याचा नेहमीचा अर्थ न घेता ‘नीती’ असा घेतला जातो. ज्याने समाजाची धारणा होते, तो धर्म म्हणजेच नीती होय. समाजातील संकेत, नियम यांचे पालन करणे म्हणजे नीती होय. अशा नीतीच्या अधिष्ठानावर अर्थाची प्राप्ती करावी. हा दुसरा पुरुषार्थ. अर्थ म्हणजे केवळ पैसा, संपत्ती नव्हे, उपजीविकेची सर्व साधने म्हणजे अर्थ होय. आपला निर्वाह नीतीने-न्याय्य मार्गाने करणे म्हणजे अर्थप्राप्ती, तर काम हा तिसरा पुरुषार्थ. अर्थातच सन्मार्गाने पैसा मिळवणे आणि त्याच मार्गाने आपल्या कामना पूर्ण करणे होय. उदा. विवाह हा धर्म्य मार्ग, त्याने आपली कामपूर्ती करणे. इतर सुखांचेही तसेच असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘जोडुनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारें वेच करी ।।’ योग्य मार्गाने धन मिळवा आणि ते विवेक व उदास होऊन खर्च करा. धर्म-अर्थ असे एक एक टप्पे पार केल्यावर जी समाधानाची अवस्था प्राप्त होते तीच मोक्ष होय. हा चौथा पुरुषार्थ, ज्यासाठी यातायात केलेली असते त्या आपल्या योग्य इच्छा पूर्ण झालेल्या असतात. मन निरिच्छ, निर्वासन झालेले असते. आणखी काही नको असते. मनाची ही अवस्था नकारात्मक नसते. तिच्यात ‘समाधान’ असते. हेच अर्थपूर्ण जीवन होय.

टॅग्स