संस्कार (पहाटपावलं)

डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

रस्त्यावर चुकून लागलेला कुणाचा धक्का किंवा चाकरमाणसांकडून होणाऱ्या चुका किंवा आपल्या मुलांकडून होणाऱ्या चुकांच्यावेळी कुठलाही आडपडदा न ठेवता अपशब्दांना मोकळे सोडतो. त्या वेळी आपल्याला कुठलेही संस्कार आठवत नाहीत? की हेच आपले संस्कार आहेत?

परवाच एक पालक आपल्या सोळा वर्षांच्या मुलीबद्दल बोलायला आले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती सारखी बाहेरच्या जगात वावरायला पाहात होती आणि तिचे तिच्या वर्गमित्राशी प्रेमसंबंधही होते. मी त्यांच्या मुलीशी बोलून तिला तिच्या मित्राला सोडून द्यायला सांगावे, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांचा त्रागा मला कळत होता. परंतु, मुलीशी बोलण्याआधी मी पालकांनाच काही प्रश्न विचारले. मुख्यतः मला हे जाणून घ्यायचे होते की घरातील वातावरण कसे होते आणि पालक आपल्या मुलीबरोबर किती वेळ घालवत होते. ते दोघेही नोकरी करत असल्यामुळे रात्रीचा थोडाच वेळ सगळे एकत्र घरी असतात, असे त्यांनी सांगितले.

सगळ्यांनाच काही ना काही कामे असल्यामुळे त्यांना फारसा एकत्र वेळ मिळत नव्हता. त्यानंतर मी मुद्द्याचे दोन प्रश्न विचारले- दिवसातून किंवा आठवड्यातून दोघेही पालक किती वेळा आपल्या मुलीला जवळ घेतात आणि किती वेळा आपल्या मुलीची कुठल्याही कारणांसाठी प्रशंसा करतात. माझे प्रश्न ऐकून दोघेही स्तब्ध झाले. "वयात आलेल्या मुलीला कुणी जवळ घेतं का डॉक्‍टर? आपली संस्कृती, आपले संस्कार तसे नाहीत,' असे ते म्हणाले. नंतर त्यांच्या मुलीशी बोलत असताना रडत-रडतच तिने सांगितले, "मला माझा मित्र आवडतो आणि आम्हाला दोघांनाही खूप शिकायचं आहे. प्रेम करायचा माझा विचार नव्हता, पण घरी कुणाला बोलायलाही वेळ नाही. थोडे जरी मार्क कमी पडले, तर दोघेही मला नको तसे बोलतात. कधी-कधीतरी रागाच्या भरात अपशब्दही उच्चारतात.'

मला तिच्या वडिलांचे शब्द आठवले आणि "हे आपले संस्कार आहेत काय?' असा प्रश्न माझ्या मनात आला. आज सगळीकडेच असे परस्परविरोधी वागणे दिसून येते. कुठेही प्रेम व्यक्त करण्याच्या आपल्या अस्वस्थतेला आपण संस्काराच्या आपल्याला माहीत नसलेल्या परिभाषेच्या आड लपवतो. परंतु, रस्त्यावर चुकून लागलेला कुणाचा धक्का किंवा चाकरमाणसांकडून होणाऱ्या चुका किंवा आपल्या मुलांकडून होणाऱ्या चुकांच्यावेळी कुठलाही आडपडदा न ठेवता अपशब्दांना मोकळे सोडतो. त्या वेळी आपल्याला कुठलेही संस्कार आठवत नाहीत? की हेच आपले संस्कार आहेत?

संस्काराचे महत्त्व आहेच, परंतु आज प्रत्येक व्यक्ती आपल्या सोईनुसार या शब्दाचा वापर करताना दिसते. हातात मद्याचा ग्लास घेऊन "आजची पिढी आपले संस्कार विसरली आहे,' अशी चर्चा करताना मी अनेकांना पाहिले आहे.

आज संस्कार या शब्दाचा अर्थ बदलायचा असेल तर हरकत नाही, परंतु आपल्यासाठी आणि इतरांसाठी तो अर्थ सारखाच असावा इतका प्रयत्न आपण केला तरी या संकल्पनेला पाठिंबा मिळेल असे मला वाटते.

Web Title: dr sapn sharma writes about life

टॅग्स