आयुष्याला रिमोट नाही

डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

इंग्रजी भाषा व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळं आपल्याला बऱ्याच संधी गमवाव्या लागल्या, हे माहीत असूनही आपण त्याबद्दल काहीच करत नाही. ते कुठल्याही रिमोटनं आपोआप साध्य होणार नाही. तुम्ही अगदी जन्मभर वाट पहिली तरी

आज बसल्या जागी बटणं दाबण्याचा जमाना आहे. प्रत्येक गोष्टीला म्हणे रिमोट आहे. टीव्हीचा रिमोट, सीडी प्लेअरचा रिमोट, डिश अँटिनाचा रिमोट, पडदे उघडण्याचा रिमोट आणि दिवे बंद करायचासुद्धा रिमोट. कुठे तरी मी हेही ऐकलंय की माणसेसुद्धा स्वतः दूर बसून दुसऱ्या माणसांकडून बसल्या जागेवरूनच आपला "दबदबा आणि प्रभाव' नावाच्या रिमोटचे बटण दाबून काम करवून घेतात!

थोडक्‍यात काय तर आजच्या जगात असा एक भास निर्माण होतो आहे की रिमोटनं सगळी कामं होतात, तेव्हा उगाचच हात-पाय हलवून मेहनत का करायची? विशेषतः तरुण मंडळींत असा समज मोठ्या प्रमाणात आढळून येतो. सुखवस्तू घरात तर हमखास "मला मेहनत करायची गरजच काय?' अशा दिमाखात बरीच तरुण मंडळी वावरताना दिसतात. बसल्या जागेवरूनच नोकरांना किंवा आईला पाणी इत्यादी आणण्याची ऑर्डर दिली जाते. मुलांना त्रास नको म्हणून किंवा त्यांची कटकट टळावी म्हणून घरची मंडळी त्यांच्या रिमोटपुढे नाचताना दिसतात आणि ही रिमोटशाही फक्त पाणी आणण्यापुरती मर्यादित नसते. शाळेतल्या नोट्‌स नाही लिहिल्या तर मित्रांकडून आणलेली वही पाहून आई किंवा वडील सहज लिहून देतात, कॉलेजमध्ये अटेन्डन्स कमी आहे? पालक आहेत ना हात जोडून परीक्षेला बसू देण्याची परवानगी काढायला. यांनी फक्त बसल्या जागी इमोशनल ब्लॅकमेल नावाचा रिमोट दाबायचा! काही पालकांना ते आवडतंसुद्धा. आपण आपल्या मुलांवर खूप प्रेम करतो, हे समाधान ते त्यातून मानतात; परंतु आयुष्याला रिमोट नसतो, हे त्यांना कोण सांगणार? "बाळा, मी तुला जन्मभर पुरणार नाही,' "मुली, तुझ्या घरी तुलाच सर्वांचं करावं लागणार आहे, त्यामुळे थोडी सवय कर.' "बॉस नावाचा प्राणी रागावला तर त्याचा राग घालवायला मी नाही येऊ शकत.' "प्रगती फक्त त्याचीच होते जो सतत त्या दिशेने वाटचाल करतो, रिमोट वापरून मिळवलेल्या नोकरीमुळे आयुष्यात हवी तशी प्रगती होणार नाही...' अशा आशयाच्या आणि अनेक जीवनावश्‍यक गोष्टी आपल्या लाडक्‍यांना कोण सांगणार?
इंग्रजी भाषा व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळं आपल्याला बऱ्याच संधी गमवाव्या लागल्या, हे माहीत असूनही आपण त्याबद्दल काहीच करत नाही. ते कुठल्याही रिमोटनं आपोआप साध्य होणार नाही. तुम्ही अगदी जन्मभर वाट पहिली तरी.

आज तुम्ही रोजचं आयुष्य जगण्यासाठी कुणाचा ना कुणाचा वापर करत असाल तरी "आयुष्याला रिमोट नाही' आणि ते चांगल्या पद्धतीनं जगायचं असेल तर आपल्यालाच उठून चॅनेल बदलावं लागेल आणि प्रत्येक टप्प्यावर पुन्हा पुन्हा उठून बदलावं लागेलञ, तरच मनासारखं जगता येईल.

Web Title: dr sapna sharma writes about life

टॅग्स