निरर्थक की अर्थपूर्ण? (पहाटपावलं)

डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

काहीही कारण नसलं तरी ते हमखास "डोकं दुखतं, घर लहान आहे, बॉस चांगला नाही, ऑफिस खूप लांब आहे...' अशी किरकोळ कारणं काढून तक्रार करत असतात. काहीच नसेल तर "देश बेकार आहे, सरकार भ्रष्ट आहे' किंवा "आपलं नशीबच खोटं' अशी तक्रार करतात. विशेष म्हणजे कुणी त्यांना त्यांच्या समस्येवर तोडगा सुचवला तर ते कसं शक्‍य नाही, हे पटवून देण्याच्या ते मागं लागतात

समुपदेशनाव्यतिरिक्तही मला बरेच जण असे भेटतात की ज्यांच्या मते त्यांचं आयुष्य पूर्णपणं निरर्थक झालं आहे. "काय तेच रोज सकाळी उठायचं, तीच कामं करायची, तेच जेवायचं, कशाला काही अर्थच नाही...' अशी काहीशी त्यांची तक्रार असते. काही व्यक्तींच्या आयुष्याला अर्थ आणि काहींच्या नाही, असं कसं शक्‍य आहे? निर्मात्यानं इतका भेदभाव केला असावा, याची शक्‍यता कमी वाटते. म्हणून मी काही व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करायला सुरवात केली. तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसाधारण व्यक्ती. बहुतेक जण नोकरी करणारे, दोन अपत्ये, घरात एक नाही, तर दोन वडीलधारी माणसं, सर्वसाधारणपणे सुखवस्तू, लहानसहान आजार सोडले तर सर्वांच्याच तब्येती चांगल्या. एकंदरीत कशाचीही कमतरता नसणारे. फक्त यांच्यातले काही जण आपल्या आयुष्यात खूष आहेत आणि काही जण सारख्या तक्रारी करत असतात.

या सर्वांशी बोलताना आणि त्यांच्या दिनचर्येचा अभ्यास करताना जो मोठा फरक लक्षात आला तो असा- जे लोक आनंदात असतात, ते हेतुपुररस्सर सतत कुठली ना कुठली नवीन आव्हानं स्वीकारत असतात. नवीन शिकतील, नाही तर घरातलं काही दुरुस्ती करतील; पण काही ना काही करत राहतात आणि त्या आव्हांनाना सामोरे जात असतात. ते त्यात इतके गुंतलेले असतात की तक्रारी करायलाच त्यांच्याकडे वेळ नसतो. शिवाय या व्यक्तींना समस्येकडे आव्हान म्हणून बघायची सवय असते. जेणेकरून आयुष्यातल्या लहान-मोठ्या समस्यांना ते सहज सामोरे जातात आणि त्यावर शक्‍य ते उपाय काढतात.

याउलट सतत तक्रारी करणाऱ्यांमध्ये एक साम्य असं दिसून येतं, की ते आयुष्यात सतत स्थैर्य शोधत असतात. त्यांच्या मते आयुष्यात एकही समस्या असेल तर ते आयुष्य चांगलं नाही; परंतु स्थैर्य असतानाही ते आनंदात असतात असं नाही. काहीही कारण नसलं तरी ते हमखास "डोकं दुखतं, घर लहान आहे, बॉस चांगला नाही, ऑफिस खूप लांब आहे...' अशी किरकोळ कारणं काढून तक्रार करत असतात. काहीच नसेल तर "देश बेकार आहे, सरकार भ्रष्ट आहे' किंवा "आपलं नशीबच खोटं' अशी तक्रार करतात. विशेष म्हणजे कुणी त्यांना त्यांच्या समस्येवर तोडगा सुचवला तर ते कसं शक्‍य नाही, हे पटवून देण्याच्या ते मागं लागतात.
समस्या असो किंवा नसो, कुठलं न कुठलं आव्हान स्वीकारत राहिलं तर आयुष्याला अर्थ येतो. काहीतरी नवीन शिका, कुठल्या तरी वृद्धाश्रमात किंवा अनाथालयात सेवा करा, देशाच्या समस्येविषयी लोकांना जागृत करा, गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा, नवीन बिझनेस सुरू करा, घरात बागकाम करा. काहीही करा; परंतु कुठलं तरी आव्हान स्वीकारत चला, नाहीतर आयुष्याला गंज चढेल.

Web Title: dr sapna sharma writes about life