उद्देश

life
life

साधारण चाळीशीच्या आसपास असलेल्या बहुतांश लोकांमध्ये आपल्या आयुष्यात काही तरी कमी आहे अशी भावना निर्माण होऊ लागते. काहींसाठी हे थोडं उशिराही होऊ शकतं आणि लवकरही. परंतु, जवळपास सर्वांनाच अधूनमधून वेगळीच हुरहुर जाणवते, विशेषतः त्या व्यक्तींना ज्यांनी त्या घटकेपर्यंत साधारणपणे यशस्वी आयुष्य जगलेले आहे. अशावेळी कुणाला आपल्या मनातलं बोललं की बरीचशी उत्तरं "सगळं छान चाललंय. उगाचच काही तरी काढू नको' या आशयाची असतात. परंतु, ज्यांनी जाणीवपूर्वक ही भावना अनुभवली आणि ओळखली आहे, त्यांचं या उत्तरानं समाधान होत नाही. पण खरंच भौतिक पातळीवर सर्व व्यवस्थित चाललेलं असल्यामुळे त्यांना सहज उत्तर मिळत नाही. कारण मुळातच हा अनुभव भौतिक नसून त्याच्या पलीकडचा आहे.

मनुष्य जन्म मिळण्याचं मूळ कारण आपल्याला आयुष्याच्या सुरवातीला कळत नाही. त्याचं कारणही तसंच आहे. मनुष्यरूपात आल्यावर आपलं सर्वप्रथम कर्तव्य म्हणजे मनुष्यधर्माचं, शरीरधर्माचं आणि भौतिकवादाचं पालन करणं. कारण मनुष्यरूपात असताना सर्वसाधारण मनुष्य भौतिकरीत्या समाधानी नसेल, तोवर पलीकडे विचार करण्याची त्याची क्षमता नसते. म्हणून अर्धे आयुष्य शिक्षण, नोकरी, नातेसंबंध, शरीरसुख, धन-संपत्ती इत्यादी अनुभवल्यानंतर आयुष्याच्या खऱ्या अर्थाचा शोध घेण्याची संधी आपल्याला दिली जाते आणि आपण तयार झालो की ती हुरहुर आपल्याला आठवण करून देण्यासाठी असते की आयुष्याचा उद्देश शिक्षण, नोकरी, पैसे, लग्न, मूल हे नसून दुसरं काहीतरी मोठं आहे. ती हुरहुर आपल्या आतल्या आवाजाची चाहूल असते, जेणेकरून भौतिकवादाचा गडद चष्मा काढून आपण पलीकडे पाहण्याचा प्रयत्न सुरू करू.

पुढची वाटचालही काही सोपी नाही, परंतु नित्यक्रमाच्या गुंतागुंतीतून थोडं वर उठून पुढची वाटचाल सुरू केली की रस्ता तर दिसतोच, शिवाय आयुष्याला वेगळा अर्थही मिळतो. आपल्यापेक्षा मोठं काही असल्याचा अनुभव येतो. अशा अनुभवांमुळे विनम्रता वाढते आणि अहंकारामुळे जोपासलेले राग, द्वेष, इर्ष्या, मत्सर सर्वच तुच्छ असल्याचं जाणवायला लागतं.

जे दिसतंय त्याच्या पलीकडे अनुभवायची क्षमता वाढली की आयुष्याची खरी सुंदरता दिसायला लागते. आपल्याला त्रास होत असलेल्या गोष्टी किरकोळ वाटायला लागतात. कोण कसा वागला, का बोलला किंवा बोलला नाही, कुणी पैसे परत केले नाही, कोणी चुगल्या केल्या किंवा कुणाचं घर तुमच्या घरापेक्षा मोठं आहे अशा आणि यांसारख्या सर्व गोष्टी किरकोळ भासायला लागतात.

एक लहान आवाज-आपलाच आणि आपल्याच आत दडलेला. परंतु, तो जेव्हा बोलायला लागतो तेव्हा तो ऐका. आयुष्याला नवीन दिशा मिळणार हे नक्की. परंतु, जे त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून भौतिकवादाचे ब्लॅंकेट स्वतःभोवती आणखी घट्ट आवळतात ते आजन्म भौतिकतेच्या आनंद-दुःख, प्रेम-द्वेष-मत्सर इत्यादींच्या चक्रात अडकून पडतात.

तुम्ही तुमची साद ऐकलीत काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com