घातक ‘सौदा’ (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

भोंदूबाबाला न्यायालयाने बलात्काराबद्दल दोषी ठरविले म्हणून आगी लावणे हे राज्यघटना, राज्यव्यवस्था यांना दिलेले उघड आव्हान होते. ही हिंमत होते, याचे कारण मतांच्या बेगमीसाठी राजकारण्यांकडून दिला जाणारा वरदहस्त.

निवडणुकांच्या राजकारणासाठी तथाकथित बाबा आणि बापू यांच्याशी सौदेबाजी केली की काय होऊ शकते, याची प्रचिती हरियानातील ‘डेरा सच्चा सौदा’ हा संप्रदाय व त्याचा प्रमुख गुरमीत ऊर्फ बाबा राम रहीम सिंग यांच्यापुढे सत्ताधाऱ्यांनी पत्करलेल्या पुरत्या शरणागतीवरून येते. या तथाकथित बाबावर शुक्रवारी बलात्काराचा आरोप शाबित झाला आणि त्यामुळे संतापलेल्या त्याच्या समर्थकांनी केलेल्या दंग्यामुळे ३६ लोक हकनाक प्राणास मुकले आणि काही हजार कोटींची मालमत्ता जळून खाक झाली. खरे तर हे देशाची घटना, तसेच एकूणातच राज्यव्यवस्था यांना सरळसरळ दिलेले आव्हान होते. तरीही हा आगडोंब उसळलेला असताना, हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यांवर पट्टी बांधून स्वस्थ बसले होते! गुजरातेतील एक भोंदूबाबा आसाराम आज लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गजाआड आहे; पण त्याच्यासारख्या अनेक भोंदू बुवांच्या पुढे पुढे करण्यात भाजप, काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनाही गैर वाटत नव्हते आणि नाही. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय या बेगुमान प्रवृत्ती एवढ्या फोफावणे शक्‍य नाही. राम रहीमच्या प्रकरणात खुद्द उच्च न्यायालयानेच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘तुम्ही भाजपचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात’, असे बजावले आणि मुख्यमंत्री खट्टर यांनाही चार मात्रा दिल्या आहेत. पण एवढे होऊनही हरियाना भाजपचे प्रभारी अनिल जैन यांनी ‘हरियाना सरकारने परिस्थिती योग्य रीतीने हाताळली’, असे जाज्ज्वल्य उद्‌गार काढले, तर भाजपचे खासदार साक्षीमहाराज यांनी तर हा बाबा राम रहीम एक ‘थोर आत्मा’ असल्याचे जाहीरपणे सांगून टाकले! विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने या तथाकथित ‘डेऱ्या’शी सौदा केल्याचा गौप्यस्फोट अन्य कोणी नाही तर या बाबाची कन्या म्हणविणाऱ्या मुलीने केला आहे. ‘तुम्ही भाजपचे २८ उमेदवार निवडून आणा; बाबावरील खटले मागे घेतले जातील’, असे ठरले होते, असा दावा तिने एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. तो खरा असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. 

हरियाना पोलिसांच्या साक्षीने बाबा राम रहीमच्या गुंडांनी दिवसभर सुरू ठेवलेल्या जाळपोळीच्या तसेच हाणामारीच्या सत्रामुळे काही मूलभूत प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. गेली १५ वर्षे लैंगिक अत्याचार, बलात्कार, खून तसेच पुरुषांचे लैंगिक खच्चीकरण करणे आदी आरोप असलेल्या या भोंदूबाबास समाजातून इतके पाठबळ कसे मिळू शकते? लोक बुद्धी गहाण ठेवून एखाद्याच्या चरणी एवढे लीन होत असतील तर त्यातून मिळणाऱ्या अनियंत्रित सत्तेचा उन्माद त्या व्यक्तीच्या डोक्‍यात न गेला तरच आश्‍चर्य. असे एकदा झाले, की मग कायदा, पोलिस, न्यायसंस्था, राज्यघटना या गोष्टी क्षुल्लक वाटू लागतात. आपण या सगळ्याच्या दशांगुळे वर आहोत, असा भ्रम तयार होतो. तो उतरविण्याऐवजी पोसण्यात काही सेलीब्रिटी, राजकारणी आणि त्यातही सत्ताधारीही धन्यता मानतात, हे दुर्दैव. 

मनोहरलाल खट्टर हरियानाच्या मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर लगेचच झालेल्या जाट आंदोलनाने दहा हजार कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्तेचा विध्वंस झाला. तरीही खट्टर यांची खुर्ची वाचवली गेली आणि आताही भाजप त्यांना ‘क्‍लीन चिट’ देत आहे. केरळमध्ये रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याबरोबर तेथील डाव्यांचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे भाजप आता ३६ लोकांच्या मृत्यूनंतरही खट्टर यांच्या राजीनाम्याची बात करायला तयार नाही. त्याचे कारण अर्थातच खट्टर यांची मुख्यमंत्रिपदी निवड अन्य कोणी नाही तर खुद्द मोदी यांनी केली, हेच आहे. बाबा राम रहीमला असलेल्या या प्रचंड पाठबळाचा प्रश्‍न मात्र आपले जातीय समाजकारण आणि राजकारण अधोरेखित करणाराच आहे. सच्चा डेराचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर मागास समाजातील आहेत. नाकारले गेल्याच्या भावनेतून आपला सामाजिक अवकाश शोधण्याच्या प्रयत्नांत ते अशा कुठल्या तरी संप्रदायाचा आधार घेतात. पण त्यांच्यासाठी काही चांगले काम करण्याऐवजी राम रहीमसारखे कथित बाबा अक्षरशः उतमात करतात. या बाबाने समर्थकांनाच नव्हे तर आपल्या सुरक्षाव्यवस्थेतील पोलिसांवरही अशी ‘मोहिनी’ घातली होती की त्याच्या ‘झेड’ सुरक्षा व्यवस्थेतील सात पोलिसांनी त्याला अटक करण्यास आलेल्या पोलिसांशी लढाईचा पवित्रा घेतला. एका सुरक्षारक्षकाची मजल तर थेट पोलिस महानिरीक्षकांच्याच कानाखाली वाजवण्यापर्यंत गेली. या भोंदू ‘धर्मसत्ते’ला ‘राजसत्ते’चे संरक्षण मिळते, हे दुर्दैव. ‘आम्ही पुरता भारत उद्‌ध्वस्त करून टाकू,’ अशा गमजा मारायलाही ते मागेपुढे पाहात नाहीत. निदान आता राम रहीमला शिक्षा फर्मावण्यात आल्यानंतर तरी काही अनुचित घडणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. अन्यथा, ‘या देशात धार्मिक, सांप्रदायिक हिंसेला थारा नाही,’ हे मोदी यांचे ‘मन की बात’मधील उद्‌गार केवळ शब्दांचे बुडबुडे ठरतील.