pahat pavale antarkar
pahat pavale antarkar

शब्दश्रुती (पहाटपावलं )

शब्दांविषयी मला अपार प्रेम, जिव्हाळा नि कुतूहल आहे. तसं ते प्रत्येक साहित्यप्रेमी लेखकाला आणि वाचकाला असतंच. पण मला बऱ्याचदा संभ्रम पडतो, की जन्म झाल्यापासून या विश्‍वातला पहिला शब्द कोणी उच्चारला असेल? "बायबल' या धर्मग्रंथाचा संदर्भ घेऊन विचार केला, तर समजा ऍडम किंवा ईव्ह हे विश्‍वोत्पत्तीनंतरचे पहिले मानव. मग या दोघांपैकी विश्‍वातला पहिला शब्द कोणी म्हटला? आणि म्हटला असेल, तर तो कोणता? की ही दोघं कायम नुसती सफरचंदंच खात जगत होती? 
वय वाढत गेलं आणि पेशाच साहित्यासंबंधीचा वाट्याला आला, तसे तर शब्द अवघ्या आयुष्यालाच जळवांसारखे कायमचे चिकटून बसले. आता शब्दांवाचून सुटका नाही. पुढे व्यासंग वाढत गेला, शब्दसहवास वेढू लागला, आधुनिक साहित्याचं वाचन विस्तारू लागलं, तशी शब्दांची अर्थपूर्णता आणि व्याप्ती कळू लागली. शब्दब्रह्माच्या विराट आणि गहनगूढ पसाऱ्यात जीव ढवळून निघाला. शब्दांची ही माया घडवताना किती प्रतिभावंत आणि प्रज्ञाप्रबुद्ध हातांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असेल! अगदी मराठीपुरतं बोलायचं झालं, तरी मायशारदेच्या वीणेच्या कंपनशील तारांवरून किती कुशल ज्ञात-अज्ञात हात फिरले असतील! 
शब्दांचं माहात्म्य सांगणारा आपल्या तुकोबांचा एक अभंग सर्वांनाच ठाऊक आहेः "शब्दचि हा देव; शब्देंची गौरव' वगैरे. शब्दांच्या मांडणीतून केवढी मोठी मानवतावादी गाथा त्या महामानवानं गुंफली! आजच्या समकालीन लेखक-कवींनीही विविध प्रकारे बदलत्या संदर्भातून शब्दांविषयी भाष्य केलेले आढळते. 
साहित्यात कुठेतरी वाचलेली शब्दांविषयीची एक सुंदर कल्पना लक्षात राहून गेली आहे. तो लेखक म्हणतो, ""शब्द लेखकाच्या हाती कसे येतात? ते काही विनासायास येत नाहीत. शोधावे लागतात. एखाद्या फळझाडाच्या घनदाट पर्णराजीत परिपक्व फळं दडलेली असतात. रसाळ, गोमटी, पानांची गर्दी बाजूला करून ही फळं खुडावी लागतात. शब्दांचं तसंच आहे. ते फळांसारखे शोधावे लागतात.'' 
शब्द चांगले असतात. तसे वाईटही असतातच. 
शब्दांनी काय साधतं? 
शब्दांनी प्रेम व्यक्त करता येतं. 
शब्द भांडणं, रुसवे घडवतात. 
शब्द अपशब्द उच्चारतात. 
शब्द तुम्हाला आर्त, दुःख, व्याकुळ करतात. कधी कधी शब्द तुमचा स्वधर्म किंवा स्वाभिमान जागवतात. शब्दांनी तुम्ही उत्कट होऊन जाता, तसे बेभानही होऊन जाता. शब्द कधी कधी रक्तपिपासू होऊन तुम्हाला बोचकारून रक्तबंबाळ करतात. शब्द प्रसंगी तुमच्या जखमांवर फुंकर घालून सांत्वन करतात. काही वेळा शब्द लेखकाला पराजितही करतात. 
शब्दांचे हिरवे रावे अलगदपणे प्रतिभेच्या अंगणात उतरतात आणि तुमचं चित्त वेधून घेतात. 
एखाद्या वेळी मात्र शब्द स्वतःच निःशब्द होण्याचा अवघड प्रसंग ओढवतो. 
आपल्याकडे कविजनांना "शब्दसृष्टीचे ईश्‍वर' म्हणून मानण्याची प्रथा आहे. पण ऍना ब्रॅंच या कवयित्रीला मात्र हे मान्य नसावं. ती म्हणते, ""ईश्‍वरानं या विलोभनीय विश्‍वात ढग, तारे, पक्षी आदींची निर्मिती केली खरी; पण शब्दांसारखी नितांत सुंदर अशी एकही वस्तू तो निर्माण करू शकला नाही.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com