उपाध्यक्षांचे उपाख्यान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील भाषणात आत्मपरीक्षणाचा सूर होता. या भाषणाला प्रतिसादही चांगला मिळाला; परंतु त्याला कृतीची जोड देणार की नाही, हा खरा प्रश्‍न आहे. त्यासाठी त्यांना "पार्टटाइम पोलिटिशियन'ची प्रतिमा पुसून टाकावी लागेल

स्वदेशी "होम पीच'वर भाषणबाजी करताना कायम अपयशी ठरलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कॅलिफोर्निया येथील बर्कले विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना चौकार-षटकारांची तुफानी आतषबाजी केली! राहुल यांच्या या संवादातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी आक्रमक पद्धतीने केलेले घराणेशाहीचे समर्थन आणि त्याच वेळी कॉंग्रेसला लागलेल्या अहंकाराच्या वाऱ्याबाबत दिलेली कबुली. बर्कले येथे जाऊन केलेल्या या भाषणामागील इंगित हे कॉंग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर घेण्यापूर्वी आपली प्रतिमा जागतिक स्तरावर अधोरेखित करणे, हे जरूर असणार; मात्र हे आत्मचिंतन पक्षाच्या पीछेहाटीचे एकूण स्वरूप पाहता सखोल आणि परिपूर्ण नाही आणि त्यांच्या अनेक विधानांतून नव्याने काही प्रश्‍न उद्‌भवतात. राहुल यांच्या भाषणातील कबुलीजवाबाचा हा सूर 1985 मध्ये मुंबईत झालेल्या कॉंग्रेस शताब्दी सोहळ्यातील राजीव गांधी यांच्या भाषणाची थेट आठवण करून देणारा होता. "कॉंग्रेसमध्ये सत्तेचे दलाल घुसले आहेत!' अशा तिखट शब्दांत तेव्हा राजीव यांनी पक्षावर कोरडे ओढले होते. मात्र, पुढे या दलालांना पक्षातून बाहेर काढण्यात मात्र त्यांना अपयश आले. आता राहुल हेही कॉंग्रेसला 2012 पासून लागलेला "अहंकाराचा वारा' किंवा आलेली मस्ती हेच पक्षाच्या अधोगतीमागील मुख्य कारण असल्याची जाहीर कबुली देत असले, तरी पक्षाची जवळपास सर्व सूत्रे हाती असतानाही या अहंकाराच्या वाऱ्याचे वादळ त्यांना रोखता का आले नाही, हा प्रश्‍न उरतोच. या अहंकाराच्या वाऱ्याचा साक्षात्कार त्यांना अचानक अमेरिकेत गेल्यावरच कसा झाला, असा प्रश्‍न कोणीही विचारू शकेल. शिवाय तो अहंकार आणि त्यानंतर पक्षाची झालेली पडझड रोखण्यासाठी त्यांनी स्वतः कोणती पावले उचलली, संघटनेत जान आणण्यासाठी किती परिश्रम घेतले, हाही प्रश्‍न विचारायला हवा.

भारतीय जनता पक्षाने 2014 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराची धुरा नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर दिल्यापासून, ते स्वत: तसेच अन्य नेते सातत्याने राहुल यांचा उल्लेख "राजपुत्र' म्हणून करत आले आहेत. भारतामध्ये कोणत्याही सभा-समारंभात बोलताना या मुद्‌द्‌यावरून राहुल हे कायम अडचणीत सापडल्याचे दिसून येते आणि त्यांना बचावात्मक पवित्रा घेणे भाग पडत असे. बर्कले येथे मात्र त्यांनी घराणेशाहीच्या या मुद्द्याला पुढे सरसावून सीमेरेषेबाहेर फेकून दिले. भारतात राजकारण असो, उद्योग असो की बॉलिवूड, सर्वच क्षेत्रात घराणेशाही आहे, असे ठासून सांगताना त्यांनी अखिलेश यादव आणि अभिषेक बच्चन अशी थेट उदाहरणेही दिली. त्यांचा घराणेशाहीचा मुद्दाही विचार करायला लावणाराच होता. आज लोकसभेत त्यांच्याभोवती वावरणारे सचिन पायलट असोत की ज्योतिरादित्य शिंदे असोत, हे घराणेशाहीचेच वारसदार आहेत. त्याबद्दल भाजपने नाकाने कांदे सोलता कामा नयेत; कारण केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा हे यशवंत सिन्हा यांचे चिरंजीव आहेत आणि पूनम महाजन काय किंवा पंकजा मुंडे काय किंबहुना देवेंद्र फडणवीस काय, त्यांची घराणी सगळ्यांनाच ठाऊक आहेत. त्यामुळे राहुल यांच्या या घराणेशाहीच्या समर्थनानंतर भाजपने गदारोळ माजवण्याचे काहीच कारण नव्हते.

पण तसा तो उडवला गेला. राहुल यांनी मोदी यांच्या वक्‍तृत्वशैलीचे आणि समोरच्याशी थेट संवाद साधण्याच्या कौशल्याचे मनमोकळेपणाने कौतुकही केले. त्यातील सच्चेपणा मात्र जाणवला. एकूणच राहुल यांच्या भाषणाला प्रतिसादही चांगला मिळाला. या प्रतिसादामुळे मग भाजपच्या नाकाला मिरच्या झोंबल्या नसत्या तरच नवल! त्यामुळेच त्यांनी तातडीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मैदानात उतरवले आणि त्यांनीही "अपयशी ठरलेल्या घराणेशाहीच्या वारसदाराने आपल्या राजकीय अपयशाची दिलेली कबुली' अशा शब्दांत बर्कले येथील मुक्‍त संवादाची संभावना केली. त्यामुळे राजकीय रंगमंचावर मोठेच वादळ उठले असून भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात जुगलबंदी सुरू झाली आहे. मोदी हे विदेशात ठिकठिकाणी जाऊन ठोकत असलेल्या भाषणांवर होणारी टीका असमर्थनीय आहे, असे भाजपचे बोलके पोपट शेकडो टीव्ही वाहिन्यांवरून सातत्याने सांगत आले आहेत. मग आता राहुल यांनी अमेरिकेत जाऊन काही वक्‍तव्ये केली तर त्याची खरे तर भाजपने दखलच घ्यायला नको होती. मात्र, त्यांचा संताप अनावर होणे, हे एका अर्थाने राहुल यांचे यश मानावे लागेल.

या पुढे कॉंग्रेसला लागलेल्या या अहंकाराच्या वाऱ्याची दिशा बदलतानाच, "आम आदमी'शी संवाद साधण्याचे मोठे काम राहुल यांनी स्वत:हूनच या भाषणामुळे आपल्या शिरावर घेतले आहे. त्यासाठी त्यांना आपला "पार्टटाइम पोलिटिशियन' हा बाज सोडून पूर्ण वेळ राजकारणाला वाहून घ्यावे लागणार आहे आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. आसाम कॉंग्रेसचे भूतपूर्व नेते हेमंत बिस्वा यांनीच आपण भेटायला गेलो असता, राहुल कसे कुत्र्याशी खेळत होते, हा सांगितलेला किस्सा सर्वश्रुत आहे. शिवाय, प्रत्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडेच सूत्रे असताना या वाऱ्याची लागण झाल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता राहुल यांना झडझडून कामाला लागावे लागणार आहे. अन्यथा, बर्कलेतील आत्मचिंतन "शब्द बापुडे केवळ वारा...' याप्रमाणे हवेत विरून जाऊ शकते.

Web Title: editorial