प्रदूषणाची राजधानी

delhi-pollution
delhi-pollution

दूषित धुक्‍यात हरवून गेलेल्या वाटा दिल्लीकरांना अंधुकशा का होईना दिसू लागल्या आहेत! याच महाभयानक प्रदूषणामुळे दिल्लीतील बांधकामांवर घातलेली बंदी आता उठवण्यात येत असून, हवेत काळ्याभोर प्रदूषित वायूचे फुत्कार टाकणाऱ्या ट्रक्‍स तसेच अन्य अवजड वाहनांवर घातलेली बंदीही मागे घेण्याचे संकेत दिले गेले आहेत. मात्र, याच दूषित हवेमुळे दिल्लीतील राजकीय सारीपाटावर नित्य नवे फासे टाकणाऱ्या राजकारण्यांनी आरोप-प्रत्यारोपांचे नवेच धुके उभे करून, आरोपीच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उभे करण्याचे सुरू केलेले प्रयत्न हे या प्रदूषणापेक्षाही अधिक अश्‍लाघ्य आहेत. या राजकीय शह-काटशहाच्या खेळात दिल्लीतील प्रदूषणावर काहीही उपाययोजना तातडीने अमलात येणे कठीण झाल्याचे वाटल्यामुळेच अखेर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिल्लीकर जनतेनेच पुढे येऊन हा प्रदूषणविरोधी लढा हातात घेण्याचे आवाहन केले आहे. प्रदूषणाची कारणे शोधात वेळ घालवू नका, असा सल्ला दिल्लीकरांना देताना विराट म्हणतो : "अगर हमे प्रदूषण के खिलाफ ये मॅच जितना है, तो सब को साथ मिल के खेलना होगा!' लोकांनी मेट्रो, बस अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा आणि शक्‍य तोवर आपली खासगी वाहने रस्त्यात आणून प्रदूषणात भर घालू नये, असे विराटचे दिल्लीकरांना कळकळीचे आवाहन आहे. मात्र, त्याचवेळी एकीकडे दिल्ली सरकार विरुद्ध पर्यावरण आयोग यांच्यात गेला संपूर्ण आठवडा या प्रश्‍नातून मार्ग कसा काढावा, याबाबत वाद सुरू आहे; तर केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारबरोबरच अन्य पक्षही या मुद्यावरून केजरीवाल यांना येनकेन प्रकारेण अडचणीत आणण्याच्या संधी शोधत आहे.

दिल्लीकरांना प्रदूषण नवे नाही आणि दरवर्षी थंडीचा मोसम आला की शेजारच्या राज्यातील शेते रापण करण्याच्या म्हणजेच पीक कापणी झाल्यानंतरचे खुडवे पेटवून देण्याच्या कार्यक्रमामुळे राजधानीवर येणारे थंड हवेचे वेगवान झोत हे सोबत प्रदूषित हवाही घेऊन येत असतात. मात्र, यंदा हे वारे आणि त्यासोबत येणारी दूषित हवा यांनी कळस गाठला आणि अवघ्या दिल्लीवर याच विखारी हवेची चादर पांघरली गेली. त्यामुळेच त्यातून मार्ग काढण्यासाठी केजरीवाल यांनी राजधानी लगतच्याच हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांची भेट घेतली. याच प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी केजरीवाल हे खट्टर तसेच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत होते. कॅप्टनसाहेबांनी अशा चर्चेस ठाम नकार दिला; मात्र त्यानंतर लगेचच दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय माखन यांनी केजरीवाल यांच्यात प्रदूषणास आळा घालण्यासाठी आवश्‍यक ती इच्छाशक्‍तीच नाही, असा आरोप "फेसबुक'वरून केला. दिल्लीतील सार्वजनिक व्यवस्था "बेकार' असल्यामुळेच लोकांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो, असा शेरा मारताना या "बेकार' व्यवस्थेसाठी त्यांनी केजरीवाल यांना जबाबदार ठरवले. त्याचवेळी दिल्लीत आधीची 15 वर्षे कॉंग्रेसचे सरकार होते आणि नेमक्‍या त्या काळातच झालेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दुर्दशेकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले. अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंह बादल यांनीही या संधीचा फायदा घेऊन, "नाही तरी कॅप्टनसाहेब कोणालाच भेटत नाहीत, तेव्हा केजरीवाल यांनी वाईट वाटून घेऊ नये!' अशा शब्दांत अमरिंदर सिंग यांना चिमटा काढला.
मात्र, या राजकीय सुंदोपसुंदीपेक्षाही भयंकर आहे ते माहिती अधिकाराच्या कायद्यामुळे बाहेर आलेले वास्तव. दिल्ली सरकारने पर्यावरण नियंत्रणासाठी लावलेल्या करातून जवळपास 700 कोटी रुपये जमा केले; मात्र त्याबाबतच्या उपाययोजनांसाठी खर्च पडलेली रक्‍कम ही फक्‍त 93 लाख आहे, असा गौप्यस्फोट यानिमित्ताने झाला आहे. हे खरे असेल तर ते भयंकर आहे आणि त्यास केजरीवाल सरकारची मनमानी पद्धतीने काम करण्याची वृत्तीच कारणीभूत आहे. आता हे वास्तव बाहेर आल्यानंतर केजरीवाल सरकार, या रकमेचा विनियोग दोन हजार इलेक्‍ट्रिक म्हणजेच प्रदूषणविरहित बसगाड्या खरेदीसाठी करणार असल्याचे सांगत आहे. दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आवश्‍यक तो निधी असल्यामुळे ही रक्‍कम रस्ते दुरुस्तीसाठी वापरता येणार नाही. त्यामुळेच या रकमेतून सार्वजनिक व्यवस्था मजबूत आणि प्रदूषणविरहित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा सरकारचा दावा आहे. त्यासाठी केजरीवाल यांनी मंगळवारीच एक बैठकही आयोजित केली होती. अर्थात, अशा प्रकारची बैठक घेण्याची उपरती केजरीवाल यांना झाली ती दिल्लीतील महाप्रदूषणाच्या धास्तीमुळेच. मोदी सरकारही हा मोका साधून केजरीवाल सरकारला अडचणीत आणण्याचे डावपेच खेळत आहे, हेही दिल्लीतील राजकीय प्रदूषण कोणत्या स्तराला गेले आहे, त्याचेच द्योतक आहे. एकीकडे "राष्ट्रीय हरित लवाद' केजरीवाल सरकारला या इतक्‍या महत्त्वाच्या विषयावरून पेचात पकडू पाहत आहे आणि त्याचवेळी प्रदूषणाचे सर्वपक्षीय राजकारण सुरू झाले आहे. दिल्लीतील हवा तर दूषित आहेच; त्यामुळे जनतेला एकाच वेळी नैसर्गिक तसेच राजकीय प्रदूषणाशी लढा द्यावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com