पाकिस्तानी उद्दामपणा

Hafiz Saeed
Hafiz Saeed

देशाची आर्थिक राजधानी म्हणून जगाच्या नकाशावर ठळकपणे नाव कोरणाऱ्या मुंबई महानगरावर 26/11च्या त्या भीषण काळरात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या कटू स्मृतिदिनास अवघे चार दिवस उरले असतानाच, या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि "जमात- उद- दावा' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याच्या सुटकेचे आदेश येणे, हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायिक आढावा मंडळाने हे आदेश दिल्याबरोबर हाफीजने उधळलेली मुक्‍ताफळेच त्याची साक्ष आहेत. "आपल्या सुटकेच्या आदेशामुळे अखेर सत्याचा विजय झाला असून, काश्‍मीरचा लढा आपण आता नव्या जोमाने सुरू ठेवणार आहोत!' असे तारे हाफीजने तोडले आहेत. अर्थात, यात फार काही नवे नाही; कारण याच वर्षीच्या जानेवारीत त्यास अटक करण्यात आली, तेव्हाही त्याने "हा आंतरराष्ट्रीय कटाचा एक भाग असून, काश्‍मीरच्या स्वतंत्रतेसाठी सुरू असलेल्या लढ्यात घातपात करण्याचा हा प्रयत्न आहे,' असे उद्‌गार काढले होते. मुंबापुरीवरच्या त्या आजवरच्या सर्वांत भीषण दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजूनही केवळ मुंबईकरांच्याच नव्हे, तर देशभरातील जनतेच्या मनात भळभळत असताना, हाफीजच्या सुटकेचे आलेले वृत्त समस्त भारतीयांना मोठाच धक्‍का देणारे आहे. दहशतवादाच्या बाबतीत जगाकडून पाकिस्तानवर आणला जाणारा राजनैतिक दबाव किती तकलादू आहे, हेही या निमित्ताने दिसले.

देश-विदेशांतील 166 निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या मुंबईवरील त्या हल्ल्याचा सूत्रधार हाफीजच होता, हे केवळ भारताचेच नव्हे, तर अमेरिकेचेही मत होते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दहशतवादी कारवायांचा सूत्रधार असलेल्या हाफीजला पकडून देणाऱ्यास 2012 मध्येच अमेरिकेने एक कोटी डॉलरचे भले मोठे इनाम जाहीर केले होते. तरीही केवळ पाकिस्तान सरकारने दाखवलेला हलगर्जीपणा आणि अटकेच्या प्रक्रियेतील तांत्रिक चुका यामुळेच हाफीज आता पुन्हा मोकाट सुटणार, हे उघड झाले आहे. त्यामुळे आता या घटनेचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटतील.

मुंबईवर झालेला तो भीषण हल्ला "लष्करे तैयबा' या पाकिस्तान पुरस्कृत संघटनेनेच केला होता, याबाबत आता कोणताही संदेह राहिलेला नाही आणि हाफीज हाच या संघटनेचा संस्थापक होता. पुढे त्याने "लष्करे तैयबा'शी आपले संबंध तोडून टाकले आणि दुसरी संघटना उभारली. ही संघटना समाजकार्य करणारी संघटना आहे, असे हाफीज आणि त्याचे सहकारी आजवर सांगत आले असले, तरी प्रत्यक्षात ती "लष्करे तैयबा'चीच एक "फ्रंट' आहे, हेही निर्विवादपणे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच मुंबईवरील हल्ल्यानंतर हाफीज; तसेच त्याच्या अन्य काही सहकाऱ्यांना आपल्या ताब्यात देण्याचा आग्रह भारताने धरला होता. मात्र, पाकिस्तानने तो मान्य केला नाही. मात्र, अखेर आंतरराष्ट्रीय दबावाखाली हाफीज आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना "नजरकैदे'त का होईना, ठेवणे पाकिस्तानला भाग पडले होते. त्यातही या कैदेच्या मुदतीपेक्षा अधिक काळ त्याला अडकवून ठेवले गेले आणि त्यामुळे गेल्या महिन्यातच नोव्हेंबरअखेरीस त्याच्या सुटकेचे आदेश या न्यायिक आढावा मंडळाने दिले होते. त्यानंतर पाकिस्तान सरकारने भले त्याच्या कैदेस आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मागण्याचे नाटक केले असले, तरी ते या मंडळाने मान्य केले नाहीत. हा सारा घटनाक्रम बघता पाकिस्तान सरकारने हाफीजच्या सुटकेसाठीच हा सारा घोळ घातल्याचे स्पष्ट होते. हे संतापजनक आहे आणि अमेरिकी सिनेटने अलीकडेच एक ठराव करून "राष्ट्रीय संरक्षण कायद्या'त केलेल्या बदलामुळे आता अमेरिकेचे लक्ष्य हे "लष्करे तैयबा' वा "जमात- उद- दावा' या संघटनांऐवजी "हक्‍कानी नेटवर्क' असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचा फायदा पाकिस्तानने उठवत हाफीजची सुटका होण्याच्या दिशेने पावले उचलली असावीत, असे आता सांगितले जात आहे. त्याचे आणखी एक कारण म्हणजे काश्‍मीर प्रश्‍न जिवंत राहण्यावर पाकिस्तानचे भवितव्य अवलंबून आहे. आता पाकिस्तानच्या या उपद्‌व्यापांबाबत अमेरिका नेमका कोणता पवित्रा घेते, यावर बरेच काही अवलंबून आहे.

पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा हाफीजच्या अटकेकडे कितपत गांभीर्याने बघत होत्या, यावरच प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे. पाकिस्तानच्या लष्करात हाफीजचे अनेक सहानुभूतीदार आहेत. त्यांनीच हा अटकेचा तसेच त्याच्या सुटकेचा बनाव नियोजनबद्ध पद्धतीने घडवून तर आणला नाही ना, अशीही चर्चा आता राजनैतिक वर्तुळात सुरू झाली आहे. "लष्करे तैयबा'च्या सूत्रधारांवर कारवाई व्हावी, या भारताच्या मागणीलाच यामुळे मोठा धक्‍का बसला. या सुटकेच्या आदेशानंतर हाफीजने लगोलग काढलेल्या उद्‌गारांना ही अशी पार्श्‍वभूमी आहे. कायदेकानून धाब्यावर बसवून केलेली अटक हीच मुळात आपल्या मूलभूत हक्‍कांवर गदा आणणारी होती, असेही हाफीज आता संभावितपणे सांगत आहे. त्यामुळे भारताने आता या प्रकरणी अत्यंत कठोर भूमिका घ्यायला हवी; तसेच पाकिस्तानचा खरा चेहेरा जगासमोर आणण्यासाठी आणखी जोमाने राजनैतिक मोहीम चालवावी, तरच 26/11 च्या हल्ल्यात हकनाक बळी गेलेल्यांच्या आत्म्यास खऱ्या अर्थाने शांतता लाभू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com