बेजबाबदारपणाचा बळी

बेजबाबदारपणाचा बळी

कोणे एके काळी टीव्हीची शेकडो चॅनेल्स घराघरांत घुसण्याआधीही भारतात बॉलिवूडने राज कपूरपासून दिलीपकुमारपर्यंत आणि देव आनंदपासून राजेश खन्नापर्यंत अनेक ‘सुपरस्टार’ निर्माण केले होते. त्यांना आपल्या चित्रपटांच्या ‘प्रमोशन’साठी रसिकांचे उंबरठे झिजवावे लागत नसत आणि तरीही त्यांनी उभ्या केलेल्या प्रतिमा कित्येक दशके उलटली तरीही जनमानसात घर करून आहेत. मात्र, काळ बदलला आणि आपल्या कलाकृतींच्या ‘प्रोमो’साठी आता कलावंत व निर्माते विविध प्रकारचे फंडे लढवत आहेत. गुरुवारी प्रदर्शित होणाऱ्या आपल्या ‘रईस’ या चित्रपटाच्या ‘प्रोमो’साठी एरवी खासगी विमानाने फिरणाऱ्या ‘किंग खान’ शाहरुखने ऑगस्ट क्रांती एक्‍स्प्रेसने मुंबई ते दिल्ली असा प्रवास करण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच या ‘सुपरस्टार’चे ओझरते का होईना दर्शन व्हावे म्हणून स्थानका-स्थानकांवर अलोट गर्दी लोटणार, हे दिसत होते. खरे तर एखाद्या चित्रपटाच्या ‘प्रोमो’साठी लढवलेल्या अशा क्‍लृप्त्यांची दखलदेखील घेण्याची गरज नाही; पण याच गर्दीत बडोद्यात एका व्यक्तीचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. त्यामुळेच या ‘प्रमोशन’च्या फंड्यांभोवती वादाचे मोहोळ उभे ठाकले आहे. 

खरे तर समाजवादी पक्षाचा फरीद खान पठाण हा शाहरुखच्या दर्शनासाठी रेल्वे स्थानकावर गेला नव्हता. त्याची भाची पत्रकार असून, ती शाहरुखबरोबर प्रवास करत होती. तिला भेटण्यासाठी फरीद गेला होता. मात्र, शाहरुखच्या चाहत्यांनी स्थानकावर केलेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि काही जण जखमी झाले. त्याच गदारोळात फरीदला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचे निधन झाले. बडोदा स्थानकावर इतकी प्रचंड गर्दी होती की, ती आवरण्याच्या ताणामुळे दोन सुरक्षारक्षकही बेशुद्ध पडले. आता रेल्वे मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच शाहरुखनेही या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्‍त केले आहे.  अर्थात, या चौकशीतून काय निष्पन्न होणार हा प्रश्‍नच आहे. शाहरुखला एक नागरिक म्हणून रेल्वेने प्रवास करण्याचा हक्‍क आहेच; मात्र त्याचा ‘फॅन क्‍लब’ लक्षात घेता, गर्दीला आवरण्याची चोख व्यवस्था रेल्वेने ठेवणे जरुरीचे होते. गर्दी किती होईल, याचा अंदाज पोलिस व प्रशासनाला यायला हवा होता. त्याबाबत दाखवलेल्या बेजबाबदारपणामुळेच एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आणि ‘चित्रपटा’च्या प्रोमोपेक्षाही याच घटनेची बातमी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com