पेपरफुटीनंतरची बेफिकिरी...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

पेपर आदल्या दिवशी फुटो की अर्धा तास आधी, त्यातून संबंधितांचे हेतू साध्य होतात, यात शंका नाही. त्यामुळेच शिक्षणमंत्र्यांनी ‘हा निव्वळ खोडसाळपणा आहे!’ असे सांगून त्याचे गांभीर्य कमी करू नये. कारण अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्‍वासच उडू शकतो.

पेपर आदल्या दिवशी फुटो की अर्धा तास आधी, त्यातून संबंधितांचे हेतू साध्य होतात, यात शंका नाही. त्यामुळेच शिक्षणमंत्र्यांनी ‘हा निव्वळ खोडसाळपणा आहे!’ असे सांगून त्याचे गांभीर्य कमी करू नये. कारण अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्‍वासच उडू शकतो.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत पेपरफुटीचे जणू पेवच फुटले आहे आणि त्याचा कळस महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षांमध्ये गाठला गेला आहे! बारावीच्या परीक्षांचे पेपर एकामागोमाग फुटत असून ‘व्हॉट्‌सॲप’सारख्या हातोहाती असलेल्या लोकप्रिय माध्यमाद्वारे ते थेट विद्यार्थ्यांच्या हातात पडत आहेत. गेल्या आठवड्यात परीक्षा सुरू झाल्यापासून पाच दिवसांत बारावीच्या पाच प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती लागत गेल्या आणि मंडळाचे हसू तर झालेच; शिवाय हे मंडळ हे काम किती बेजबाबदारपणे करते, यावरही प्रकाश पडला. मात्र, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना झाला प्रकार हा ‘पेपरफुटी’चा वाटतच नाही. त्यांच्या मते हा खोडसाळपणा आहे! गेल्या महिन्यात लष्करभरतीच्या परीक्षांचे पेपर फुटले, तेव्हाच वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विद्यार्थ्यांचे तथाकथित मार्गदर्शक वर्ग चालवणारे संचालक यांच्यातील कथित हातमिळवणीबाबत शंका घेतली गेली होती. आताही परीक्षा मंडळ आणि काही संबंधितांचे याबाबत असलेले लागेबांधे यातून दिसू लागले आहेत. शिक्षणमंत्री याला खोडसाळपणा म्हणतात, त्याचे कारण ज्या काही प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती लागल्या, त्या परीक्षा सुरू होण्यास काही मिनिटांचा अवधी असताना आणि त्यामुळेच त्याचा विद्यार्थ्यांना काहीही फायदा होऊ शकत नाही! तावडे हे काही असले अजब तर्कट लढवून  थांबलेले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार पेपरफुटीची व्याख्या अशी की प्रश्‍नपत्रिका आदल्या दिवशी वा परीक्षेच्या आधी किमान काही तास विद्यार्थ्यांच्या हाती लागल्या तरच प्रश्‍नपत्रिका फुटल्या, असे म्हणता येईल! खरे तर पेपरफुटीपेक्षाही हे बेजबाबदार वक्‍तव्यच अधिक गांभीर्याने घ्यावे लागेल.

बारावीचे पेपर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या हाती लागत आहेत, त्यात एक ठराविक मालिका आहे. हल्ली विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नियोजित वेळेआधी अर्धा तास हजर व्हावे लागते. नेमक्‍या याच अर्ध्या तासात पेपर ‘व्हॉट्‌सॲप’वर उपलब्ध होतात आणि क्षणार्धात ते ‘व्हायरल’ होतात! हे काम नेमके कोण करते, याच्या खोलात गेले तर परीक्षा केंद्रांवरील संबंधित अधिकारीच ते काम करत असणार, हे सांगायला होरारत्नाची गरज नाही. सोमवारी बारावीचा गणित आणि संख्याशास्त्राचा पेपर मात्र किमान ३५-४० मिनिटे आधी जगजाहीर झाला. गणितासारख्या विषयात या फुटलेल्या पेपरचा लाभ उठवण्यास तेवढा वेळ पुरेसा नाही काय? अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसारख्या संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी काम केले आहे, त्या तावडे यांना या प्रश्‍नाचे उत्तर ठाऊक असायला हरकत नाही. एकदा प्रश्‍नपत्रिका वर्गाबाहेर गेली की मग संबंधित शिक्षक वा क्‍लासेसचे चालक या ना त्या माध्यमातून आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत त्याची उत्तरे पोचवणार, हे उघड आहे. दहावी, तसेच बारावी या परीक्षांमध्ये होऊ घातलेल्या कॉपीचे प्रमाण लक्षात घेतले की, मग हे पेपर केव्हाही फुटले, तरी त्यामुळे विद्यार्थ्यांचा लाभ तो होणारच, हे लक्षात घ्यायला हवे. त्याचे कारण म्हणजे हे पेपरफुटीचे पेव फुटल्यानंतर योगायोगाने नंदुरबार येथील नवापूर परिसरात सुरू असलेले कॉपी प्रकरणही उघड झाले आहे. तेथे खिडक्‍यांमधून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवली जात असल्याचे दिसून आले. अर्थात, हे केवळ नवापूर परिसरातच घडत असेल, असे नाही. त्यामुळे पेपर आदल्या दिवशी फुटो की अर्धा तास आधी, संबंधितांचे हेतू साध्य होतातच, याबाबत शंका नसावी. त्यामुळेच शिक्षणमंत्र्यांनी ही बाब प्रतिष्ठेची न करता आणि मुख्य म्हणजे ‘हा निव्वळ खोडसाळपणा आहे!’ असे सांगून ती उडवून लावता कामा नये. तसे झाल्यास विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्‍वासच उडू शकतो. अलीकडेच परीक्षांचे परीक्षापण आपण गमावत चाललो आहोत. या पार्श्‍वभूमीवर तर ही बाब अधिकच गांभीर्याने घ्यायला हवी. 

एकीकडे खासगी क्‍लासचे पेव फुटत चालले आहे आणि तेथे गेल्याशिवाय चांगले यश मिळणेच कठीण असा समज पसरत चालला आहे. या क्‍लासचालकांचे परीक्षा मंडळाशी असलेले लागेबांधे उघड असतात आणि अनेकदा ते चव्हाट्यावरही आले आहेत. हे क्‍लासचालक अनेकदा महत्त्वाचे प्रश्‍न ऐनवेळी ‘व्हॉट्‌सॲप’वरूनच विद्यार्थ्यांना पुरवत असतात. त्याचा या पेपरफुटीशी काही संबंध आहे काय, याचीही शहानिशा होणे जरुरीचे आहे. मात्र, त्यापलीकडची बाब म्हणजे आता कोणत्याही अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ वा अन्य ‘सीईटी’ असतात, त्यामुळे या परीक्षांचे एवढे काय, असा तावडे यांनी लावलेला सूरही धक्कादायक आहे. आपल्याच अखत्यारीतील शिक्षण मंडळावर एकप्रकारे ते अविश्‍वास दाखवीत आहेत, असा याचा अर्थ होत नाही काय? त्यामुळे तांत्रिक बाबींमध्ये न अडकता, शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना विश्‍वासात घ्यावे आणि असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी एवढीच अपेक्षा आहे. बाकी शिक्षणाच्या एकूण दर्जाचे काय झाले आहे, ते आपण बघतोच आहोत!

Web Title: editorial artical