संभावितांना वेसण

संभावितांना वेसण

देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढचे अतिशय गंभीर आव्हान असलेले नक्षलवादी आणि बाह्यजगत यांच्यात दुवा म्हणून काम करणाऱ्या प्रा. जी. एन. साईबाबासह पाच जणांना गडचिरोलीच्या न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा सर्वार्थाने ऐतिहासिक आहे. शेकडो निरपराधांची हत्या करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या ‘फ्रंटल’ संघटनांचा फसवा प्रचार या निकालामुळे पहिल्यांदाच चव्हाट्यावर आला आहे.

नक्षलवाद्यांच्या कामाची विशिष्ट पद्धत आहे. त्यांच्या ‘फ्रंटल ऑर्गनायझेशन’ म्हणजे वेगवेगळ्या नावांच्या आघाड्या शहर, निमशहरी भागांतून पांढरपेशे चेहरे घेऊन वावरत असतात. वरकरणी त्यांचा अजेंडा परिवर्तन, प्रबोधन वगैरे असतो. पण, त्या नावाखाली नक्षलवाद्यांना मदत करणे, त्यांना केडर पुरवणे, त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करणे आणि देशविघातक ‘इंटलेक्‍च्युअल’ घडवणे हे सारे सुरू असते. थेट बंदूक घेऊन फिरणाऱ्या अनेक नक्षलवाद्यांना अटक झाली, शिक्षाही झाल्या. पण, बंदुकीविनादेखील अत्यंत विघातक असलेल्या साईबाबासारख्या ‘थिंक टॅंक’चा म्होरक्‍या प्रथमच कायद्याच्या जाळ्यात अडकला आहे. 

एखाद्या संघटनेला जेरीस आणण्यासाठी निवडक पोलिस अधिकारी संघटित झाले तरी काय होऊ शकते, याचे उदाहरण गडचिरोलीतील या निवाड्याच्या निमित्ताने समोर आले आहे. मात्र, अशा प्रकारच्या ‘थिंक टॅंक’शी किंवा ‘इंटलेक्‍च्युअल बटालियन’शी संबंधित असलेला प्रा. साईबाबा हा एकमेव नाही, हे यासंदर्भात लक्षात घेतले पाहिजे. परिवर्तनवादी विचारांच्या नावाखाली तरुणाईची माथी भडकावणाऱ्या असंख्य संघटनांमधून अशा साईबाबांचा सुळसुळाट आहे. परिवर्तनवादी विचारांना विरोध करण्याचे कारण नाही. त्यांची समाजाला गरज आहेच. मात्र, लोकशाही व्यवस्थेवरील सामान्यांचा विश्‍वासच उडावा, असा प्रचार नक्षलवाद्यांचे हे शहरी प्रतिपालक करीत असतात. ‘लोकशाही ही दमनकारी व्यवस्था आहे,’ असे सांगत ते ती संपवण्याची भाषा करीत असतात. विषमतेमुळे समाजात असलेली अस्वस्थता ते नकारात्मक कामांसाठी वापरतात व तरुणाईची माथी भडकावतात. अशांच्या मुसक्‍या आवळण्याची प्रक्रिया या निकालापासून सुरू झाली असे मानता येईल. नक्षलवाद्यांना खऱ्या अर्थाने आधार, ज्ञान व रसद देणारे असे साईबाबा अनेक आहेत. विचारांच्या प्रांतात त्यांचा उन्मुक्त संचार सुरू आहे. लोकशाहीविरुद्ध अपप्रचार सुरू आहे. अंतर्गत सुरक्षेपुढे बंदूकधारी आणि निःशस्त्र अशा दोन्ही प्रकारच्या नक्षलवाद्यांचे आव्हान आहे. साईबाबासारख्या इतर निःशस्त्र नक्षलवाद्यांचाही आता कायमचा बंदोबस्त व्हायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com