खिलाडूवृत्ती पायचीत!

खिलाडूवृत्ती पायचीत!

अलीकडच्या काळात खेळण्याच्या आणि सामने जिंकण्याच्या विचारसरणीतच आमूलाग्र बदल झाल्याचे दिसते. पण काळ बदलला म्हणून खिलाडूवृत्ती बदलण्याचे कारण नाही. म्हणजे प्रश्‍न आहे तो तिच्या अभावाचा. कांगारूंच्या कर्णधाराच्या वर्तणुकीतून तेच दिसले.

कोण म्हणतो क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे? भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरतो तेव्हा तर तो त्यांच्यासाठी निश्‍चितच नाही. किंबहुना, भारताला हरविण्यासाठी जे काही ज्ञात-अज्ञात मार्ग आहेत, त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वापर करायचा आणि सभ्यता बासनात गुंडाळायची हीच जणू काही वृत्ती सोकावली चालली आहे आणि यात आघाडीवर कोण आहे तर अनेकवेळा अजिंक्यपद पटकाविणारा ऑस्ट्रेलिया. आपला संघ हरू नये म्हणून १९८१ मध्ये बंधू ट्रॅव्हर चॅपेलला अखेरचा चेंडू अंडरआर्म टाकण्याचा सल्ला देणाऱ्या इयान चॅपेलचा ऑस्ट्रेलिया संघ आणि मंगळवारी ‘डीआरएस’च्या नियमासाठी मदत मागणाऱ्या स्टीव स्मिथचाही ऑस्ट्रेलिया संघच. म्हणजेच ३६ वर्षे उलटली तरी प्रवृत्ती काही बदलली नाही.

‘डीआरएस’ अर्थात ‘डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम.’ म्हणजे पंचांनी दिलेल्या निर्णयाचे पुनरवलोकन. क्रिकेटमधील नव्या नियमाच्या या संज्ञेत मंगळवारी बदल झाला. ‘ड्रेसिंगरूम रिव्ह्यू सिस्टीम’ अशा नावाने मग भारतीयांनी ‘ऑसी’ची खिल्ली उडविण्यास सुरवात केली. पंचांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध दाद मागायची की नाही हे खेळाडूंनी स्वतःशीच चर्चा करून ठरवायचे असते. त्यासाठी मैदानाबाहेरून मदत घेणे म्हणजे लबाडी करण्यासारखे आहे. क्रिकेट हा खेळ अधिकाधिक प्रामाणिक आणि पारदर्शक खेळ व्हावा म्हणून ‘आयसीसी’ नवनवे नियम तयार करत असते. परंतु काही जण क्रिकेटच्या सभ्यतेची ऐशीतैशी करत असतात. जिंकण्यासाठी सर्वस्व बहाल करण्याचा खेळ एकीकडे होत असताना, दुसरीकडे खिलाडूवृत्ती पायदळी तुडवली जाऊन स्वतःविषयीचा आदर कमी केला जात असतो.

योगायोग पाहा. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ पायचीत झाला, तेव्हा त्याने ‘डीआरएस’ घेऊ की नको हे ड्रेसिंगरूमकडे पाहून विचारणा करण्याची लबाडी केली. त्याच्या आदल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टिरक्षक इयन हिली यांनी विराट कोहलीबाबत आपण आदर गमावत असल्याचे विधान केले होते. विराटविषयीचा आदर दूर राहू देत, प्रथम स्वतःच्या संघाविषयी किती आदर शिल्लक आहे हे तपासण्याची वेळ हिली यांच्यावर आली असेल. 

बदलत्या काळाप्रमाणे क्रिकेट खेळण्याच्या आणि सामने जिंकण्याच्या विचारसरणीत झालेला बदल आमूलाग्र आहे. पण काळ बदलला म्हणून खिलाडूवृत्ती बदलत नाही. ८० च्या दशकात मुंबईतील सामन्यात इंग्लिश फलंदाज बॉब टेलरला पंचांनी बाद ठरवूनही त्याला पुन्हा फलंदाजी देणारे भारतीय कर्णधार गुंडप्पा विश्वनाथ यांना तो सामना गमवावा लागला, तरीही त्यांची खिलाडूवृत्ती आजही क्रिकेटची सभ्यता अभिमानाने दाखवते. याच क्रिकेटवर कधीकाळी निर्विवाद सत्ता गाजविणाऱ्या वेस्ट इंडीजने गेल्या काही दशकांत पडझड होत असतानाही कधीही गैरमार्गाचा वापर केला नाही. पण याच वेस्ट इंडीज खेळाडूंविरुद्ध कधी स्टीव वॉ, तर कधी ग्लेन मॅकग्रा भर मैदानात भिडले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या मुरलीधरनलाही ऑस्ट्रेलिया पंचांनीच ‘फेक्‍या’ ठरवले होते.

क्रिकेट हा खेळ ब्रिटिशांनी जन्माला घातला, तर त्यातील शेरेबाजीचे (स्लेजिंग) बाळकडू ऑस्ट्रेलियाने दिले. मैदानावरील कामगिरीसाठी रणनीती आखली जाते, पण ऑस्ट्रेलिया संघ ‘स्लेजिंग’चीही व्यूहरचना करत असतो आणि त्यांचे मुख्य लक्ष्य असतो तो प्रतिस्पर्धी कर्णधार. पण कधी तरी शेरास सव्वाशेर भेटतो. विराट कोहलीला डिवचणे म्हणजे शेखचिल्ली होण्यासारखे आहे. २००१मध्ये स्टीव वॉचा अश्वमेध सौरव गांगुलीच्या ‘टीम इंडिया’ने रोखला, तेव्हापासून ऑस्ट्रेलियासाठी भारत नंबर एकचा शत्रू झाला आहे. पण हाच स्टीव वॉ कोलकत्यात अनाथ मुलांसाठी ‘उदयन’ नावाच्या चॅरिटीद्वारे समाजकार्यही करतो. पण मैदानावर मात्र त्याचे रूप वेगळचेच असते. गांगुलीने सुरू केलेल्या आक्रमकतेने आता ‘विराट’ रूप धारण केले आहे. तेव्हा ठिणगी तर पडणारच. अशा वेळी ‘आयसीसी’ची भूमिका महत्त्वाची ठरते. सध्याच्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी सामनाधिकारी कोण, तर इंग्लंडचे ख्रिस ब्रॉड. या महाशयांनी नेहमीच ‘गोऱ्या’ संघांना झुकते माप दिले आहे. एवढी हातचलाखी करूनही स्टीव स्मिथवर कोणतीच कारवाई झालेली नाही. हीच परिस्थिती उलटी असती, भारत ऑस्ट्रेलियात खेळत असता आणि विराट कोहलीकडून असा प्रकार झाला असता, तर हरभजन-सायमंड्‌स यांच्यातील ‘मंकी गेट’ प्रकरणाप्रमाणे रान उठवले गेले असते. म्हणूनच क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. क्रिकेटमधील निकालात अचूकता आणण्यासाठी नियमात बदल करताना आता ‘आयसीसी’ने ऑस्ट्रेलियन वृत्ती डोळ्यांसमोर ठेवावी. या प्रकारामुळे ही मालिका आता अधिक स्फोटक झाली आहे. ‘विराट सेने’साठी रात्र वैऱ्याची आहे. तेव्हा ‘जागते रहो’ असा पहारा देण्याची ही वेळ आहे. ‘स्लेजिंग’ची होळी पेटवून आरोपांची धुळवड खेळली जाऊ शकते. तेव्हा भारतीयांनी त्याच्या मागे न लागता मैदानावरील वर्तणुकीतही आपण नंबर एक आहोत हे दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com