गंभीर सामाजिक दुखणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

धुळ्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन म्हामुणकर यांना झालेल्या बेदम मारहाणीमुळे रुग्णांच्या नातेवाइकांकडून रुग्णालये आणि डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अपघातात जखमी झालेल्या चैत्राम लष्कर या दुचाकीस्वाराच्या उपचारासाठी न्यूरोसर्जनची आवश्‍यकता होती आणि रुग्णालयात तो उपलब्ध नसल्याने त्यावरून वाद झाला. त्यातून रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉ. म्हामुणकर यांना बेदम मारहाण केली. त्यात म्हामुणकरांना एक डोळा गमवावा लागला व त्यांच्या कवटीलाही फ्रॅक्‍चर झाले.

धुळ्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन म्हामुणकर यांना झालेल्या बेदम मारहाणीमुळे रुग्णांच्या नातेवाइकांकडून रुग्णालये आणि डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अपघातात जखमी झालेल्या चैत्राम लष्कर या दुचाकीस्वाराच्या उपचारासाठी न्यूरोसर्जनची आवश्‍यकता होती आणि रुग्णालयात तो उपलब्ध नसल्याने त्यावरून वाद झाला. त्यातून रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉ. म्हामुणकर यांना बेदम मारहाण केली. त्यात म्हामुणकरांना एक डोळा गमवावा लागला व त्यांच्या कवटीलाही फ्रॅक्‍चर झाले. अपघातातील जखमी चैत्रामचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तर या हल्ल्याशी संबंधित संशयितांपैकी एकाने पोलिस ठाण्यात लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे. या घटनेपाठोपाठ धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्येही संतप्त जमावाने एका खासगी रुग्णालयाची तोडफोड केली. तेथे एका गर्भवतीचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्यामुळे नातेवाइकांनी रुग्णालयात धुडगूस घातला. 

वास्तविक या दोन्ही घटना प्रातिनिधिक म्हणाव्या लागतील. रुग्णाच्या मृत्यूनंतर अथवा योग्य उपचार न मिळाल्याच्या कारणावरून डॉक्‍टरांना मारहाण आणि रुग्णालयांत तोडफोड करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. डॉक्‍टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा होऊनही अशा घटना कमी होत नाहीत, हे खरे तर तो राबवणाऱ्या यंत्रणेचे अपयश आहे. त्यातही शासकीय रुग्णालये तर असा धुडगूस घालणाऱ्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ बनली आहेत. तिथे ना कधी पोलिस असतात, ना सुरक्षारक्षक. एकूणच व्यवस्थेतील उणिवांचा दोष तेथे काम करणाऱ्या व्यक्तींवरील रोषातून व्यक्त होणे सर्वथा अयोग्य आहे. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणे, ही निश्‍चितच वेदनादायी घटना असते; पण त्याचा अर्थ आपला भावनावेग न आवरता हिंसेच्या रूपात प्रगट करावा, असा नक्कीच नाही. त्यामुळे अशा घटनांमागील जमावाच्या मानसिकतेचा विचार करताना भावनिकतेच्या अतिरेकाला पायबंद घालण्याची गरज आहे. शिवाय, डॉक्‍टर हे देव नाहीत आणि त्यांच्याकडूनही उपचारात काही उणीव राहू शकते, हे मान्य करण्याची मानसिकताही समाजात तयार व्हायला हवी. केवळ कायद्याच्या धाकाने नव्हे, तर डॉक्‍टर आणि रुग्णालये आपल्या समाजाचाच भाग आहेत आणि त्यांचे हितरक्षण ही आपलीही जबाबदारी आहे, या जाणिवेतूनच अशा घटना टाळता येतील.

Web Title: editorial artical