निंदक

निंदक

इंटरनेटवर एक लेख वाचत होते- ‘हॅबिट्‌स ऑफ अनसक्‍सेसफुल अँड सक्‍सेसफुल पीपल’ अर्थात ‘यशस्वी आणि अयशस्वी लोकांच्या सवयी.’ एका वाक्‍यावर  माझी नजर स्थिरावली. ‘यशस्वी व्यक्ती इतरांना यशाच्या मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करीत असतात, तर अयशस्वी व्यक्ती दुसऱ्यांना मागे ओढण्यात गुंतलेल्या असतात.’ वाचताना नकळत माझ्या ओठांवर स्मित पसरले. हे दोन्ही प्रकार मी माझ्या आसपास पाहिलेले आहेत.

तुम्हीसुद्धा पाहिले असतील ना? अनुभवलेसुद्धा असतील... विषय निघालाच आहे, तर आणखी एक प्रश्न विचारात घेऊन पाहा. या दोन्हीमध्ये तुमचा कुठल्या प्रकारात समावेश होऊ शकतो?

असो. हा लेख मला विशेषकरून यासाठी लिहावासा वाटला, कारण समाजात निंदा करणारे आणि पाय मागं ओढणारेच जास्त आढळतात. ते कसं, हे जाऊदेत, तो त्यांचा प्रश्न आहे; पण आपण त्यांच्याबद्दल किती जागरूक आहोत हे इथं जास्त महत्त्वाचं आहे. 

आपल्या आसपास, अगदी आपल्यावर प्रेम करणारीही (किंवा तसा दावा तरी करणारी) व्यक्ती आपल्या प्रयत्नांवर हसते, आपल्या स्वप्नांचा उपहास करते किंवा आपण जे करू इच्छितो, ते कधीच करू शकणार नाही, असं ठामपणे सांगते, त्यामुळे आपण आपल्या मार्गावरून डळमळतो. कुणीतरी आपल्याला ठामपणानं आणि सातत्यानं सांगतोय, तर ते बरोबरच असेल आणि आपल्या भल्यासाठीच असेल, असा विश्वास आपल्याला वाटू लागतो आणि दुर्दैवानं आपण आपली स्वप्नं, आपल्या आकांक्षा त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून विसर्जित करून टाकतो. 

मलाही असे बरेच लोक भेटले, ज्यांनी ठामपणं सांगितलं, ‘तुझ्याकडं कोणीही आपल्या आयुष्यातील समस्या घेऊन येणार नाही. समुपदेशन किंवा कौन्सेलिंग हे फॅड आहे. तू त्याचा नाद सोडून दे. आपलं आयुष्य वाया घालवू नको.’ बऱ्याच जणांना कौन्सेलिंगबद्दल फारसं माहिती नसतं; पण त्याचा अर्थ असा तर नाही ना, की जे तुम्हाला दिसत नाही, ते होऊच शकत नाही? मी निर्णयावर ठाम होते आणि आज मी आंतरराष्ट्रीय पातळीची कौन्सेलिंगची कामं करते, तेव्हा हीच मंडळी तारीफ करतात. मी त्यांचं म्हणणं ऐकून माझं ध्येय सोडून दिलं असतं तर? दुर्दैवानं बरेच लोक फक्त कुणी तरी मागं खेचण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपल्या वाटेवर चालायचं सोडून, कुठलातरी रटाळ मार्ग धरतात. पुढे यातली बरीच मंडळी पाय खेचणाऱ्यांच्या जमातीत जमा होतात. 

आपली स्वप्नं, इच्छा- आकांक्षा केवळ त्यांनाच सांगा, जे स्वतः आयुष्यात मोठं काही करण्याची हिंमत बाळगतात. हे कधीही विसरू नका, की जे तुमच्या पाठीमागं तुमची निंदा करतात, ते आयुष्यात मागंच राहिलेले असतात. तेव्हा लक्ष्याबरोबरच मार्गदर्शकही काळजीपूर्वक निवडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com