एका गावाचं स्थलांतर

एका गावाचं स्थलांतर

‘लेखकाने स्वतःला स्वतःच्या देशातून हद्दपार करून घ्यावे, तरच तो चांगले कसदार लिहू शकेल’, असं आयर्लंड सोडून स्वित्झर्लंडमध्ये शिक्षक झालेला जेम्स जॉइस हा लेखक म्हणाला होता. ‘स्थलांतरित पक्षी हे अधिक निकोप असतात,’ हे त्याचं वचन प्रसिद्ध आहे. तसंच सामान्य माणसानंही स्वतःचं गाव, घर, शेत सोडल्याशिवाय त्याची प्रगतीची होत नाही की काय, हे अवतीभवतीच्या लोकांकडे पाहिलं की वाटू लागतं. खेडे बदलले आहे याची आवई, तर आपण खूप वर्षांपासून ऐकतो. पण खरेच खेडे बदलले आहे काय? मी दहावीत असताना १९७४ मध्ये आत्याच्या गावी गेलो होतो. तिचे गाव महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर आळंद तालुक्‍यात आहे. गावाला डांबरी सडक नव्हती. दुपारची वेळ. आत्याचा नवरा पारावर विडी ओढत बसला होता. त्यानंतर २००५ मध्ये म्हणजे तीस-एकतीस वर्षांनंतर तिथे गेलो.

गावाला डांबरी रस्ता झाला, वीज आली. पण आताही आत्याचा नवरा पारावर दुपारी विडी ओढत बसलेला. घराकडे जायचा रस्ता तोच खडबडीत. तसाच पडका वाडा. घरी तोच कळकट चहा. भोवतालच्या बदलत्या जगाचा तिथे लवलेश नाही.

पाटलाच्या सधन शेतकरी कुटुंबात आत्याला दिलेले. नदीकाठची सुपीक वीस एकर जमीन. पण आत्याच्या नवऱ्यानं कधी अंग झाडून कुणबीक केली नाही. विडी सोडून दुसरे व्यसन नाही. कधी दहा रुपयांचेही कर्ज नाही, तरीही गरिबी कधी गेली नाही. वडील-चुलत्यांनी एक-दोनदा बैल बारदाना करून देण्याचा प्रयत्न केला. तोही त्यांनी टिकविला नाही. मग पेरणीच्या हंगामात वडील बैल बारदाना, एक गडी घेऊन साताठ दिवस आत्याच्या गावी जायचे. तिथली पाळी पेरणी आटोपून परत यायचे.

पण अलीकडे ते सगळंच बदललं. पाच-सहा वर्षांपूर्वी आत्याच्या मुलानं उमरग्यात घर बांधलं, म्हणून वास्तुशांतीला गेलो, तर सगळं आत्याचं गाव तिथं हजर. म्हणालो, ‘हे एवढे लोक आज गावाकडून आले का?’ तेव्हा समजलं की हे लोक उमरग्यातच राहायला आले आहेत. त्यांच्या गावाची इथं स्वतंत्र कॉलनीच आहे. कुणी स्वतःची घरं बांधली, कुणी भाड्याच्या घरात. मुला-मुलींच्या शिक्षणासाठी म्हणून गाव सोडलं अन्‌ इथंच लहान-मोठा उद्योग- व्यवसाय करायला लागले. कुणी गावाकडील शेती वाट्यानं दिली. कुणी पडीक ठेवली. तर कुणी थोडीबहुत विकली. आता बहुतेकांची मुलं- मुली पुणे, मुंबई, बंगळूर इथं आहेत. एक उभं आयुष्य दोन वेळची चूल पेटण्याच्या भ्रांतीत घालविलेल्या आत्याचे नातू-नाती आज इंजिनिअर झाल्या आहेत.

गाव सोडून इथवर येण्याचा आत्याच्या, फारसं न शिकलेल्या मुलाचा अन्‌ त्याच्या बायकोचा प्रवास खडतर तर असेलच, पण विस्मयचकित करणाराही आहे. या सर्व वाटचालीत आत्याच्या मुलानं थोडीबहुत जमीन विकलीही असेल. पण आयुष्यभर पारावर बसून विड्या ओढत दारिद्य्रात आयुष्य घालविण्यापेक्षा हे धाडस केव्हाही परवडलं. त्या शेतीच्या भयावह यातनाघरातून बाहेर पडतानाची ही पडझड आज गावागावांत सुरू आहे. कदाचित यातूनच उद्या एका ‘आत्मघात’विरहित समाजाची निर्मिती होईल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com