माणूसपणाचा गाभा

 माणूसपणाचा गाभा

मनुष्य नावाच्या प्राण्याची सहसा अशी खात्रीच असते, की इतर सर्व प्राण्यांपेक्षा तो श्रेष्ठ आहे. या श्रेष्ठत्वाबद्दलचा त्याचा अभिमान तात्त्विक सिद्धांतापासून दैनंदिन भाषेच्या वापरापर्यंत सगळीकडं झळकत असतो. तत्त्वज्ञान माणसाला बुद्धिशील, समाजशील प्राणी मानते. काही धर्म माणसाला ईश्‍वराची विशेष निर्मिती मानतात. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार माणूस सर्वांत उत्क्रांत प्राणी मानला जातो. सामान्य माणूसही एखाद्याला तुच्छ किंवा चुकीचा ठरवण्यासाठी त्याची तुलना प्राण्यांशी करतो आणि त्याला ‘गाढवासारखा मठ्ठ’, ‘कोल्ह्यासारखा लबाड’, ‘बगळ्यासारखा ढोंगी’, ‘लांडग्यासारखा क्रूर’ अशी शेलकी विशेषणं बहाल करतो. 

तसं पाहिले तर माणसात प्राण्यांच्या तुलनेत असे कुठले असामान्य गुणधर्म आहेत? ना हत्तीसारखी ताकद, ना चित्याचा चपळपणा आणि वेग, ना गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची क्षमता आणि तीक्ष्ण नजर, ना वाघाची शक्ती आणि रुबाब. तरीही या सर्वांपेक्षा माणूसच श्रेष्ठ अशीच आपली समजूत असते. खरं तर प्राणी आपल्याला काय समजतात हे आपल्याला समजलं असतं तर? माणसांच्या जनुकांचा नकाशा बनविणाऱ्या जिनोम प्रकल्पाची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर कुठल्या तरी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेलं व्यंग्यचित्र मी कधीच विसरले नाही. दोन माकडे झाडांच्या खोडाला पाठ टेकून उदासपणे बसली आहेत आणि त्यांना पाहून एक गाय दुसरीला विचारते आहे, ‘हे का असे दुःखी आहेत.’ तिला दुसरी गाय उत्तर देते, की त्यांना नुकतंच समजलं आहे, की ते माणसाचे सगळ्यांत जवळचे नातेवाईक आहेत. माणसाच्या तथाकथित श्रेष्ठत्वाबद्दलचं त्या चित्रातील अर्थपूर्ण भाष्य विचार करायला लावणारं आहे. 

मनुष्यजातीबरोबरच सगळ्या जीवसृष्टीच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न करणारा माणूस खरंच श्रेष्ठ आहे काय? असला तर कुठल्या अर्थानं? त्याचं श्रेष्ठत्व नक्की कशात आहे? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी आधी माणूसपण कशात आहे याचा विचार करायला हवा आणि माणूसपणाचे सार ध्यानात आले, की त्याला अनुसरून त्याला जपत जगायला हवे.

माणूस ईश्‍वराची निर्मिती असो वा निसर्गाची, त्याची म्हणून जी काही वैशिष्ट्ये आहेत. तोच त्याच्या माणूसपणाचा गाभा आहे. इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसाची शरीररचना, खास करून त्याच्या मेंदूची रचना खूप गुंतागुंतीची आहे. त्यामुळेच प्राणी करू शकत नाही, अशी कार्ये माणूस करू शकतो. या जैविक रचनेमुळेच माणसाला त्याची वैशिष्ट्ये प्राप्त होतात. अर्थात, कितीही वैशिष्ट्यपूर्ण असला, तरी माणूस मुळात एक प्राणी आहे, हे विसरता कामा नये. 

आपल्या वेगळेपणाचे भान तर सर्वांनाच असते. या धूसर, अस्पष्ट भानाकडून स्पष्ट आकलनाकडे जाण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com