गोरक्षकांची झुंडशाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

गाय किंवा गोवंशाच्या कतलींवर बंदी घालण्याचे कायदे बनविण्याची व त्यासाठी अगदी जन्मठेपेसारख्या कडक शिक्षेची तरतूद करण्याची अहमहमिका विविध राज्यांमध्ये सुरू आहे. तो अधिकार कायदेमंडळाला असल्याने त्याविरुद्धची लढाई काही लोक न्यायालयात लढत आहेत. तथापि, गायीच्या संगोपनाला किंवा गोवंशहत्याबंदीला धर्माचरणाचा, तसेच देशप्रेमाचा टिळा लागल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांमधील स्वयंघोषित गोरक्षकांच्या झुंडी चौखूर उधळल्या आहेत.

गाय किंवा गोवंशाच्या कतलींवर बंदी घालण्याचे कायदे बनविण्याची व त्यासाठी अगदी जन्मठेपेसारख्या कडक शिक्षेची तरतूद करण्याची अहमहमिका विविध राज्यांमध्ये सुरू आहे. तो अधिकार कायदेमंडळाला असल्याने त्याविरुद्धची लढाई काही लोक न्यायालयात लढत आहेत. तथापि, गायीच्या संगोपनाला किंवा गोवंशहत्याबंदीला धर्माचरणाचा, तसेच देशप्रेमाचा टिळा लागल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांमधील स्वयंघोषित गोरक्षकांच्या झुंडी चौखूर उधळल्या आहेत. केवळ संशयापोटी हमरस्त्यांवरून जाणारी वाहने अडविणे, त्यात जनावरे वा मांस दिसले की ते गोमांसच आहे असे गृहीत धरून कायदा हातात घेणे, लोकांना बेदम मारहाण करणे असे सामूहिक उन्मादाचे प्रकार गेली दीड-दोन वर्षे सुरू आहेत.

दिल्लीला खेटून असलेल्या दादरी गावात दीड वर्षापूर्वी मोहम्मद अखलाख या व्यक्‍तीचा अशा उन्मादात बळी गेला. त्यावरून देशभर गदारोळ माजला. राजस्थान, गुजरात, झारखंड अशा अन्य काही राज्यांमध्ये, विशेषत: जेथे भाजपची सत्ता आहे तेथे हे प्रकार त्यानंतरही सुरू आहेत. 

राजस्थानातील अलवर जिल्ह्यात परवा गायींच्या तस्करीच्या संशयावरून जमावाने भररस्त्यात कायदा हातात घेतला. गाडीची नासधूस केली. तीन गायी व तीन वासरे घेऊन जाणाऱ्या बापलेकांना चाळीस-पन्नास जणांच्या जमावाने बेदम मारहाण केली. अन्य घटनांप्रमाणेच पोलिस उशिरा घटनास्थळी पोचले. या हल्ल्यात जखमी पेहलू खान या निरपराध व्यक्‍तीचा बळी गेला. त्यांची दोन मुले कशीबशी वाचली. त्या मारहाणीचा व्हिडिओ जिवाचा थरकाप उडवणारा आहे.  आता असे उजेडात आले आहे, की हे कुटुंब गायींची तस्करी करणारे नव्हते, तर हरियानातील मेवात जिल्ह्यात जयसिंगपूर येथे त्यांचा दुधाचा धंदा होता. जयपूरच्या बाजारातून दुभत्या गायी खरेदी करून ते गावाकडे निघाले होते. गायी खरेदी केल्याची पावतीही त्यांच्याकडे होती. पण, जमावाने शहानिशा न करता त्यांच्यावर हल्ला केला. गायींची तस्करी होत नाही किंवा त्यांची कत्तल केली जात नाही, असा दावा कोणी करणार नाही. तथापि, केवळ संशयावरून असे माणसांचे जीव घेणारी झुंडशाही अनागोंदीकडे नेणारी आहे. राजस्थान सरकारचे मंत्री, केंद्रातील सत्ताधारी मंडळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अशा हल्ल्यांचे समर्थन करीत असतील, तर ती आणखीच संतापजनक व एकूणच काळजी वाढविणारी गोष्ट ठरते.