सीरियातील नरसंहार

सीरियातील नरसंहार

सीरियातील विषारी वायूच्या हल्ल्यात झालेली जीवितहानी पाहता तेथील यादवी संपविण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय समुदायालाच पुढाकार घ्यावा लागेल.  
 

सीरियात गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष किती विनाशाच्या टोकाला गेला आहे, याचे प्रत्यंतर मंगळवारी तेथील विषारी वायू हल्ल्यातून पुन्हा आले आहे. सीरियाच्या वायव्य प्रांतात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात लढाऊ विमानांनी केलेल्या विषारी वायूच्या हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप जिवांची संख्या अद्याप नक्‍की सांगता येत नसली, तरी ती पाऊणशेच्या घरात आहे आणि त्यात लहान मुले व महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. सीरियात गेल्या चार वर्षांत विविध हल्ल्यांमध्ये किमान दोन लाख जणांचे बळी गेल्याचे सांगितले जाते. हा महाकाय आकडा लक्षात घेतला की सीरियात सध्या नेमके कसे वातावरण आहे, याची कल्पना येऊ शकते. या काळात सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांना सत्तेवरून हटवू पाहणारे बंडखोर आणि ‘इसिस’ ही दहशतवादी संघटना यांच्यातील धुमश्‍चक्रीत जनतेच्या वाट्याला फक्त होरपळच आली आहे. या ताज्या हल्ल्यात सहभागी झालेली विमाने नेमकी कोणाची होती, याचा उलगडा झालेला नसला, तरीही हा हल्ला सीरियाने केला असावा, असा अंदाज आहे.

पण सीरियातील संघर्षात गुंतलेले सगळेच घटक या बाबतीत एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत. मात्र सीरियाने असे हल्ले यापूर्वीही केले होते आणि २०१३ मधील अशाच हल्ल्यांत किमान १४०० जण मृत्युमुखी पडले होते. अमेरिका आणि युरोपीय देशांनी या हल्ल्याची जबाबदारी सीरियाचीच असल्याचा आरोप केला असून, या संदर्भात संयुक्त राष्ट्रसंघात ठराव मांडून सीरियावर ठपका ठेवण्याची तयारी चालविली आहे. मात्र त्याचवेळी आतापर्यंत असद यांची सातत्याने पाठराखण केलेल्या रशियाने ताज्या घटनेनंतरही सीरियाचीच बाजू घेतल्याने तेथील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्‍यता अधिक आहे.

हा हल्ला इतका भीषण होता की त्यातील मृत व जखमी बालकांची छायाचित्रे बघून कोणाचेही हृदय विदीर्ण व्हावे. साहजिकच जगभरातून त्याविरोधात आक्रोश आणि टीका होत आहे. अर्थात सीरियाच्या सध्याच्या परिस्थितीला असद यांचा कारभारही तितकाच कारणीभूत आहे. गेल्या सतरा वर्षांपासून असद सीरियाचा कारभार पाहत आहेत. शिया पंथीय अल्पसंख्याकांच्या हाती असलेली ही सत्ता जगभरातील सुन्नी राजवटींच्या डोळ्यांत खुपत आली आहे आणि सीरियातील संघर्षाचे ते एक मुख्य कारण आहे. शिया पंथाच्या अलावी या उपपंथातील असद यांच्या घराण्याच्या या बहुसंख्य सुन्नी पंथावर असलेले हे राज्य उलथून टाकण्याचे प्रयत्न बंडखोरांकडून गेली अनेक वर्षे सुरू आहेत आणि आताच्या या ताज्या हल्ल्यामागे या बंडखोरांना लक्ष्य करणे हेच कारण आहे. गेली सहा वर्षे बंडखोरांचा संघर्ष सुरू असला, तरी व्यापक परिप्रेक्ष्यातून बघितल्यास जगाला असलेला ‘इसिस’चा धोका हा अधिक गंभीर आहे. अमेरिका आणि अन्य अनेक देशांची तशी भूमिका असल्यामुळेच बंडखोरांनी कितीही हल्ले केले आणि कितीही बळी घेतले, तरीही त्यांचे मनसुबे अद्याप फलद्रुप होऊ शकलेले नाहीत, हे या पार्श्‍वभूमीवर लक्षात घ्यावे लागेल. विषारी वायूंचा वापर होत असलेल्या या हल्ल्यांना असद राजवटीइतकेच हे बंडखोरही कारणीभूत आहेत. मात्र, लाखो निरपराधांचे बळी गेल्यानंतरही असद वा त्यांचे सरकार त्यातून मार्ग काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही, ही अधिक गंभीर बाब आहे. त्यामुळेच आता या प्रकरणी जागतिक महासत्तांनी थेट हस्तक्षेप केल्यास त्यात काही वावगे म्हणता येणार नाही. 

मात्र, त्याही पलीकडले काही प्रश्‍न या हल्ल्यामुळे पुढे आले आहेत. दहशतवाद्यांच्या हातात विषारी वायूंसारखी शस्त्रे गेल्यास त्यामुळे नेमके काय होऊ शकते, ही बाब या हल्ल्यामुळे स्पष्ट झाली आहे. शिवाय ‘इसिस’सारखी संघटना बिगर-मुस्लिमांनाच नव्हे, तर ‘इस्लामी स्टेट’च्या विरोधात असलेल्या सुन्नी मुस्लिमांना क्रूरपणे ठार करीत आहे. त्यातूनच ‘इसिस’ची म्हणजेच खिलाफत सत्ता मजबूत होते, अशी ‘इसिस’ची ‘तकफिरी’ शिकवण आहे. त्यामुळेच ‘इसिस’पेक्षा असद राजवटीचा कारभार परवडला, अशी भूमिका काही राष्ट्रांनी घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर, अलीकडे ‘इसिस’च्या पायाखालील भूमी कमी कमी होत चालली असून, ‘इसिस’च्या ६०-७० टक्‍के भूमीवर इराकने पुन्हा कब्जा केला आहे. शिवाय विषारी वायूंसारख्या शस्त्रांचा वापर दहशतवाद्यांनी अन्य देशांत केल्यास किती अनवस्था प्रसंग ओढावेल, याचाही आंतरराष्ट्रीय समुदायाला विचार करावा लागेल. विषारी वायूंचा वापर करण्यावर यापूर्वीच बंदी असली, तरी ती फुकाचीच ठरल्याचे या हल्ल्याने दाखवून दिले आहे. त्यामुळेच आता पश्‍चिम आशियातील ही धुमश्‍चक्री, तसेच निष्पापांचे हत्याकांड थांबविण्यासाठी जागतिक स्तरावरच पावले उचलावी लागणार, यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com