तारतम्याचा लगाम

तारतम्याचा लगाम

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्याने जत्रा-यात्रांमधील उत्साहाला उधाण येणार आहे. पण त्यात मुक्‍या जिवांची ससेहोलपट होणार नाही, याची काळजी घेणे अगत्याचे आहे.
 

माती आणि जनावरांचा लळा असलेल्या शेतकरीवर्गाची बैलगाडा शर्यतीवरील बंदी मागे घेण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलल्याने आता महाराष्ट्रातील जत्रा-यात्रांतील उत्साह द्विगुणित होणार आहे. तमिळनाडूतील जलिकट्टूवरील बंदी मागे घेतली गेल्यामुळे बैलगाडा शर्यतीचाही मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा होतीच.

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचे सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर झाल्याने ती फलद्रूप झाली आहे. माणसाच्या वाटचालीत त्याला विशेषतः गोवंश, घोडा, कुत्रा अशा प्राण्यांनी साथ दिली; नव्हे त्यांचे मैत्र जिवाचे अखंड आहे. पशुधनाचा व्यवहारातही वापर सुरू झाला, तसे मुक्‍या जिवाला मोल आले. ते लक्षात घेऊन त्याच्यावर मायेचा वर्षाव करत बळिराजाने वाटचाल केली. या वाटचालीच्या वेगवेगळ्या वळणांवर बैलगाडा शर्यत, रेड्यांच्या टकरी, कोंबड्यांच्या झुंजी यातून मनोरंजन होऊ लागले.

माणसाच्या अंगभूत भावभावनांचा आविष्कारही त्यातून व्यक्त होऊ लागला. त्यातूनच प्रथा, परंपरा आकाराला आल्या. याच प्रथा, परंपरेच्या मुद्द्यावरून जलिकट्टू आणि बैलगाडा शर्यतींवरील बंदी मागे घेण्याचा मुद्दा लावून धरला गेला. परंपरांचा आदर करण्याचा मुद्दा न्यायालयाच्या पटलावर आणि सरकारीदरबारी मांडला गेला. तो ग्राह्य धरला जाऊन अखेर बंदी उठली आहे. प्राण्यांबाबत ममत्व असणाऱ्यांनी या शर्यतींना विरोध केला होता. त्यामागील कारणही रास्त होते. प्रथा, परंपरा सांगणाऱ्या शर्यतींना नंतर आलेले बाजारू स्वरूप, त्यातून प्राण्यांचा होणारा छळ, अमानुषता आणि हिंसक मनोवृत्ती याला प्राणिप्रेमींचा विरोध होता. त्यातून प्राणिक्‍लेश प्रतिबंध कायदा (१९६०) अन्वये बैलाचा समावेश संरक्षित प्राण्यांच्या यादीत झाला. त्यामुळे बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली. त्याला २०१३ मध्ये तात्पुरती स्थगिती मिळाली; पण ७ मे २०१४ रोजी बंदी कायम केली गेली. ही बंदी उठवावी यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, पंजाब, हरियाना, केरळ, गुजरातसह अनेक राज्यांतून वेळोवेळी सरकारदरबारी गाऱ्हाणे मांडण्यात आले. अखेर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य करून शर्यतींचा मार्ग सशर्त मोकळा केला आहे. 

सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच, सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन होईल याबाबतीत जागरूक राहण्याची जबाबदारी शर्यतप्रेमी आणि त्यांना विरोध करणारे या दोघांवरही आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. शर्यतीच्या उत्साहातही विवेक कायम ठेवून कायद्याची बूज राखणे गरजेचे आहे. आतापर्यंतच्या कायद्याच्या लढाईत कोणी कोणावर कुरघोडी केली, कोण जिंकले कोण हरले, यापेक्षा मुक्‍या जिवांविषयी असलेली आत्मीयता आणि संवेदनशीलता अधिक महत्त्वाची आहे. शर्यतीच्या मैदानावरील जोश तर कायम राहावा; तथापि, शर्यतीच्या वेळी फुंकल्या गेलेल्या शिट्या आणि जल्लोषात मुक्‍या जिवाच्या मुखातून हंबरडा बाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. शर्यतीच्या आयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतानाच, कोणत्याही पातळीवर प्राण्यांचा छळ होणार नाही वा अन्य अनिष्ट प्रकार होणार नाहीत, याची काळजी शर्यतीच्या संयोजकांनी घ्यायला हवी. शर्यतीसाठी बैलांना दारू पाजणे, त्यांच्या कानात मुंग्या सोडणे, त्यांना अंधारात डांबून ठेवणे, शर्यतीच्या मैदानावर त्यांच्या शेपट्या पिरगाळणे, अणकुचीदार वस्तूंनी त्यांना ढोसणे हे अमानुष प्रकार या पुढे बंद होतील, अशी अपेक्षा आहे. खरे तर बैल आणि शेतकरी यांचे नाते जिवाभावाचे आहे. दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या बळिराजाने स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन जनावरे जगवल्याची उदाहरणे आहेत. जनावराच्या डोळ्यांत पाणी येते, तेव्हा बळिराजाच्या अंतःकरणात होणारी कालवाकालव व्यक्त करण्यास शब्द अपुरे असतात. शर्यतींचा मार्ग पुन्हा मोकळा होत असताना संबंधितांनी काही गोष्टींचे भान राखणे गरजेचे आहे. कोणत्याही खेळातील आनंद आणि परपीडनातील आनंद यामध्ये गुणात्मक आणि भावात्मक फरक आहे, तो ओळखला पाहिजे. खेळाचा निर्भेळ आनंद उपभोगण्यास कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही. हे लक्षात घेऊन निकोप वातावरणात शर्यती व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com