वजनदार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

जगातील सर्वांधिक वजनदार स्त्री असलेल्या इमामचं वजन गेल्या दोन महिन्यांत तब्बल २४० किलोंनी घटले आहे. बेरियाट्रिक सर्जन डॉ. लकडावाला यांनी तिच्यावर केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरलीय. तब्बल ५०० किलोवर पोचलेली इमाम आणि तिचे कुटुंबीय भारतात मोठ्या आशा घेऊन आले होते.

जगातील सर्वांधिक वजनदार स्त्री असलेल्या इमामचं वजन गेल्या दोन महिन्यांत तब्बल २४० किलोंनी घटले आहे. बेरियाट्रिक सर्जन डॉ. लकडावाला यांनी तिच्यावर केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरलीय. तब्बल ५०० किलोवर पोचलेली इमाम आणि तिचे कुटुंबीय भारतात मोठ्या आशा घेऊन आले होते.

त्यांची आशापूर्ती होण्याच्या दिशने काही पावले पुढे पडलीत. इमामचा आजार अपवादात्मक असला तरी, तिच्या निमित्ताने स्थूलपणाच्या समस्येविषयी गांभीर्याने विचार करायला हरकत नाही. बैठ्या लाइफस्टाइलमुळे आपल्याही अवतीभवती विशालदेही मंडळींचं वाढलेले प्रमाण सहजपणे जाणवतंच. वजन कमी करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींचाही सुळसुळाट झालेला दिसतो. आहार-विहार या दोन बाबी सांभाळल्या तर वजनावर नियंत्रण ठेवता येतंच; पण ती असते थोडी दीर्घ उपचारपद्धती. ‘आज-आत्ता-ताबडतोब’ हवं असण्याच्या काळात त्यामुळेच बेरियाट्रिक शस्त्रक्रियांचाच शॉर्टकर्ट अनेक जण पसंत करतात. राजकारण आणि उद्योग क्षेत्रातल्या अनेकांनी ती ‘प्रेझेंटेबल’ दिसण्यासाठी केल्याचे दिसते; पण इमामच्या बाबतीत ती आवश्‍यक ठरली ती तिचा जीव वाचवण्यासाठी. 

इजिप्तमधल्या अलेक्‍झांड्रिया शहरात राहणारी ३६ वर्षांची इमाम अहमद अब्दुलती, गेली २५ वर्षे या शहराच्याच काय; पण आपल्या घराच्याही बाहेर पडली नव्हती. इमामचं वजन इतक्‍या झपाट्यानं वाढत गेलं की अगदी लहानपणीही तिला चालणं मुश्‍किलच होतं. त्यामुळेच ती शाळेतही जाऊ शकली नाही. तिची आई आणि बहिणीने तेथील काही डॉक्‍टरांकडे, रुग्णालयात उपचार करण्याचा प्रयत्न केलाही; पण इमामचं वजन वाढण्याचं कारण तिच्या शरीरातील ‘जेनेटिक डिसऑर्डर’ होती. (शरीरामधले द्रवपदार्थ बाहेर टाकले न जाणं.) शेवटी तिच्या बहिणीने शेवटचा पर्याय म्हणून मदतीचा जाहीर पुकारा केल्यानंतर तिला उपचारासाठी भारतात आणण्याचं ठरवण्यात आलं. त्याचं मुख्य कारण होतं ते इथल्या आरोग्य सेवेबद्दलचा विश्‍वास आणि वाजवी खर्च. भारतीय डॉक्‍टरांबद्दल जगात चांगलं मत आहेच. भारतात आरोग्य उपचारासाठी आणि आरोग्य पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांची सतत वाढती संख्या त्याची साक्ष देते. आरोग्य पर्यटनाची २०१५ मधली उलाढालच तब्बल ३०० कोटी अमेरिकी डॉलर होती. २०२० पर्यंत ती ७०० ते ८०० कोटींवर जाईल, असा अंदाज आहे. थोडक्‍यात काय, की इमामचं वजन कमी झालं असलं तरी, आरोग्य सेवेच्या क्षेत्रात भारताचं ‘वजन’ मात्र नक्की वाढलं आहे.

Web Title: editorial artical