रंगांत रंगले रंग!

रंगांत रंगले रंग!

बारीक किसलेल्या बर्फाच्या गोळ्यावर गोड चवीचे वेगवेगळे रंग ओघळू लागले, की जिभेवर रंगपंचमीचा चिंब आनंद जागा होतो. वयाचं चाक उलटं फिरतं. लहानपणीच्या रम्य आठवणींचे झोके मनात उंच भरारू लागतात. तेव्हाचे सवंगडी सोबतीला येतात. त्यांनी मागं खेचून धरलेले पिचकाऱ्यांचे दांडे जोरानं दाबले जातात; आणि रंगांची पंचमी मनाच्या अंगणात रंगत-खुलत जाऊ लागते. कोवळ्या आरोळ्यांचा जल्लोष कानांवर आदळू लागतो.

गल्लीबोळांत घुसून, रस्त्यांच्या वेड्यावाकड्या वळणांचा आधार घेऊन इतरांना चकवा देत नव्या जागा शोधत धावत सुटावं; आणि गुंगारा देण्याच्या खेळात अलगद दुसऱ्याच टोळीच्या रंगफेकींत बुडून जावं, तसा थरार या आठवणींसह जाणवू लागतो. चेहऱ्यावर एकेका रंगाचे थर मिसळत गेल्यानं कुणीच कुणाला ओळखू न येण्याइतपत बेभानरंग झाल्याशिवाय रंगपंचमी खुलून यायचीच नाही. 

पाऱ्याचे चढ-उतार असह्य होत असल्याच्या सध्याच्या दिवसांत खुलणारी निसर्गाची रंगपंचमी तुम्ही पाहिली आहे कधी? निष्पर्ण वृक्षांच्या कोरड्या फांद्यांच्या सावल्यांचे रस्तोरस्ती रेखाटले गेलेले आकार म्हणजे जणू एकेक चित्रकथाच असतात. या सावल्यांच्या रेषा पकडून चालत राहावं, तर काही झाडांवर कोवळ्या पानांचं तुकतुकीत तपकिरी सौंदर्य झुळझुळताना दिसतं. तिथल्याच एखाद्या फांदीवर तपकिरी रंगातून हिरवट लकेरी उमटत असल्याचं जाणवू लागतं. कुठं कुठं फिकट जांभळे तुरे माना वर उचलून उत्सुक नजरेनं पाहत असतात. कुठं पिवळ्या फुलांचे, गुलाबी किंवा लालचुटुक फुलांचे जरीपटके डोलत असतात. कुठं हिरवटपणात काळी झाक उतरलेली; तर कुठं पोपटपंख उमललेले. काही पानांवर हिरवेपणाची दाट छटा अवतरलेली; तर काही ठिकाणी त्याचे पातळ एकसारखे थर पसरलेले. काही पानांच्या कडा नागमोडी वळणांच्या नक्षीनं सजलेल्या; तर काही पानांच्या टोकांनी अणकुचीदार चोचींचा तीक्ष्णपणा घेतलेला. काही पानांच्या कडा कातरनक्षीनं सजलेल्या; तर काही पानांनी कमालीच्या साधेपणाचा बाज स्वीकारलेला. या हिरवळीतच काही पानांनी भगव्या रंगाची वस्त्रं पांघरलेली दिसतात; आणि रंगांच्या गाभुळलेल्या सौंदर्याचा अनोखा साक्षात्कार होतो. 
पानं वेगवेगळे रंग पांघरतात. फुलं विचित्र रंगांत हसत राहतात. एक रंग दुसऱ्यासारखा नाही. अशा छटा निसर्ग कुठून तयार करीत असेल? त्याची रंगपेटी किती वेगळी असेल? त्याच्या हातात कसले कसले ब्रश असतील? आणि त्यांच्या फटकाऱ्यांच्या दिशा तरी किती असतील? ‘यंदाचा उन्हाळा फारच कडक आहे!’ असं उगाळत बसणाऱ्यांना या रंगांची, त्यांच्या छटाछटांतून उमलणाऱ्या सौंदर्यलडींची माहितीच नाही की काय? छे, छे! निसर्ग एवढा अरसिक असूच शकत नाही. वाऱ्यावादळाशीही तो खेळतो, जमिनीतून उगवून येणाऱ्या हिरव्या जिवांना मुसळधार पावसातही तो आधार देतो; तसाच उन्हाळ्याच्या दिवसांतही तो अशी नयनसुखदायक रंगरूपं उधळीत राहतो.  हिरव्यागार मायेची ही रूपं जरूर पाहा. तुमच्या मनात रंगपंचमीचा ताल किणकिणल्याशिवाय राहणार नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com