पाकिस्तानी विकृती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

दोन भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करून पाकिस्तानी लष्कराने आपला अमानुष चेहराच दाखवून दिला आहे. उभय देशांदरम्यानचे बिघडलेले संबंध या घटनेमुळे आणखी विकोपाला गेले आहेत.
 

दोन भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करून पाकिस्तानी लष्कराने आपला अमानुष चेहराच दाखवून दिला आहे. उभय देशांदरम्यानचे बिघडलेले संबंध या घटनेमुळे आणखी विकोपाला गेले आहेत.
 

भारत-पाकिस्तान नियंत्रणरेषेवरील पूँछ विभागात हुतात्मा झालेल्या दोन भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करून पाकिस्तानने आपल्या अमानुष आणि राक्षसी मानसिकतेचे दर्शन पुन्हा घडविले आहे. उरीच्या लष्करी तळावरील हल्ल्यानंतर गेल्या सप्टेंबरमध्ये पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’चा बराच गाजावाजा झाला आणि पाकचे ताबूत थंडे झाल्याच्या वल्गनाही झाल्या होत्या. त्यानंतर वर्षभरातच पाकिस्तानने आपली नखे पुन्हा बाहेर काढली आहेत.

मात्र, त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे या पाशवी कृत्याबाबत पाकिस्तानी लष्कराने साळसूदपणे कानावर हात ठेवून कपटनीतीचा प्रत्यय दिला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाज्वा यांनी रविवारी नियंत्रणरेषेवरील हाजिपीर विभागाची पाहणी केली होती. त्यानंतरच्या अवघ्या २४ तासांत ही घटना घडणे, हा योगायोग असू शकत नाही. अर्थात, पाकिस्तानी लष्कराने या कृत्यासाठी मुहूर्त तर मोठा नामी काढला होता. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप एर्दोगान सध्या भारत दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी काश्‍मीरमधील तणाव निवळावा, यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठाची मदत घेण्याबाबतचे वक्‍तव्य या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर केले. त्याच पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्यामुळे या घटनेस आंतरराष्ट्रीय संदर्भ प्राप्त झाले आहेत. पाकिस्तानने अशा प्रकारे जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही पाकिस्तानी लष्कराने असे प्रकार केले आहेत आणि त्या त्या वेळी भारताने कठोर कारवाई करूनही पाकिस्तानची खुमखुमी अद्याप शमलेली नाही. भारतीय हद्दीत सुमारे २५० मीटर आत घुसून पाक सैनिकांनी गस्तीवरील भारतीय जवानांवर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानी हवाई दलाचे त्यांच्यावर हवाई छत्र होते. त्यामुळे एकुणातच पाकिस्तानचे मनसुबे उघड झाले आहेत. 

पाकिस्तानच्या या कृत्यास अर्थातच काश्‍मीर खोऱ्यात गेले काही महिने धुमसत असलेल्या तणावाची पार्श्‍वभूमी आहे. खोरे अशांत असले की आपल्याला रान मोकळे असते, अशी पाकिस्तानची धारणा आहे. मे१९९९ मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानने भारताची खोडी काढली आणि पुढे त्याचे रूपांतर थेट युद्धात झाले, तेव्हाही अशाच प्रकारे भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर जून २००३,  जानेवारी २०१३ आणि ऑक्‍टोबर २०१६ मध्येही असेच विकृत प्रकार पाकिस्तानने केले.

संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी या घटनेचा ‘अमानवी’ अशा शब्दांत तीव्र निषेध करतानाच ‘अशा घटना युद्धकाळातही घडत नाहीत; मग शांततेच्या काळातील तर गोष्टच वेगळी...’ अशी व्यक्‍त केलेली प्रतिक्रिया रास्तच आहे. मात्र, अशा घटनेनंतर आता भारत नेमकी कोणती पावले उचलणार, असा प्रश्‍न आहे. पाकिस्तानच्या अशा कपटी कृत्यांना तोंड देण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली असली, तरीही फाळणीनंतरची गेली सात दशके येनकेन प्रकारेण भारतात दहशतवादी घुसवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांत खंड पडलेला नाही. काश्‍मीर खोऱ्यात या दहशतवाद्यांचा उच्छाद चालूच असून बॅंकेचे पैसे लुटण्यासाठी हिज्बुल मुजाहिदीनने सोमवारी केलेल्या हल्ल्यात राज्यातील पाच पोलिसांसह सात जण मरण पावले. एकूणच परिस्थिती हाताबाहेर जात असून ती आटोक्‍यात आणण्यात सरकारची कसोटी लागणार आहे.  

भारताशी कोणताही व्यवहार करताना, पाकिस्तान नैतिकता वा साधनशुचिता यांना कशा प्रकारे तिलांजली देत आहे, हे सातत्याने दिसत आहे. अशा वेळी ‘५६ इंची छाती’चे नेतृत्व म्हणून सतत आत्मगौरव करू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

पाकिस्तानच्या या अमानुष कृत्यानंतर आता हा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे नेणे, असा एक मार्ग काही जण सुचवितात. मात्र, पाकिस्तान तेथे काश्‍मीरप्रश्‍न उपस्थित करू शकत असल्यामुळे, मोदी सरकार तसे करण्याची शक्‍यता कमी आहे. काश्‍मीरप्रश्‍न हा आंतरराष्ट्रीय नव्हे, तर दोन देशांमधीलच विषय आहे, असा खणखणीत जबाब तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांना दिल्यामुळे त्या विषयावर पडदा पडल्यातच जमा आहे. दोन्ही देशांदरम्यानचे राजनैतिक संबंध पूर्णपणे तोडून टाकत, पाकिस्तानी उच्चायुक्‍तांची मायदेशी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्यास चर्चेची दारे पूर्णपणे बंद होऊ शकतात. त्यामुळेच आता सरकार पाकिस्तानला नेमक्‍या कशा प्रकारे सडेतोड प्रत्युत्तर देते, ते बघावे लागणार आहे. एक मात्र खरे की एकीकडे ‘समझोता एक्‍स्प्रेस’ सुरू ठेवायची आणि त्याच वेळी सरहद्दीवर अशा अमानुष कारवाया करत राहावयाच्या, या पाकनीतीला आता खंबीरपणे उत्तर देण्याची वेळ आली आहे. मात्र, त्या वेळी भावना भडकवण्याचे राजकारण केले जाणार नाही, याचीही खबरदारी मोदी यांना घ्यावी लागेल. पाकिस्तान सरकार अशा घटनांबाबत कानावर ठेवत असलेले हात आता कठोर कारवाईने बाजूला सारून, पाकिस्तानी नेते आणि विशेषत: लष्कराच्या कानठळ्या बसतील, अशा कारवाईची आता जरुरी आहे.