मायेचा हात

मायेचा हात

सकाळी पेपर आलाय का बघण्यासाठी दार उघडलं. दाराच्या कडीला अडकवलेला पेपर काढून घेताना सहज जिन्याकडं लक्ष गेलं. पहिल्या पायरीवर कुत्र्याचं पिल्लू अंगाचं वेटोळं करून झोपलं होतं. ते पायरीशी इतकं बिलगून झोपलं होतं, की खाली न बघता जिना उतरणाऱ्याचा पाय त्याच्यावर पडला असता. पेपरच्या सुरळीनं मी त्याला डिवचलं. त्यानं झोपाळू डोळ्यानं मान वर करून बघितलं. मी त्याला ‘हाड हाड’ करून हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यानं आधी तर दादच दिली नाही. मग मी त्याला पेपरच्या सुरळीनं हलकेच मारलं आणि ओरडलो; ‘हाड हाड.’ तसं ते नाइलाजानं उठलं. कॉमन पॅसेजच्या बाहेरच्या भिंतीजवळ आमच्या वसंतरावांच्या गुलाबाच्या कुंड्या होत्या. दोन कुंड्यांच्यामधे ते पटकन शिरलं. ‘हाड हाड.’ मी ओरडलो. तसं ते आणखी आत आत शिरलं. माझं ओरडणं ऐकून वसंतरावांनी दार उघडलं, ‘का हो, काय झालं?’ त्यांनी विचारलं, ‘हे बघा नं, कुत्र्याचं पिल्लू.’’ मी कुंडीकडे बोट दाखवून म्हणालो.

वसंतराव म्हणाले, ‘अरे, हे पुन्हा आलं का? काय कटकट आहे!’ असं म्हणून त्यांनी दोन कुंड्यांच्यामध्ये हात घातला आणि त्याला बाहेर काढलं. त्याचे दोन्ही कान धरून उचललं. तसे ते ‘कुईं कुईं’ करत पाय झाडायला लागलं. वसंतराव खाली गेले आणि त्याला रस्त्यावर सोडून आले. त्यानंतर सकाळी - दुपारी - संध्याकाळी - रात्री केव्हाही कुणीतरी ‘हाड हाड’ म्हटल्याचं ऐकू येऊ लागलं. 

एकदा गॅलरीत उभा होतो. समोरच्या जॉगिंग पार्कच्या कंपाऊंड वॉलजवळ ते उभं होतं. त्याच्याजवळून कुणी गेलं की ते त्याच्या मागोमाग जायचं. चालणाऱ्याच्या ते लक्षात आलं की लाथ मारून हाकलत तो ‘हाड हाड’ करायचा. एक कुठली तरी कुत्री समोरून आली. जमीन हुंगून, स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून झाडाच्या सावलीखाली पाय पसरून बसली. हे पिल्लू दुडूदुडू चालत तिच्याजवळ गेलं आणि सरळ थानाला लागलं. ते त्या कुत्रीला  आवडलं नाही. ती वसकन त्याच्यावर भुंकली. पायानं त्याला लाथाडून ती उठली आणि त्याच्याकडे न बघता निघून गेली.

जॉगिंग पार्कच्या गेटपाशी एक कुत्रं उभं होतं. त्याचं लक्ष या पिल्लाकडं गेलं. मान ताणून तो कुत्रा त्याच्या दिशेनं धावला आणि त्या पिल्लाला तोंडानंच खाली पाडलं. ते केकाटायला लागलं. मानेला झटका देऊन तो कुत्रा त्याच्याकडे न बघता निघून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते पिल्लू रस्त्याच्या ऐन मधोमध उभं होतं. रहदारीची त्याला अजिबात जाणीव नव्हती. वेगात येणारे मोटारसायकलवाले त्याच्यासमोर आले की कच्चकन ब्रेक दाबायचे आणि त्याच्या जवळून जायचे. स्कूटरवाले त्याला बघून वेग कमी करायचे आणि त्याला बघत बघत, त्याला टाळून जायचे. तेवढ्यात समोरून एक शाळकरी मुलगा  येत होता. अगदी सहज आणि चटकन त्या पिल्लाजवळ गेला. दोन्ही हातांनी त्याला अलगद उचललं. त्याच्या अंगावरून प्रेमानं हात फिरवला आणि त्याला छातीशी धरले. पिल्लाचे ‘हाड हाड’चे दिवस संपले होते. त्या मुलाच्याही डोळ्यात आनंद मावत नव्हता. दृष्टी वेगळी असेल तर घडणारी गोष्टसुद्धा किती वेगळी असते नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com