स्वर्गीय अनुभव

स्वर्गीय अनुभव

लहानपणी ऐकलेली एक सुंदर गोष्ट आठवते. एक संसारी गृहस्थ आयुष्याला कंटाळून एका साधूकडे गेला आणि सुंदर आयुष्य जगण्याचं रहस्य त्यांना विचारले. महाराज हसले आणि म्हणाले, ‘तुझ्या अंगणात जितक्‍या बकऱ्या, कोंबड्या, गायी-म्हशी असतील त्या सगळ्या घरात घेऊन जा आणि मला दोन आठवड्यांनी येऊन भेट.’ महाराजांनी सांगितलेलं ऐकणं भाग होतं.

परंतु, त्यांची आज्ञा पाळताना त्याच्या घराचा उकिरडा झाला. सगळीकडं घाण, दुर्गंध, चित्रविचित्र आवाज. त्यामुळं वैतागून त्याची बायको माहेरी निघून गेली. आधीच कंटाळलेला तो गृहस्थ अगदीच बेजार झाला. कसेबसे दोन आठवडे काढून तो पळतच महाराजांकडे गेला. ‘महाराज, मी तुमच्याकडे सुंदर आयुष्य मागितलं होतं, हे काय दिलं?’ महाराज परत हसले आणि म्हणाले, ‘आता घरी जा, सर्व जनावरांना बाहेर काढ आणि घर स्वच्छ कर.’ भक्तानं तसं केलं आणि त्याचं घर इतकं सुंदर दिसू लागलं की त्याला स्वर्गात असल्याचाच आनंद झाला. पत्नीला घरी आणल्यानं त्याचा आनंद द्विगुणित झाला आणि त्याला महाराजांच्या आज्ञेचा अर्थ कळला. सुंदर आयुष्य त्याच्याकडं नेहमीच होतं, त्यानं फक्त ते पाहणं बंद केलं होतं. 

आपल्याही आयुष्यात असंच होतं, नाही? लहानपणापासून आपण कुठल्यातरी उद्दिष्टाच्या मागं असतो. शाळा, परीक्षा, कॉलेज, उच्च शिक्षण, नोकरी, पैसा, लग्न, मुले, मग आणखीन पैसा... जोपर्यंत या उद्दिष्टाचा जोश असतो तोपर्यंत आपल्या आयुष्यात उत्साह असतो. परंतु, आयुष्यात कुठेतरी या भौतिक उद्दिष्टांची संख्या कमी होत जाते. आपण ज्याच्यासाठी जितकी मेहनत केली ते जवळपास सगळंच थोड्याबहुत फरकानं का होईना, आपल्याला मिळालेलं असतं. आणि तेच सगळं आपलंसं झाल्यावर त्याची किंमत कमी होऊन जाते. त्या वस्तूला किंवा व्यक्तीला मिळवण्याच्या आव्हानांवर कदाचित आपण लक्ष केंद्रित करत असतो. त्यामुळं की काय, ते सगळं अर्थहीन आणि कंटाळवाणं वाटायला लागतं आणि आपलं रडगाणं सुरू होतं. जवळ असलेल्या व्यक्तीकडं आपण दुर्लक्ष करतो, त्यांच्यावर रागावतो, त्यांना बदलण्याचा आटापिटा करतो आणि नात्यांमध्ये असणाऱ्या स्वर्गीय आनंदाला मुकतो. सगळं समोरच असतं, परंतु आपण ते पाहण्याचं कष्ट घेत नाही. उलट आपल्याकडं काय नाही त्याची सतत तक्रार करत राहतो. 

स्वर्ग इथंच आहे. तुमच्या आत आहे. तो अनुभवायला आपल्याला कुठल्याही चमत्काराची आवश्‍यकता नाही. परंतु, पैसा कमावून आपल्या बंगल्याला इंद्रप्रस्थ बनवत असताना आपल्या खऱ्या दौलतीला आपण मुकत तर नाही ना, असा प्रश्न वारंवार विचारत राहावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com