नभोवाणीचीही ऐका ‘मन की बात’

नभोवाणीचीही ऐका ‘मन की बात’

देशातील सर्वांत मौल्यवान अशा मनुष्यबळनिर्मितीत आणि संस्कारक्षम पिढी घडवण्यात हे माध्यम मोलाचे योगदान देऊ शकते; पण त्यासाठी कार्यक्रमनिर्मितीचे स्वातंत्र्य आणि प्रयोगशीलता यांची नितांत गरज आहे. 
 

‘बीबीसी’वर आता लवकरच मराठी बातम्या ऐकायला मिळाल्या तर नवल वाटायला नको, कारण आपल्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमात ‘बीबीसी’ने गुजराती, तेलगू याबरोबर मराठी भाषेलाही स्थान मिळाले आहे. ‘बीबीसी’ हे वृत्त जगतातील विश्वसनीय नाव म्हणून आजही ओळखले जाते आणि म्हणून वृत्तजगतातील ही एक लक्षणीय बातमी मानवी लागेल.

जागतिकीकरणाच्या रेट्यात असे घडणे स्वाभाविक मानले तरी त्यानिमित्ताने मराठी रेडिओ पत्रकारितेत काही नवे मानदंड निर्माण होण्याची शक्‍यता वाढते म्हणून या बातमीचे महत्त्व.  

नभोवाणी या प्रसारमाध्यमाचा उपयोग स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक राजकीय व्यक्तींनी, समाजधुरिणांनी जाणीवपूर्वक केला, यातच रेडिओ या यंत्राची महती दडलेली आहे. सध्या गेल्या दोन वर्षांत ‘मन की बात’ हा कार्यक्रम सातत्याने रेडिओवरून सादर करून पंतप्रधानांनी या माध्यमाच्या उपयोगितेवर शिक्कामोर्तब केले आहे. टीव्हीच्या अहोरात्र सुरू असलेल्या असंख्य वाहिन्या, समाजमाध्यमातील आणि इंटरनेट माध्यमातील यू ट्यूबसारखी संकेतस्थळे यांना यशस्वी तोंड देत हे श्राव्यमाध्यम आज उभे आहे आणि गेल्या वर्षात अनेक खासगी एफएम वाहिन्या देशभर घोडदौड करत आहेत. आजमितीला आपल्या महाराष्ट्रात चाळीसहून अधिक एफएम वाहिन्या प्रत्यक्ष कार्यरत आहेत. याच पार्श्वभूमीवर रेडिओ या माध्यमाच्या दोन टोकांच्या कार्यक्रमपद्धतीत हरवत चाललेला समतोल टिकवण्याची निकड अधिक जाणवू लागली आहे 

१९९३ मध्ये इंदूर येथे खासगी एफएम रेडिओवाहिनी सुरू झाली. हैदराबाद, दिल्ली, विशाखापट्टणम, गोवा इथेही मग ती पोचली. २०००मध्ये दुसऱ्या टप्प्यात सरकारने १०८ नव्या फ्रिक्वेन्सीचा लिलाव करून याचा अधिक विस्तार केला. पुढे २००६ मध्येही अनेक नवी खासगी रेडिओ स्टेशन्स देशात उभी राहिली आणि मग एका नव्या शैलीचे, प्रारूपातले कार्यक्रम श्रोत्यांना ऐकायला मिळू लागले. 

उत्साह, जोश आणि सतत काहीतरी घडते आहे अशी भावना निर्माण करणाऱ्या या नव्या पेहरावातल्या खासगी एफएम ध्वनिमाध्यमाने तरुणाईला आकर्षित करण्याचा चंग बांधला, तर दुसरीकडे प्रसार भारतीच्या अधिपत्याखालील आकाशवाणी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि महसूल वाढावा या तगाद्याला तोंड देण्यासाठी वारेमाप जाहिरातीचा स्वीकार करताना दिसू लागली. एक मिनिटाच्या चिंतन कार्यक्रमाला, मिनिटाच्या जाहिराती, सकाळच्या रम्यप्रसंगी उत्साहवर्धक काही ऐकवण्याऐवजी दुर्धर रोगांच्या चर्चा असे प्रकार घडू लागले आणि रसिक श्रोत्यांचा हिरमोड होऊ लागला. 

सुमधुर गाणी, शास्त्रीय संगीताचा खजिना, श्रुतिका, मान्यवरांची भाषणे, लेखक कलावंतांच्या मुलाखती, शेतकरी, कामगारवर्गासाठी, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मालिका यांचा खजिना असलेली आकाशवाणी आज प्रयोजकत्वाच्या दडपणाखाली आपले रसरशीत सौष्ठव हरवू लागली आहे, असे चित्र समोर येऊ लागले. सकाळच्या प्रादेशिक बातम्यांना आजही लाखो श्रोते आहेत, हे या माध्यमाची विश्वासार्हता आहे म्हणूनच आहे हे खरे; पण या श्रोत्यांना प्रादेशिकतेचा सर्वसमावेशक स्पर्श असलेल्या बातम्या वार्ताहरांच्या अधिक चांगल्या सादरीकरणासह देण्यास अजूनही खूप वाव आहे.

इकडे नव्या एफएम वाहिन्या प्रासंगिकतेवर भर देताना दिसतात. शहरातील रहदारीची स्थिती, प्रासंगिक अडचणींवर मल्लिनाथी आणि एकूणच ‘आत्ता’ याविषयी चांगली सजगता या सादरीकरणात दिसते. सिनेमा, फॅशन, तरुणाईला आवडतील असे कट्टे यांच्याभोवती त्यांचा फेर सुरू असतो.

चुणचुणीत ‘रेडिओ जॉकी’ सतत संवाद श्रोत्यांना बांधून ठेवताना दिसतात. अर्थात या वाहिन्यांवर चांगले चर्चात्मक कार्यक्रम, एखाद्या विषयाची सांगोपांग माहिती देणारी मालिका अभावानेच आढळते. त्यामुळे माहिती, ज्ञानसंपन्नता याला श्रोता पारखा होतो आहे. 

कोठेही, केव्हाही आणि मोबाईलसारख्या सहज उपलब्ध असलेल्या उपकरणाच्या साहायाने रेडिओ आपल्यापर्यंत पोचत असल्यामुळे त्याच्या श्रोत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अर्थातच जाहिरातदारांचा ओघही चांगला आहे. एक यशस्वी ‘बिझनेस मॉडेल’ म्हणून खासगी एफएम वाहिन्या नावारूपाला येताना दिसत आहेत. आजमितीला २५०० कोटी रुपये उलाढाल असलेला हा उद्योग आहे. ही उलाढाल आणखी बरीच वाढेल.

‘बीबीसी’चे आगमन आणि खासगी रेडिओ वाहिन्यांशी करावी लागणारी स्पर्धा यात आकाशवाणीने आपले पूर्वसंचित विसरू नये. बा. सी. मर्ढेकर, बा. भ. बोरकर, पु. ल. देशपांडे, सई परांजपे, व्यंकटेश माडगूळकर अशा दिग्गजांच्या प्रतिभास्पर्शाने आकाशवाणी फुलली, बहरली. सर्वसामान्य माणसाचे माध्यम म्हणून नावारूपाला आली. तिला व्यवसायाच्या गळेकापू स्पर्धेत कटोरा हाती घ्यायला लावणे अयोग्य आहे.

१९२३ मध्ये ‘बोंबे प्रेसिडेन्सी रेडिओ क्‍लब’ या नावाने सुरू झालेले आणि १९२७ मध्ये पूर्ण कार्यान्वित झालेले हे माध्यम आत शताब्दीच्या जवळ आले आहे. नभोवाणीसारख्या माध्यमाचे जनसामान्यांपर्यंत पोचण्याचे सामर्थ्य लक्षात घेऊन सरकारने यांना महसूल मिळवण्याच्या दावणीला न बांधता त्यांना मुक्त हस्ते कार्यक्रम करण्याची संधी दिली पाहिजे. प्रयोग करायला वाव दिला पाहिजे. कुटुंब कल्याण, शिक्षण यासाठी सरकार अर्थसंकल्पात भरीव तरतूद करत असेल, तर आकाशवाणीसारख्या लोकशिक्षणाच्या माध्यमालाही तो लाभ मिळायला हवा, तरच आपल्या सांस्कृतिक क्षितिजाचा विस्तार शक्‍य आहे. देशातील सर्वांत मौल्यवान अशा मनुष्यबळनिर्मितीत आणि संस्कारक्षम पिढी घडवण्यात हे माध्यम मोलाचे योगदान देऊ शकते, ही रेडिओची ‘मन की बात’ सरकार समजून घेणार आहे का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com