रेखाटूया पाणीदार नकाशे...

रेखाटूया पाणीदार नकाशे...

महाराष्ट्रातील खेड्या-खेड्यांना पाणीदार बनवणिारा ‘वॉटर कप’ उपक्रम महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेने आधुनिक माहितीयुगात जोशात पदार्पण करण्याच्या दिशेनेही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल. 
 

लंकादहन करणाऱ्या हनुमानजींच्या महापुच्छाच्या लांबीचा अंदाज करणे अवघड आहे, पण त्या खालोखाल सात फूट लांब शेपटीवाले चाक्‍मा बबून आफ्रिकेत राहतात. या मर्कटांच्या टोळ्या ठराविक टापूत खाद्य शोधत फिरतात. चुकून शेजाऱ्यांच्या टापूत घुसल्यास भांडण-तंट्यात वेळ गमावतो.

तेव्हा सगळे आपापल्या सीमेत राहण्याचा प्रयत्न करतात. जिथे टेकाडे, ओढ्यांसारख्या खाणाखुणा असतात, तिथे टापूंच्या सीमा चटकन उमगतात, भराभर खात राहता येते. अशा खाणाखुणा नसल्या तर सावधपणे टेहळणी करण्यात वेळ दवडतो. चाक्‍मा बबूनांच्या वेळापत्रकांच्या अभ्यासावरून दिसते, की त्यांच्या मेंदूत परिसराचा एक नकाशा आखलेला असतो.  

माणसांच्या मेंदूतही असे अधिकच भक्कम नकाशे असतात, शिवाय संवादातून आसमंतातल्या खाणाखुणांची माहिती आप्तेष्टांकडे पोचवली जाते. लेखन-रेखाटन अस्तित्वात आल्यावर अशा माहितीच्या आधारे नकाशे बनवले जाऊ लागले. तीन हजार वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील नकाशात नाईलच्या पूर्वेचे डोंगर, सोन्या-चांदीच्या खाणी, खाणींपासूनचे रस्ते दाखवले आहेत. एकूणच राज्यकर्त्यांसाठी नकाशे हे महत्त्वाचे माहितीभांडार आहे.

सोळाव्या शतकात उदयाला आलेल्या आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बळावर युरोपीय जगभर आपले वर्चस्व प्रस्थापित करू लागले. या खटाटोपात होकायंत्रासारखी उपकरणे, पृथ्वीचा गोलावा लक्षात घेणारी गणितीय तंत्रे व यांवर आधारित नेटके नकाशे यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. नकाशे बनविण्यासाठी युरोपीयांनी स्थानिक ज्ञानही खुबीने वापरले.

भारताचा ‘ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिक सर्व्हे’ करताना इंग्रज हिमालयातील गिरिजनांवर विसंबून होते. जगातले सर्वोच्च शिखर नयनसिंग रावतांनी दाखवून दिले; राणीने त्यांचा सन्मान केला, पण शिखराला एव्हरेस्ट या सर्व्हेयर-जनरलचे नाव दिले. असे स्थानिकांच्या मदतीने बनवलेले ‘सर्व्हे ऑफ इंडिया’चे नकाशे इंग्रजांनी व नंतर भारत सरकारने अधिकृत गुपित बनवून राखले. पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेत ते खुल्या बाजारात विकले जात होते; तर इकडे भारतात परिसरशास्त्रीय अभ्यासासाठी मिळवणे अशक्‍यप्राय होते. १९७०च्या दशकात उपग्रहाद्वारे चित्रे उपलब्ध होऊ लागल्यावर अवकाश विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. सतीश धवनांनी ठरवले, की आता हे सगळे खुले करू व त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून भारताच्या वृक्षाच्छादनाचा अभ्यास करवला. पण यातून अधिकृत माहितीतल्या घोडचुका बाहेर यायला लागल्यावर शासकीय यंत्रणेने त्यात मोडता घातला. 

पण आज डॉ. धवनांनी लावलेले रोपटे लाल फितीतून डोके वर काढत महावृक्ष बनले आहे. आज नकाशांसकट नानाविध माहितीवरची, ज्ञानावरची सरकारची आणि तज्ज्ञांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. ज्ञानप्रक्रियेत सर्वांनी भाग घ्यावा व सर्व साहित्य-कला-ज्ञान निर्मिती सर्वांना उपलब्ध व्हावी हा आदर्श पुढे ठेवलेल्या ‘विकिपीडिया’ ज्ञानकोशासारख्या विनामूल्य उपक्रमातून जगभरचे ज्ञान सर्वांपर्यंत पोचू लागले आहे; आज ‘विकिपीडिया’ मराठीसह शेकडो भाषांत उपलब्ध आहे. याच धर्तीवरच्या ‘ओपन-स्ट्रीट-मॅप’ या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन संकलित केलेल्या जगभरच्या भौगोलिक माहितीचे भांडार सतत वाढते आहे. आज स्मार्ट फोनद्वारे आपण कोणत्याही स्थळाचे अक्षांश-रेखांश अजिबात लबाडी करता येत नाही अशा प्रकारे नोंदवू शकतो, ही माहिती ‘ओपन-स्ट्रीट-मॅप’ प्रणालीद्वारे जगभर खुलेपणाने पसरवू शकतो. अर्थात, याची सरकारी यंत्रणेला धास्ती आहे, कारण एक शेततळे बांधून त्याचे वेगवेगळ्या बाजूने फोटो काढून दहा शेततळ्यांचे पैसे खिशात घालण्याची सवय त्यांच्या अंगवळणी पडली आहे.

म्हणूनच प्रत्येक तळ्याचे नीट अक्षांश-रेखांश दाखविणारे फोटो काढले जावेत, असा माझ्या परिचयाच्या एका प्रामाणिक प्रशासकांचा प्रयत्न हाणून पाडला गेला. परंतु आपण निढळाचा घाम गाळत आपल्या गावात एक तळे बनवलेले असेल, तर त्याचा अक्षांश-रेखांशासहित फोटो व संबंधित माहिती ‘विकिपीडिया कॉमन्स’वर अथवा ‘ओपन-स्ट्रीट-मॅप’वर विनामूल्य चढवत सर्वांपर्यंत पोचवू शकतो. आपल्या गावाबद्दल २०११च्या जनगणतीच्या माहितीचा उपयोग करून मराठी वा इंग्रजी ‘विकिपीडिया’त लेख सुरू करू शकतो व त्यात आपल्या विधायक कामाची किंवा त्रासदायक प्रदूषणाची नोंद करू शकतो. 

मराठी मंडळी अजून तरी या आधुनिक माध्यमांचा पुरेसा फायदा उठवत नाहीत. पण आज गाजत असलेली ‘वॉटर कप’ मोहीम या दिशेने महत्त्वाचे योगदान देऊ शकेल. या मोहिमेत लोक पाणी या जिव्हाळ्याच्या नैसर्गिक संसाधनाचे लोकाभिमुख व्यवस्थापन म्हणजे काय असू शकते हे झटून दाखवून देत आहेतच. पण त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमांतर्गत काय केले जात आहे याची माहिती काटेकोरपणाने नोंदवली जात आहे. ‘विकिपीडिया’तील लेखांत काहीही उल्लेख करायचा झाला, तर विश्वसनीय माहितीचा संदर्भ द्यावा लागतो. ‘वॉटर कप’च्या निमित्ताने अशा विश्वसनीय माहितीचे सर्वांना खुले असे समृद्ध भांडार विकसित होते आहे; याचा आधार घेत ‘विकिपीडिया’मध्ये अशा प्रगतिशील गावांबद्दलचे, तसेच ‘वॉटर कप’च्या सगळ्या प्रक्रियेबद्दलचे उत्तम लेख लिहिता येतील आणि त्याला जोडून ‘ओपन-स्ट्रीट-मॅप’च्या उपक्रमाद्वारे सुव्यवस्थित डेटा बेस व नकाशे निर्माण करता येतील. अशा प्रयत्नांतून ‘वॉटर कप’च्या मोहिमेतील सगळे अनुभव, उपजलेले सगळे ज्ञान शाश्वत रूपाने जतन करता येईल, त्यातून सारखे शिकत राहता येईल, हा आदर्श देशभर, जगभर पसरवता येईल. पाणीदार हा शब्द आज जलयुक्त या अर्थाने वापरला जात आहे. पण त्याचा मूळ अर्थ आहे खंबीर, स्वावलंबी. ‘वॉटर कप’ मोहिमेतून गावे जलयुक्त बनण्याबरोबरच, त्याबद्दलचे माहिती भांडार आणि नकाशेही स्वावलंबी, पाणीदार बनवता येतील!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com