वेळूचं बन

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 16 मार्च 2017

वाऱ्याच्या पावलांचं अस्तित्व अंगणात अचानक जाणवू लागावं, तसं कधी तरी ऐकलेलं एखादं गाणं भुर्रकन मनात उतरतं आणि आपला जागेपणीचा तो दिवस वेढून टाकतं. गाण्याचे नेमके शब्द आठवले नाहीत, तरी खोलवर रुतून बसलेली सुरावट ती उणीव भरून काढते. अत्तरथेंबांची हलकी रिमझिम आजूबाजूनं सुरू व्हावी आणि कुठला गंध कुठल्या थेंबानं मुठीत पकडलेला आहे, त्याचा उलगडा होऊ नये, तशी अवस्था होऊन जाते. सुरांना जणू कोवळी पालवी यावी आणि कानांचे डोळे त्या मखमली सौंदर्यानं तृप्त-कृतार्थ व्हावेत, तसा काहीसा अनुभव आपली रसिकता समृद्ध करीत जातो. या सुरावटीनं मन हलकं हलकं होतं. स्वरांचे लडिवाळ हिंदोळे मनभर उंचावू लागतात.

वाऱ्याच्या पावलांचं अस्तित्व अंगणात अचानक जाणवू लागावं, तसं कधी तरी ऐकलेलं एखादं गाणं भुर्रकन मनात उतरतं आणि आपला जागेपणीचा तो दिवस वेढून टाकतं. गाण्याचे नेमके शब्द आठवले नाहीत, तरी खोलवर रुतून बसलेली सुरावट ती उणीव भरून काढते. अत्तरथेंबांची हलकी रिमझिम आजूबाजूनं सुरू व्हावी आणि कुठला गंध कुठल्या थेंबानं मुठीत पकडलेला आहे, त्याचा उलगडा होऊ नये, तशी अवस्था होऊन जाते. सुरांना जणू कोवळी पालवी यावी आणि कानांचे डोळे त्या मखमली सौंदर्यानं तृप्त-कृतार्थ व्हावेत, तसा काहीसा अनुभव आपली रसिकता समृद्ध करीत जातो. या सुरावटीनं मन हलकं हलकं होतं. स्वरांचे लडिवाळ हिंदोळे मनभर उंचावू लागतात. गाणं आपला ताबा घेतं. आपल्याला हवं तसं वळवतं. उंच नेतं. गर्तेत फेकतं. माळरानाची मुक्त सैर घडवून आणतं. भावनांत चिंब करतं. अभंगांत दंग करतं. बालगीतांत नाचवतं; तर स्फूर्तिगीतांत लखलखतं खड्‌ग बनवतं. 

हे स्वरमोही स्फटिक-क्षण कुठून आणि का बरं उतरत असतील? मनात कुठलाही धागादोरा नसताना ते तिथं कसे प्रवेश करीत असतील? तो असा कोणता क्षण असतो, की जेव्हा कुठल्या तरी स्वरभारांनी आपलं अंतर भरून येत असेल? कळीदार पान ओठांवर रंगत जावं, तसं गाणं कंठात कसं झिरपत जात असेल? खरं तर, हे सूर आपल्या भोवती सतत वावरत असतातच. आपण दरवाजे बंद करून घेतलेले असल्यानं, ते ऐकू येत नाहीत.

स्वरथेंबांची ही रिमझिम अनुभवायला आपण सज्ज नसतो म्हणूनच त्या थेंबांचा स्पर्श आपल्याला जाणवत नाही. क्षणोक्षणी बदलत असलेल्या मनाच्या भावावस्थांत एखादी जागा या थेंबांशी जोडली जाते. सुरांचं अवखळ वारं तिथूनच मनात घुसतं. रिकाम्या खोलीत ठेवलेल्या सतारीच्या तारांना स्पर्श न करताही, तिथं दुसरे सूर छेडले, की ही सतारही झंकारू लागते; कारण वातावरणातून येणाऱ्या स्वरकंपनांच्या बोटांनी या तारा छेडल्या जातात. आपल्या मनातील सतारीचे सूरही अशाच कंपनस्पर्शांनी गाऊ लागतात. ते तरल शब्द स्वरयंत्राला जागे करतात आणि ते गाणं आपण गुणगुणू लागतो. दिवसाच्या कुठल्याही क्षणी हे सूर गवसतात आणि आपला तो दिवस गात राहतो. सुरांबरोबर वाहत राहतो. 

प्रत्येक झाडाला त्याचा त्याचा अवकाश देत वेळूचं बन दाटीवाटीनं उभं असतं. वाऱ्याची संगत घेऊन डोलत असतं. त्याच्याशी खेळत असतं आणि एका क्षणी ते गाऊ लागतं. सूर बनातही नसतो आणि वाऱ्यातही नसतो; तरीही वेळूचं बन गातं कसं? या बनात जो अवकाश असतो, तो गात राहतो. भिरभिरणारं वारं या अवकाशात शिरतं. वेळूचे बांबू त्याचं बोट पकडून खेळात दंग होतात. स्वतःचं अस्तित्व विसरतात आणि तेव्हाच अशा निर्मळ पोकळीत स्वरदले उमलतात. आपल्या प्रत्येकात असं वेळूचं बन दडलं आहे. तिथं अवकाश दिसला, की सूर जागे होतात. आपलं गुणगुणणं हे त्या अवकाशाचं झंकारणं असतं. 
सुरांना तुम्ही असा अवकाश देता?

Web Title: editorial artical malhar arankalle