शाळा सर्जनशील बनवूया

प्रसाद मणेरीकर (शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक)
शनिवार, 18 मार्च 2017

मुलं मुळातच सर्जनशील असतात. अंगभूत सर्जनशीलता वापरून ती अनेक गोष्टी शिकत असतात. तेव्हा शाळा नावाची जी व्यवस्था मुलांनी शिकावं यासाठी आपण निर्माण केली आहे, ती मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणारी असायला हवी.
 

मुलं मुळातच सर्जनशील असतात. अंगभूत सर्जनशीलता वापरून ती अनेक गोष्टी शिकत असतात. तेव्हा शाळा नावाची जी व्यवस्था मुलांनी शिकावं यासाठी आपण निर्माण केली आहे, ती मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणारी असायला हवी.
 

‘शाळा सर्जनशील असायला हवी,’ हे विधान काहीसं विचित्र वाटेल, कारण सर्जनशीलता हा मानवी गुण आहे, तो शाळेला कसा लावायचा? तो लावायचा, कारण शाळा या प्रचंड सर्जनशील क्षमता असलेल्या मुलांशी संबंधित आहेत. मात्र, कोणत्याही व्यवस्थेचा सामान्यतः कल स्थितिशील असण्याकडे असतो. तसं स्थितिशील असणं त्या व्यवस्था चालवणाऱ्यांसाठी सोयीचं असतं. त्यामुळे त्या व्यवस्थेची तपासणी करणं, त्याला निकषांत बसवणं, यश- अपयश मोजणं सोपं जातं. एकदा नियम ठरवले, की त्याच्या आधारे कोणत्याही व्यवस्था वर्षानुवर्षे चालवता येतात. सरकार ही अशीच  स्थितिशील व्यवस्था असते आणि शाळा सरकारी मालकीच्या वा सरकारच्या नियमांखाली, म्हणजेच एका अर्थाने सरकारी नियंत्रणाखाली असल्याने, सरकारची असणारी स्थितिशीलता आपोआपच शाळा या व्यवस्थेत प्रतिबिंबित होते आणि तशीच राहते. मग ती अभ्यासक्रमात असो, शाळा तपासणी निकषांत असो, परीक्षेत असो. यात वरवर दिसणारे बदल होतात; पण संपूर्ण बदलाला मोठा कालावधी जावा लागतो. तोपर्यंत मुलांच्या काही पिढ्या पुढे सरकलेल्या असतात.

मुलं मुळातच सर्जनशील असतात. भोवतालाविषयी जाणून घेण्याची, त्या अनुभवांचा अर्थ लावण्याची प्रक्रिया त्यांच्या मेंदूत सुरू असते. उपलब्ध मर्यादित साधनांच्या आधारे नवं निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मुलं भोवतालाला कसं समजून घेतात हे जाणून घेण्याची प्रक्रिया मोठी आनंदाची आणि मुलांविषयी आपलं आकलन वाढवणारी असते. हे समजावून घेतानाच मुलांमधली सर्जनशीलता लक्षात येते. एक उदाहरण सांगतो.

साडेचार वर्षांच्या आभाला चित्र काढायची हौस. तिची आई गाणं म्हणते आणि आभाही कधीकधी आईबरोबर ‘सारेगम...’ म्हणते. एक दिवस आई गाताना आभा कागद, रंगखडू घेऊन बसली. वेगवेगळ्या रंगांच्या आणि उंचीच्या उभ्या रेषा कागदावर काढल्या आणि आईला दाखवलं. आईने विचारलं, ‘हे काय काढलंय?’ आभा म्हणाली, ‘सारेगमपधनीसा!’ सा पासून सा पर्यंतचे उंचावणारे स्वर आभाने रेषांच्या वाढत्या उंचीतून नेमकेपणानं दाखवले होते! हे आभाचं, एका कलेचा अनुभव दुसऱ्या कलेत रूपांतरित करण्याचं कसब आणि त्यासाठी सुचलेला स्वतंत्र विचार, ही तिची सर्जनशीलताच होती.

मुलं अशी अंगभूत सर्जनशीलता वापरून अनेक गोष्टी शोधत असतात. मुलांना तयार खेळणी दिली नाहीत, तर अवतीभोवती उपलब्ध असलेल्या वस्तू वापरून ती नवी खेळणी तयार करतात व त्यातून कधीही न शिकलेले खेळ त्यांच्या नियमांसकट तयार करतात. ऐकलेल्या गोष्टीतून स्वतःची नवी गोष्ट बनवतात. ही गोष्ट पूर्णतः नवी तर असतेच; पण त्यातली शब्दयोजनाही वेगळी असते. 

मुलं इतकी सर्जनशील का असतात? एक तर वर म्हटल्याप्रमाणे जग जाणून घ्यायची त्यांची सततची इच्छा. ते पाहिलेल्या, उपलब्ध गोष्टींना स्वतःच अर्थ देण्याचा प्रयत्न करतात. हे करत असताना पंचेंद्रियांसकट संपूर्ण शरीर कृतिशील सहभागी असतं. दुसरं म्हणजे मुलं विचाराने मुक्त असतात. नीती- नियमांच्या, चूक- बरोबरच्या बंधनात ती अडकलेली नसतात. त्यांच्या डोक्‍यात कल्पना येते आणि ती सत्यात उतरवायच्या मागे लागतात. समोर प्रश्न आला की तो सोडवायचा कसा, याचा विचार ती करत राहतात. काय शक्‍य नाही याच्या विचारापेक्षा एखादी गोष्ट कशी शक्‍य करता येईल, याचा विचार मुलं करतात. त्यामुळे स्वतःला झाडावर चढता आलं नाही, तरी आपण झाडावर चढलोय, अशा आशयाचं चित्र काढून ती तो कल्पनेतला आनंद घेतात. मुलं इतकी सर्जनशील असतील तर शाळा नावाची जी व्यवस्था मुलांनी शिकावं यासाठी आपण निर्माण केली आहे, ती मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणारी असायला हवी. तयार उत्तरं देऊन, त्यावर ‘तू अंधपणे विश्वास ठेव’ असं सांगणारी नसून, ‘तुझं तू करून, शोधून बघ’ हे सांगणारी हवी. त्यासाठी आवश्‍यक संधी व साधनं पुरवणारी हवी. यासाठी काय करावं लागेल? पहिलं म्हणजे सगळ्यांना एका साच्यात कोंबणारी, शिकण्यापेक्षाही जास्तीत जास्त मार्कांनी पास होण्याचं ध्येय ठेवणारी परीक्षापद्धती बदलावी लागेल. मुलं शिकावी असं खरंच वाटत असेल, तर पास- नापासाचं महत्त्व शून्यावर आणावं लागेल. वर्गांच्या पठडीबाज रचना बदलाव्या लागतील. मुलांना परस्परसंवाद करता यावा यासाठी वाव द्यावा लागेल. चित्र, नृत्य, नाटक अशा विविध प्रकारे सादरीकरणाच्या संधी द्याव्या लागतील. बोलक्‍या भिंती म्हणजे केवळ माहितीने भरलेल्या न ठेवता मुलांच्या विचाराला, कल्पकतेला वाव मिळेल अशा सजवाव्या लागतील. मुलांना सजवायला द्याव्या लागतील. दरवाजे, खिडक्‍या, परिसर साऱ्यांचा विचार असाच करावा लागेल, की यांच्या आधारे मुलं काय काय करू शकतील, शिकू शकतील. शाळेची रचनाच अशी करावी लागेल, की जिथं मुलांना शोधाला, नवीन रचना करायला वाव मिळेल. या करण्यातून मुलं आपोआप शिकत जातील.

आपण मुलांना शिकवायचं आहे, या विचारातून शिक्षकांना बाहेर काढावं लागेल. करता करता शिकण्याचे अनुभव निर्माण करावे लागतील. मुलं सतत नव्याच्या शोधात असतात म्हणून सतत नवं मुलांना मिळेल याची व्यवस्था शाळांनाही करावी लागेल. मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक गरजा लक्षात घेऊन त्या गरजांना पुरी पडणारी व्यवस्था निर्माण करावी लागेल. वर्गांच्या पठडीबाज रचना बदलाव्या लागतील. सर्जनशीलता स्वातंत्र्यात खुलते हे लक्षात घेऊन स्वातंत्र्याचं वातावरण निर्माण करावं लागेल आणि स्वातंत्र्याचा संकोच न करता मुलांत जबाबदारीची जाणीव विकसित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शिक्षकांतील सर्जनशीलतेला वाव मिळणं यातून आपोआप होईल. आपली सर्जनशीलता वापरण्याची संधी शिक्षकांना विश्वासाने द्यावी लागेल. नवं शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला अजून दोन महिन्यांचा काळ आहे. हा काळ नव्या विचाराच्या तयारीसाठी वापरूया.

Web Title: editorial artical prasad manerikar